Sunday, 15 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१५ सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  निर्यातीला चालना तसंच बांधकाम क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकारकडून विविध उपायांची घोषणा
Ø   खासदारकीचा राजीनामा देत साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
Ø  राज्यात रुग्ण शोध विशेष मोहीम सुरू; आठ कोटी ६६ लाख लोकांची तपासणी करणार  
आणि
Ø  गुणवत्ता कायम राखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग प्रयत्नशील - डॉ भूषण पटवर्धन
****

 निर्यातीला चालना तसंच बांधकाम क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकारनं काल अनेक उपायांची घोषणा केली. निर्यातक्षम वाणिज्यिक वस्तूंवरच्या शुल्क आणि करांमध्ये सवलत, निर्यातदारांना ५० हजार कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन देणं आदी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केल्या. वस्तू आणि सेवा करांतर्गत जमा झालेला कर परतावा स्वयंचलित असेल, या महिन्याच्या शेवटी तो लागू केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. निर्यातदारांसाठी प्राथमिक क्षेत्र कर्ज प्रणालीत संशोधन करण्यात आलं असून, त्याअंतर्गत ३६ हजार कोटी ते ६८ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय कंपनी कायद्याअंतर्गत निर्माणाधीन निवासी प्रकल्पांसाठी १० हजार कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.
****

 लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भोसले यांच्या पक्षप्रवेशानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये नक्कीच मदत होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
****

 आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचंच सरकार येईल, निवडणुकीआधीच जनतेनं निकाल ठरवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची म्हटलं आहे. ते काल बारामती इथं जनसभेत बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
****

 देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी बंधुभाव आणि सामाजिक सलोखा आवश्यक आहे, मात्र आजचे सत्ताधारी या मूल्यांचा विचार करत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा मेळावा काल मुंबईत प्रदेश कार्यालयात पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार पुढच्या आठवड्यात राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. सतरा सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त राज्यात कुष्ठरोग, क्षयरोग आणि असंसर्गिक आजाराची तपासणी करण्यासाठी राज्यात रुग्ण शोध विशेष मोहीम कालपासून सुरू करण्यात आली आहे, असं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.  २८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमे दरम्यान राज्यातल्या आठ कोटी ६६ लाख लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातल्या सर्व आणि शहरी भागातल्या ३० टक्के जोखीमग्रस्त लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या अभियानामुळे लवकर निदान, लवकर उपचार याकडे लक्ष वेधण्यास मदत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 गुणवत्ता हा शिक्षणाचा गाभा असून, ती कायम राखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग प्रयत्नशील असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं, डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाच्या, ५९ व्या पदवी प्रदान समारंभात ते काल प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. संशोधनाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता, असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात शिक्षण घेता यावं, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग नॅशनल ॲकॅडमिक नॉलेज बँक उभारत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदा प्रथमच क्यू आर कोड असलेली पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
****

 परभणी जिल्ह्यात ९ गावांमध्ये काल कृत्रिम पाऊस पाडण्यात आल्याचा दावा प्रशासनानं केला आहे.  यात गंगाखेड तालुक्यातल्या पाच गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, या वातावरणाचा फायदा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
****

 बचतगटाची स्थापना करून त्यात गुंतवणूक केल्यास महागड्या वस्तू स्वस्तात देण्याचं आमिष दाखवून अनेक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबादचे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि सुरेखा म्हेत्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका संगीता कस्तुरे यांनी ही तक्रार दाखल केली होती.
****

 परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं माहिती अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गंगाखेड इथल्या शासकीय धान्याच्या गोदामातलं रजिस्टर घेऊन ते परत देण्यासाठी सुदाम लोंढे आणि प्रभु राठोड यांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तत्कालिन गोदामपाल गणेश चव्हाण यांनी याबाबत तक्रार नोंदवली होती.
****

 डासांमार्फत पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन परभणीच्या महापौर मीना वरपुडकर यांनी केलं आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीनं, तसंच आरोग्य आणि नागरी हिवताप योजनेअंतर्गत काल हे आवाहन करण्यात आलं. 
****

 अमरावती-पुणे-अमरावती आणि नागपूर-कोल्हापूर-नागपूर या रेल्वे गाड्यांचा वसमत रेल्वे स्थानकावरचा थांबा वाढवण्यात आला आहे. या दोन्ही गाड्यांचा वसमत रेल्वे स्थानकावरचा थांबा तीन महिन्यांकरता तात्पुरत्या स्वरूपात वाढवला असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...