Monday, 17 September 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 17.09.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17  September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज जालन्यात आयोजित कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढयामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये प्राणांची आहुती देणाऱ्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शालेय पाठयपुस्तकांमध्ये या माहितीचा समावेश करण्याची गरज असल्याचं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं.

****

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बद्रीनारायण बारवाले यांनी स्थापन केलेल्या जालना इथल्या महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टच्या श्रीगणपती नेत्रालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीचा कार्यक्रम आज झाला. डॉ.बारवाले यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या चरित्रग्रंथाचं प्रकाशनही राज्यपालांच्या हस्ते यावेळी झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जालना इथं कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी शासनानं जागा उपलब्ध करुन दिली असल्याचं सांगून विद्यापीठानं या संस्थेची उभारणी लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

****

मराठवाड्याला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याची वाटचाल सुरू केलेली असून यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेनं पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद इथं मराठवाडा मुक्ती दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात दिली. मुख्यमंत्री म्हणाले...

मला विश्वास आहे की या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याला मागसलेपणापासून मुक्ती देणं हे आत्ता आपलं काम आहे. आपल्या मागच्या पिढीनं मराठवाड्याला स्वातंत्र्य दिलं. आत्ता आपल्याला मराठवाड्याला समृध्दी द्यायची आहे,विकास द्यायचा आहे.आणि त्याचाच प्रयत्न आपल्या सर्वांच्या आर्शिवादानं या ठिकाणी आम्ही करतो आहोत, आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो.

****

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज परभणी जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात कळमनुरी तालुक्यातल्या तीस स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

****

मराठवाड्यातल्या रेल्वेसंबंधित अनेक प्रश्नांसाठी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं आज परभणी रेल्वेस्थानकावर निदर्शनं आणि धरणे आंदोलन करण्यात आलं. मराठवाडा मुक्ती दिनाचं निमित्त साधून हे आंदोलन करताना, मराठवाड्यातून मुंबई आणि पुण्यासाठी नवीन गाडी सुरू करावी, नांदेड-नगरसोल नवीन डेमो गाडी सुरू करावी, मराठवाड्याला मध्य रेल्वेशी आणि लातूर परळी मार्ग नांदेड विभागाशी जोडावा, पानगाव ते लातूर नवीन बायपास सुरू करावा, यासह अन्य मागण्या महासंघानं केल्या.

****

भारतातल्या सर्वात अविकसीत एकशे चार जिल्हयांपैकी सात जिल्हे एकटया मराठवाडयात आहेत हे लक्षात घेऊन मराठवाडयाच्या जलद विकासासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालावं आणि केंद्रीय योजना राबवाव्यात अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारनं दुष्काळापासून मराठवाडयाची मुक्तता करण्यासाठीच्या योजना राबवाव्यात यासह अन्य काही मागण्याही या पत्रात करण्यात आल्या आहेत.

****

देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातला शहरीकरणाचा वेग जास्त असल्याचं निरीक्षण पंधराव्या वित्त आयोगानं नोंदवलं आहे.देशाच्या शहरीकरणाचा सरासरी वेग एकतीस पूर्णांक अठरा टक्के असताना राज्यात तो पंचेचाळीस पूर्णांक तेवीस टक्के इतका असल्याचं,तसंच औद्योगीकीरणातही महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.शिक्षणासाठी अन्य राज्यातल्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती महाराष्ट्रालाच असल्याचं मतही आयोगानं नोंदवलं आहे. पंधरावा वित्त आयोग आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे.

****

नांदेडमध्ये सुमारे तीन आठवड्यानंतर आज पावसानं हजेरी लावली. सुमारे ४५ मिनिटं झालेला हा पाऊस खरिप पिकांना उपयुक्त ठरणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही दुपारच्या सुमाराला पावसाच्या सरी कोसळल्या.

****

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या एका शिष्टमंडळानं आज अंबाजोगाई इथं उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. विधीज्ञ संतोष लोमटे यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळानं, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलं. १९६२ पासून केली जात असलेली ही मागणी पूर्ण करण्याची विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

//*********//












No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...