Thursday, 12 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –12 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन उत्साहात पार पडत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सामाजिक संस्था विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्याचं संकलन करण्यासाठी सज्ज आहेत. औरंगाबाद इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. हिंगोली इथं शहरातल्या नवसाच्या चिंतामणी गणपती इथं सकाळपासून पावणेतीन लाख मोदक वाटप केलं जात आहे. परभणी तसंच नाशिक जिल्ह्यात रिमझीम पाऊस गणेशभक्तांच्या आनंदात भर घालत आहे. लातूर इथं पाणी टंचाईच्या पार्श्र्वभूमीवर गणपती विसर्जनाऐवजी मुर्ती जिल्हा प्रशासनाकडे दान करण्यात येत आहेत. मुंबईत एकशे एकोणतीस ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात मोठ्या उत्साहात मिरवणूक सुरू आहे. रत्नागिरी इथंही मिरवणूक सुरू असून पालिकेनं विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती जिल्ह्यातही गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. नंदुरबार इथं गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू आहे.
****
नागपूर - मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला विविध वित्तीय संस्थांकडून अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचं कर्ज प्राप्त झाले आहे.  समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी सत्तावीस हजार चारशे सत्त्याहत्तर कोटी रुपये हे राज्य शासनाच्या वतीनं रस्ते विकास महामंडळाचे भागभांडवल असेल तर अठ्ठावीस हजार कोटी रुपये विविध वित्तीय संस्थांमार्फत कर्जस्वरुपात उभे करण्यात आले आहेत.
****
जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या बँकांच्या पथकानं पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पूरस्थिती उद्भवणाऱ्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठीची योजनाही तयार करता येईल, त्यामुळे हा आराखडा इतरांसाठी  आदर्श ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात एकीकडे तीव्र दुष्काळ आणि दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते. या आपत्तींच्या व्यवस्थापनासाठी कायमस्वरुपी उपाय योजना सर्वंकष आणि शाश्वत आराखडा तयार करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
****
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात होती, अशी माहिती यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना दिली. उदयनराजे यांनी दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते सत्ताधारी पक्षात सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. 
****
गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळं भामरागड जवळ पर्लकोटा नदीला पूर आला असून, भामरागड तालुक्याचा संपर्क तूटला आहे. या मोसमात असा संपर्क तुटण्याची ही सातवी वेळ आहे. दरम्यान, वेगवेगळ्या विभागांची पथकं भामरागडमध्ये दाखल झाली आहेत. पुरामुळं झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याकरता एकशे पासष्ट कर्मचाऱ्यांची पंचावन्न पथकं, नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दहा वैद्यकीय अधिकारी आणि तीस आरोग्य सेवकांचं पथक भामरागडला पाठवण्यात आलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.  दरम्यान, काल रात्री भामरागड तालुक्यातल्या अतिदुर्गम गुंडुरवाही आणि पोयरकोठी गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक घरं जमीनदोस्त झाली. घरातील संसारोपयोगी वस्तू आणि पाळीव जनावरेही पुरात वाहून गेली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची उद्यापासून अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथून सुरूवात होत आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळं अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील उत्तर भागातील या यात्रेच्या सभा रद्द करण्यात आल्या होत्या. आता अहमदनगर शहरासह अकोले, संगमनेर, राहुरी, श्रीगोंदा इथं सभा होणार आहेत.
****
महामंडळाची बस ही ग्रामीण भागातील रक्तवाहिनी असून यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या बसस्थानकात अत्याधुनिक सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री मदन येरावार यांनी आज दिली. त्यांच्या हस्ते यवतमाळ आगाराच्या बसस्थानकाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
दक्षिण अफ्रिकेविरूध्द तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. संघातून के एल राहूलला वगळ्यात आलं असून त्या ऐवजी शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. उर्वरित संघ कायम आहे.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...