Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 June 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ जून २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
अल्पभूधारक शेतकऱ्यांचं
कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
·
कर्जमाफीसह अनेक
मागण्या मान्य झाल्यानं, राज्यातला शेतकरी संप मागे
·
अभियांत्रिकी
आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार
आणि
·
रेल्वेमंत्री
सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात आज विविध रेल्वे विकास कामांना प्रारंभ.
****
अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची
घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल रात्री उशीरा शेतकरी संघटनांच्या
प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ३१ ऑक्टोबरपर्यंत
कर्ज माफ करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाणार असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारने मान्य केलं आहे की, ३१ ऑक्टोबरपर्यंत यासंदर्भातलं
कर्ज माफ करण्यासंदर्भातली कार्यवाही केली जाईल. त्याकरता आम्ही एक समिती तयार करत
आहोत, जी समिती यासंदर्भात अभ्यास करेल. त्यातनं गरजू शेतकरी वगळला जात नाही हे बघेल.
आणि ज्याप्रमाणे मागच्या कर्जमाफीत काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला, तसा गैरफायदा
घेता येणार नाही हे ही याच्यामध्ये ही समिती बघेल. या समितीमध्ये सरकारचे लोकं आणि
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतील. त्यामाध्यमातनं अल्पभूधारक थकित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं
काम हे राज्य सरकारच्या वतीनं होईल.
शेतमालाच्या हमीभावासंदर्भात महिनाभराच्या
आत राज्य कृषी मूल्य आयोगाचं गठन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केला.
दूध दरवाढीसंदर्भातही २० जूनपर्यंत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सुमारे ७०
टक्के मागण्या मान्य झाल्यानं, शेतकरी संप मागे घेत असल्याचं, शेतकरी संघटनांचे मुख्य
समन्वयक धनंजय जाधव यांनी जाहीर केलं. ते म्हणाले.
या मागण्या आहेत त्याच्यामध्ये ७० टक्के मागण्या जवळपास
आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलेल्या आहेत. आणि त्यामुळे हा आपला जो संप आहे
हा आम्ही माघारी घेत आहोत.
या बैठकीला शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी
जयाजी सूर्यवंशी, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
दरम्यान, शेतकरी संपाच्या काल दुसऱ्या दिवशी मुंबई तसंच
पुण्याकडे जाणारा शेतमाल आणि दुध पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मराठवाड्यातही
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शनं करत, दूध तसंच भाजीपाल्याचा पुरवठा रोखून धरला होता.
त्यामुळे काल अनेक ठिकाणचे आठवडी बाजारही भरले नाहीत.
****
राज्यात एक ते सात जुलै दरम्यान राबवल्या जात असलेल्या
वृक्ष लागवड मोहिमेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणं आवश्यक असल्याचं, वनमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यात वृक्षलागवड मोहिमेच्या तयारीसंदर्भात काल
आढावा बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा आणि
स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेमध्ये सनदी सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १४ विद्यार्थ्यांची
केंद्रीय नागरी सेवेत निवड झाली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या
विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाच्या वतीनं लवकरच
या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचंही बडोले यांनी सांगितलं.
****
अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमाच्या सामाईक
प्रवेश परीक्षेचा निकाल आज सायंकाळी पाच वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या डब्ल्यू
डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी ई महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर
करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावरून उमेदवारांना आपल्या गुणपत्रिका डाउनलोड करता येईल, अशी माहिती संबंधित कार्यालयाकडून देण्यात आली.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई माध्यमाचा दहावी
परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना आज दुपारी Cbse.nic.in या संकेतस्थळावर
हा निकाल पाहता येईल.
****
महाराष्ट्रातल्या मालवण इथले मूळचे असलेले लिओ अशोक वराडकर
यांची आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. आयर्लंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक
निवडणुकीत शेवटच्या फेरीत ७३ पैकी ५१ मतं मिळवत वराडकर यांनी विजय मिळवला. वराडकर यांची
आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल कोकणासह अनेक ठिकाणी फटाके वाजवून आनंद
व्यक्त करण्यात आला.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज परळी दौऱ्यावर येत आहेत.
औरंगाबाद इथं मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या तिकीट आरक्षण कार्यालयाचं
उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते आज होणार आहे. परळी इथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून
हे कार्यक्रम होणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं. जालना ते नगरसोल
डेमू गाडीचा साईनगर शिर्डी पर्यंत विस्तार करण्यात येणार असून, या गाडीला प्रभू हिरवा
झेंडा दाखवतील. नांदेड आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांच्या अनेक विकास कामांचा प्रारंभही
प्रभू यांच्या हस्ते यावेळी होणार आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज
बीड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी पावणे अकरा वाजता मुख्यमंत्री नांदेड विमानतळावर
पोहोचतील, त्यानंतर ते हेलिकॉप्टरनं परळीकडे रवाना होतील. साडे अकरा वाजेच्या सुमारास
परळी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभाला ते उपस्थित
राहतील. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित
विविध सामाजिक उपक्रमांमध्येही मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. दुपारी सव्वा दोन वाजता
मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं नांदेडकडे रवाना होतील.
****
माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या कारकिर्दीवर आधारित
‘दिलीपरावजी देशमुख: एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ या विद्याधर कांदे-पाटील लिखीत चरित्रग्रंथाचं
काल लातूर इथं माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. देशमुख
यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी काम केलेल्या संस्था प्रकाशझोतात आल्या, या
शब्दात डॉ. वाघमारे यांनी देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवरील
पदवीधर मतदार संघातून दहा नोंदणीकृत पदवीधरांची नव्याने निवडणूक घेण्यासाठी, नवीन मतदार
यादी तयार केली जात आहे. कालपासून या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. विद्यापीठाच्या
पदवीधरांनी तीन जुलै पर्यंत नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
परभणी शहर आणि परिसरात काल शेतकरी संपाचा परिणाम जाणवला.
भाजीपाला तसंच दूध फेकून दिलं जाण्याच्या भीतीनं तुरळक शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला
विक्रीसाठी आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
केंद्र सरकारच्या तीन वर्षपूर्ती निमित्त, राज्य ग्रामीण
जीवनोन्नती अभियान अंतर्गत काल परळी इथं रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसाय मार्गदर्शन
मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा
मुंडे तसंच खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी युवकांना मार्गदर्शन केलं.
****
परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहर आणि परिसरात काल सायंकाळी
वादळी वाऱ्यासह पाउस झाला. या पावसामुळे सर्व सामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं मात्र
वातावरणातील उष्णता कमी झाली आहे.
****
No comments:
Post a Comment