Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 September 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
कुष्ठरुग्णांच्या
पुनर्वसनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं, केंद्र तसंच राज्य सरकारांना दिशानिर्देश
जारी केले आहेत. या रुग्णांना आरक्षण तसंच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी
त्यांना अपंग प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश न्यायालयानं
दिले आहेत. कुष्ठरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकार पुरेशी पावलं उचलत नसल्याची तक्रार
एका याचिकेतून करण्यात आली आहे, या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीश दीपक
मिश्र, न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं
आज हे निर्देश दिले. कुष्ठरुग्णांना सामाजिक अवहेलनेचा सामना करावा लागू नये, यासाठी
रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी संवेदनशील असावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. पूर्णपणे
बरा होणाऱ्या या आजाराच्या निर्मूलनासंदर्भात उदासीन दृष्टीकोनाबद्दल, न्यायालयानं
नापसंती व्यक्त केली.
****
हजरत
इमाम हुसैन यांनी जगाला शांतीचा संदेश दिला, शांती आणि न्यायासाठी त्यांनी हौतात्म्य
पत्करलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्य प्रदेशात इंदूर
इथं बोहरा समाजाच्या वतीनं आयोजित ‘आशुरा मुबारक’ कार्यक्रमात बोलत होते. पोषण, आरोग्य
सेवा, पर्यावरण संवर्धन आणि बेघरांना घर देण्याच्या बोहरा समाजाच्या उपक्रमांचं पंतप्रधानांनी
कौतुक केलं. बोहरा समाजाच धर्मगुरू सैयदना साहब यांनी मोदी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण
उल्लेख करत, त्यांना शुभेच्छा दिल्या. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह
बोहरा समाज बांधव मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते.
****
आंतरराष्ट्रीय
विमानतळ परिषद एसीआयनं दिल्लीच्या इंदिरा गांधी आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय
विमानतळांना जगातली सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषीत केलं आहे. परिषदेनं संयुक्तरित्या
या दोन विमानतळांना गुणवत्तेच्या आधारावर सर्वोत्तम सेवा देणारे विमानतळ म्हणून गौरवलं
आहे. वर्ष २०१७ मधले पुरस्कार परिषदेनं नुकतेच घोषित केले. वर्षाला चार कोटी प्रवासी
या विमानतळांवरून प्रवास करतात. हैद्राबाद,
लखनऊ, कोचीन आणि पुणे या सह देशातल्या इतर ११ विमानतळांचाही परिषदेनं गौरव केला आहे.
****
जम्मू
काश्मीर मधल्या किश्तवाड जिल्ह्यात आज सकाळी एक बस चिनाब नदीत कोसळली. या दुर्घटनेत
११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये २५ ते ३० प्रवासी होते.
मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अभियांत्रिकी
पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशात वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे
पावलं उचलली जात असून या अंतर्गत आजपासून १५ दिवस राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात येणार
आहे. या सर्वेक्षणातून पुढील पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. दरवर्षी
या अभ्यासक्रमातल्या प्रवेशात घट होत असून अनेक जागा रिक्त रहात आहेत या पार्श्वभूमीवर
हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
गेल्या
वर्षी आलेल्या चक्रीवादळामुळे तसंच किडींच्या प्रादुर्भावामुळं झालेल्या नुकसानासाठी
राज्याला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून ६० कोटी ७६ लाख रुपयांची मदत
मंज़ूर करण्यात आली. गृहमंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री अरुण
जेटली यांच्या उपस्थितीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं
याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या धर्माबाद इथल्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री
चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. येत्या २१ सप्टेंबरपर्यंत
नायडू यांना अटक करून, न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश, न्यायालयानं पोलिस प्रशासनाला
दिले आहेत. सुमारे आठ वर्षांपूर्वी २०१० मध्ये आंध्रप्रदेश विधानसभेतले विरोधी पक्षनेते
असलेले नायडू यांनी, महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्रप्रदेश सीमेवर नांदेड जिल्ह्यातल्या
बाभळी बंधाऱ्यावर आंदोलन केल्याप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आलं आहे. या मुदतीत नायडू
न्यायालयासमोर हजर होतील, असं त्यांचे चिरंजीव तथा आंध्रप्रदेशचे माहिती तंत्रज्ञान
मंत्री एन लोकेश यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नाशिक
मुंबई रेल्वे मार्गावर कसारा दरम्यान, रेल्वेची रुळ देखभाल दुरुस्ती गाडी घसरल्यामुळे,
या मार्गावरची वाहतुक विस्कळीत झाली आहे. यामुळे जालना दादर जनशताब्दी गाडी मनमाड इथं
थांबवण्यात आली असून, मनमाड इथून सायंकाळी नेहमीच्यावेळी ही गाडी परतीच्या प्रवासाला
निघणार आहे.
****
ऋषीपंचमी
आज सर्वत्र भक्तीभावानं साजरी होत आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज
महिलांनी श्रीगणेश अथर्वशीर्षाचं समूहपठण केलं. विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव
इथं, ऋषीपंचमीनिमित्त गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे.
****
टोकियो इथं सुरु असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन
स्पर्धेत किदम्बी श्रीकांत आणि पर्यायानं भारताचं आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात
आलं. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत, दक्षिण कोरियाच्या डाँग ली यानं श्रीकांतला
१९-२१, २१-१६, २१-१८ असं तीन गेम्समध्ये अटीतटीच्या झुंजीत पराभूत केलं.
****
No comments:
Post a Comment