Tuesday, 18 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



§  मराठवाड्याच्या समृद्धीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची मुख्यमंत्र्यांची मराठवाडा मुक्तिदिनी ग्वाही

§  ७१ वा मराठवाडा मुक्तिदिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा

§  मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज राज्यपालांकडून व्यक्त  

आणि

§  बडोदा बँक, विजया बँक आणि देना बँक या तीन बँकांच्या विलिनीकरणाची केंद्राकडून घोषणा

****



 ७१ वा मराठवाडा मुक्तीदिन काल साजरा झाला, औरंगाबाद इथं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीदिनाचं मुख्य ध्वजारोहण झालं. मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेनं पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणात दिली. मुख्यमंत्री म्हणाले...

मला विश्वास आहे की या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याला मागासलेपणा पासून मुक्ती देणं हे आता आपण काम आहे. आपल्या मागच्या पिढीनं मराठवाड्याला स्वातंत्र्य दिलं. आता आपल्याला मराठवाड्याला समृद्धी द्यायची आहे, विकास द्यायचा आहे. आणि त्याचाच प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही करतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो.



मराठवाड्याच्या विकासासाठी राबवल्या जात असलेल्या, वॉटर ग्रीड, बळीराजा संजीवनी योजना, जलयुक्त शिवार, दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, आदी योजना तसंच प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. मराठवाड्यात औद्योगिक क्षेत्रासाठी वीज दरात सवलत दिल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.

****



 मराठवाड्यात सर्वत्र काल ध्वजारोहणासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.



 नांदेड इथं मराठवाडा मुक्ती संग्रामातली ऐतिहासिक माहिती तरुण पिढीला ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, तसंच हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्तीचं काम लवकरच हाती घेण्यात येईल, असं गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ध्वजारोहण सोहळ्यानंतर सांगितलं. नांदेड जिल्हा शहर काँग्रेस समिती कार्यालयात आमदार डी.पी.सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.



 जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते, लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते  ध्वजारोहण झालं. उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.



 उस्मानाबादच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.



 परभणी इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, पाटील यांनी, स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अपर्ण करून आदरांजली वाहिली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त काल परभणी जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात कळमनुरी तालुक्यातल्या तीस स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.



 बीड इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. मागासलेला जिल्हा हा कलंक पुसून बीड जिल्ह्याची ओळख आता विकसित जिल्ह्यामध्ये होत आहे, यामध्ये जिल्ह्यातल्या जनतेचं सहकार्य आणि योगदान महत्त्वाचं आहे, असं  मुंडे यांनी नमूद केलं.

****



 मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची गरज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली आहे. ते काल जालना इथं बोलत होते. या हुतात्म्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी हा लढा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, असं राज्यपाल म्हणाले. मुक्तिसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमांना राज्यपालांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.



 डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी स्थापन केलेल्या जालना इथल्या महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टच्या श्रीगणपती नेत्रालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीचा कार्यक्रम काल राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. डॉ. बारवाले यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशनही राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जालना इथं कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी शासनानं जागा उपलब्ध करुन दिली असल्याचं सांगून विद्यापीठानं या संस्थेची उभारणी लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

****



 भारतातल्या सर्वात अविकसित एकशे चार जिल्ह्यांपैकी सात जिल्हे एकट्या मराठवाड्यात आहेत हे लक्षात घेऊन मराठवाड्याच्या जलद विकासासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावं आणि केंद्रीय योजना राबवाव्यात अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दुष्काळातून मराठवाडा मुक्त करण्यासह अन्य काही मागण्याही या पत्रात करण्यात आल्या आहेत.

