Tuesday, 17 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१७ सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Ø  केंद्रीय निवडणूक आयोग आज मुंबईत विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार
Ø  हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन; औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
आणि
Ø  संभाजी ब्रिगेडची विधानसभा निवडणुकीसाठी १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर;  शिवस्वराज्य बहुजन पक्ष औरंगाबाद लोकसभा मतदार संघातल्या विधानसभेच्या सहा जागा लढवणार
****

 कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेने मंजुरी दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा काल सांगली जिल्ह्यात दाखल झाली. पलूस इथल्या सभेत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

 सांगली जिल्ह्यातले युवा नेते सत्यजित देशमुख यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

 दरम्यान, इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर कडकनाथ कोंबड्या फेकल्या. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

 सांगलीहून निघून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल कोल्हापूर इथं पोहोचली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी,  गेल्या पाच वर्षात  राज्यात केलेल्या कामगिरीच्या आधारे जनतेनं मूल्यमापन करावं आणि पुन्हा एकदा भाजप महायुती सरकारला विजयी करावं, असं आवाहन केलं.
****

 विधानसभेची आगामी निवडणूक काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षासोबत आघाडी करून लढवणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यातल्या २८८ जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५ जागांवर निवडणूक लढवणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षाला सोडणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं, पवार म्हणाले. गेल्या वेळी दोन्ही पक्षांनी विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती, त्यावेळी काँग्रेसनं ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ४१ जागांवर विजय मिळवला होता.
****

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते प्रशासकीय तसंच पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन, निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. येत्या नऊ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत असून, त्यापूर्वी नवीन विधानसभा स्थापन होणं आवश्यक आहे. आयोगाच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
****

 हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. मराठवाड्यात आठही जिल्ह्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृती स्तंभाजवळ होणार आहे. शहरातल्या औरंगपुरा इथं उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी आठ वाजता होणार आहे.
****

 नाभिक समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी  महाराष्ट्र राज्य नाभिक -केश शिल्प मंडळाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी नागपूरच्या  सुधीर उर्फ बंडू राऊत यांची नियुक्ती  करण्यात आली  आहे.
इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडच्या विश्वनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 संभाजी ब्रिगेडनं विधानसभा निवडणुकीसाठी १४ उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून रमेश गायकवाड, देगलूर बिलोली मतदार संघातून सूर्यकांत चंद्रे, लोहा कंधार मतदार संघातून सुभाष कोल्हे, माजलगाव छत्रभूज देशमुख, परळी गोविंद पोतंगले तर औसा मतदार संघातून अभिमन्यू शेषराव पवार यांना संभाजी ब्रिगेडने उमेदवारी जाहीर केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. यापूर्वी संभाजी ब्रिगेडने १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
****

 शिवस्वराज्य बहुजन पक्ष औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड, गंगापूर, वैजापूर आणि औरंगाबाद मध्य, पूर्व, पश्चिम, या सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची माहिती कन्नडचे माजी आमदार पक्ष प्रमुख हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीतला मतदारांचा प्रतिसाद लक्षात घेऊन कुठल्याही राजकीय पक्षासोबत न जाता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांना दडपशाहीच्या मार्गानं रोखण्यात येत असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्यात यावा, मागील वर्षातल्या खरीप आणि रब्बीच्या पीकविम्याचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे, शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज द्या तसंच शेतमुजराच्या हाताला काम आणि राशन देण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं.

 दरम्यान, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी काल औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं केली. आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. 
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...