Sunday, 16 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.04.2017 - 01.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.

*****

जुलै २०१६ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १०० रूपये अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. प्रती शेतकरी जास्तीत जास्त दोनशे क्विंटलसाठी हे अनुदान दिलं जाईल. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातल्या सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना लागू असेल. परराज्यातून आवक झालेल्या आणि व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी मात्र ही योजना लागू राहणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हे अनुदान मिळवण्यासाठी ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केली होती, तिथेच अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत कांदा विक्री पट्टी ७/१२ चा उतारा, तसंच बँक बचत खाते क्रमांक देणं आवश्यक आहे. गेल्या वर्षी कांद्याच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं, याबाबतच्या शासननिर्णयात म्हटलं आहे.

****

देशभरात मुंबईसह महत्त्वाच्या विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काल रात्री आलेल्या विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या एका ई मेलनंतर मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

येत्या वर्ष अखेरपर्यंत देशभरात, भूकंपाची पूर्वसूचना देणारी ३१ भूनिरीक्षक यंत्र बसवण्याचा निर्णय केंद्रशासनानं घेतला आहे. ही यंत्रं भूगर्भात होणाऱ्या घडामोडींचं निरीक्षण आणि नोंदी करेल. पुढल्या वर्षी देशातल्या १५० ठिकाणी अशी यंत्रं बसवण्यात येतील असं भूशास्त्र विभागाचे सचिव एम राजीवन यांनी नवी दिल्ली इथं आज पी टी आय शी बोलताना सांगितलं. या यंत्रांमुळे भूकंपाची पूर्वसूचना मिळेल आणि भूकंपामुळे होणारी हानी टाळण्यास मदत होईल असं ते म्हणाले.

****

कर्मचारी भविष्य निधीवर २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी आठ पूर्णांक ६५ टक्के दरानं व्याज देण्यास केंद्रीय अर्थमंत्रालयानं मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा सुमारे चार कोटी सदस्यांना लाभ होणार आहे. अर्थ मंत्रालयानं या आधी कामगार मंत्रालयाला व्याज दरात कपात करण्याचा सल्ला दिला होता.

****

ईस्टर संडेचा सण आज जगभरात सर्वत्र साजरा होत आहे. प्रेषीत येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थाचाना या सणानिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसंच उपराष्ट्रपती मोहम्मद हामीद अन्सारी यांनी देशभरातल्या तसंच परदेशात स्थायिक ख्रिश्चन भारतीयांना आजच्या ईस्टर संडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टरचा हा सण प्रभू येशुनं समाजाला शिकवलेल्या खरेपणा, प्रेम तसंच निस्वार्थ सेवेची आठवण करुन देतो. हा सण सर्वांच्या आयुष्यात पुनर्जीवनाचा संदेश घेऊन येवो असं राष्ट्रपतीनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर या सणाच्या निमित्तानं सर्वांच्या जीवनात शांती आणि सद्भावना येवो असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

राज्य शासनाच्या सहकार विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा यंदा सोलापूर इथं होणार आहे. सरकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. येत्या २६ एप्रिल रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.

****

नांदेड इथून नागपूरला जाण्याकरिता नांदेड ते अजनी ही उन्हाळी विशेष गाडी सुधारित वेळा पत्रकाने चालविण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागानं घेतला  आहे.

या गाडीच्या एकूण २२ फेऱ्या होणार असून उद्या १७ एप्रिल पासून सोमवारी रात्री साडे आठ ही गाडी नांदेडहून सुटेल आणि नागपूर इथं मंगळवारी सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही विशेष रेल्वेगाडी दर मंगळवारी रात्री १० वाजून २० मिनिटानी नागपूर स्थानकातून निघून बुधवारी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी नांदेड इथं पोहोचेल.

****

राज्याचं महसूली उत्पन्न तसंच उत्पन्नाची साधनं वाढविण्यासाठी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तर समिती गठीत करण्यात आली आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...