****



 देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातला शहरीकरणाचा वेग जास्त असल्याचं निरीक्षण पंधराव्या वित्त आयोगानं नोंदवलं आहे. देशाच्या शहरीकरणाचा सरासरी वेग एकतीस पूर्णांक अठरा टक्के असताना राज्यात तो पंचेचाळीस पूर्णांक तेवीस टक्के इतका असल्याचं, आयोगानं म्हटलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 केंद्र सरकारने बडोदा बँक, विजया बँक आणि देना बँक या तीन बँकांचं विलिनीकरण करण्याची घोषणा केली आहे. या विलिनीकरणानंतर तयार होणारी बँक ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असेल. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. सरकारने या बँकांना विलिनीकरणाच्या प्रस्‍तावावर विचार करण्यास सांगितलं असून संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देण्याची सूचना केली आहे, असं ते म्हणाले.  या विलिनीकरणामुळे बँकेच्या आर्थिक व्यवहारात वाढ होईल, कर्मचाऱ्यांवर याचा कोणताही विपरीत परीणाम होणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****



 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा चोविसावा वर्धापन दिन काल साजरा करण्यात आला. यानिमित्तानं विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार वैद्यकीय सेवा क्षेत्रातले ज्येष्ठ डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार भोकर तालुक्यातल्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाला मिळाला आहे.

****



 अहमदनगर जिल्ह्यातल्या वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी या रस्त्याचं काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झालं आहे. यापूर्वी कच्चा आणि खडीचा असलेला हा रस्ता, आता पक्का झाल्यानं या या मार्गावरचा प्रवास सुलभ झाला आहे. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. या विषयी बापू गव्हाणे यांनी आपला अनुभव सांगितला.....



 माझं नाव बापू गव्हाणे. मी प्रापर वडगाव गुप्ता येथे राहतो. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी पर्यंत हा जो पाच किलोमिटरचा रस्ता होता हा पहिल्यांदा एकदम खराब होता. पण आता चांगला झालेला आहे. मागबी पण प्रोब्लम आला होता. रोडला दोन ते तीन अक्सिडेन्ट झाले होते. आता आमचे मुलं देखील तेथुन पिंपळगाव वरून वडगावला  शाळेला यायचे.  त्यांना प्राब्लम यायचा, पाऊस झाला की भरपूर खड्डेबिड्डे राहयचे. पण आता एकदम व्यवस्थित रोड झालेला आहे. त्याच्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजना मुळ आम्हाला एकदम  व्यवस्थित  वाटत. एकदम ओके.



****



 मराठवाड्यातल्या रेल्वेसंबंधित अनेक प्रश्नांसाठी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं काल परभणी रेल्वेस्थानकावर निदर्शनं आणि धरणे आंदोलन करण्यात आलं. मराठवाडा मुक्ती दिनी केलेल्या या आंदोलनात, मराठवाड्यातून मुंबई आणि पुण्यासाठी नवीन गाडी सुरू करावी, नांदेड-नगरसोल नवीन डेमो गाडी सुरू करावी, मराठवाड्याला मध्य रेल्वेशी आणि लातूर परळी मार्ग नांदेड विभागाशी जोडावा, पानगाव ते लातूर नवीन बायपास सुरू करावा, यासह अन्य मागण्या महासंघानं केल्या.

****



 अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या एका शिष्टमंडळानं काल मराठवाडा मुक्तीदिनी, अंबाजोगाई इथं उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. विधीज्ञ संतोष लोमटे यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळानं, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलं. १९६२ पासून केली जात असलेली ही मागणी पूर्ण करण्याची विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

****



 नांदेडमध्ये सुमारे तीन आठवड्यानंतर काल पावसानं हजेरी लावली. सुमारे ४५ मिनिटं झालेला हा पाऊस खरिप पिकांना उपयुक्त ठरणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही काल दुपारच्या सुमाराला पावसाच्या सरी कोसळल्या.

****



 हिंगोली शहर पोलीस ठाण्यातला पोलीस कर्मचारी प्रदीप जाधव याला काल आठ हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ अटक केली. एका अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी जाधव यानं, २० हजार रुपये लाच मागितली होती.

****



 बीड जिल्ह्यात ई-पॉस मशीन शिवाय ज्या व्यक्तींनी गेल्या महिन्यात धान्य घेतलं आहे. त्यांचं सर्वेक्षण करण्याची मोहीम आज आणि उद्या जिल्हाभरात राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या केज आणि शिरूर हे दोन तालुके वगळून इतर सर्व तालुक्यांमधल्या, प्रत्येकी २० स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेतलेल्या लाभार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं बीडच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...