Friday, 2 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 2 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

कर्जमाफीसाठी सुरु असलेला राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी आंदोलनाचं चित्र दिसून आलं.
सातारा जिल्ह्यातून मुंबई, पुणे आणि कोकणात जाणारा शेतमाल आणि दुध पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे.
निलंगा लातूर रस्त्यावर औसा इथं शेतकरी संघटनांनी रास्तारोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी लातूर मधल्या बियाणे, शेती विषयक खते आणि औषधं विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
सांगली जिल्ह्यातही संपाला प्रतिसाद मिळत आहे. किरकोळ बाजारात काही प्रमाणात भाज्यांचे दर वाढल्याचं चित्र आहे.
यवतमाळ जिल्ह्यात हिवरा संगम, आर्णी आणि शेंबाळपिंपरी याठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या वारी, बांबोरी फाटा इथं शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर फेकून दिलं. पिंपळगाव माळवी, डोगरगण, जेऊर ग्रामस्थांच्या वतीनं नगर औरंगाबाद रस्त्यावर रस्तारोको आंदोलन करण्यात आलं. 
धुळे जिल्ह्यातल्या सोनगीर इथं परराज्यातून येणारी दुधाची आणि भाजीपाल्याची वाहनं अडवून ती परत पाठवण्यात आली.
शेतकऱ्यांच्या या संपाला शेतकरी कामगार पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे. 

****

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दर्शवला असून, आपण शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारशी बोलणी करण्यास तयार असल्याचं सांगितलं.
तर शेतकऱ्यांबरोबर सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तयार असून, संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

****

चालु आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर साडे सात टक्के राहण्याचा अंदाज असल्याचं नीति आयोगानं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडीया यांनी गेल्या तीन वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबतची माहिती दिली. सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत एकूण देशांतर्गत उत्पन्न आठ टक्क्यांपर्यंत जाईल, असं ते म्हणाले. नीति आयोग आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आणि २०१९-२० पर्यंत महसूल तोटा शून्य पूर्णांक नऊ टक्के करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पनगडीया यांनी सांगितलं.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची पंधरावी बैठक उद्या दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीत मागच्या बैठकीत राहीलेल्या वस्तुंवर कराचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. 

****

केंद्र सरकार दिव्यांगांना लवकरच मुख्य प्रवाहात आणणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितलं आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं दिव्यांग सशक्तीकरण विभागाच्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशाच्या विकासात दिव्यांगांचा सहभाग महत्वाचा असल्याचं ते म्हणाले. देशात दिव्यांगांसाठी आतापर्यंत पाच हजार ३०० शिबिरांचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

स्कॉर्पिन श्रेणीतली दुसरी पाणबुडी सज्ज असल्याची माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. स्कॉर्पिन श्रेणीतल्या आय एन एस कल्वरी या पाणबुडीच्या सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, या वर्षअखेरपर्यंत भारतीय नौदलात तीचा समावेश करण्यात येणार आहे.

****

केंद्र आणि राज्य सरकारनं गेल्या तीन वर्षात शेतकरी हितासाठी केलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं राबवलेल्या शिवार संवाद सभा अभियान यशस्वी झाल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. ते आज लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बोलताना निलंगेकर यांनी, शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढावा, असं सांगितलं.

****

औरंगाबाद शहरालगतच्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर तिकीट आरक्षण कार्यालयाचं उद्घाटन उद्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच नांदेड आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांच्या अनेक विकास कामांचा शुभारंभही प्रभु यांच्या हस्ते होणार आहे. जालना ते नगरसोल डेमु गाडीला साईनगर शिर्डी पर्यंत विस्तार करण्यात येणार असून, या गाडीला प्रभु यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. परळी इथून व्हिडिओ लिंकींगद्वारे हे कार्यक्रम होणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. 

****

राज्यात उद्या किंवा परवा पावसाचं आगमन होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. नैॠत्य मोसमी पावसाची वाटचाल आज बंगालच्या उपसागराच्या काही भागात झाली आहे. मध्य महाराष्ट्रात मान्सुनपूर्व पावसानं हजेरी लावल्यानं तापमानात घट झाली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...