Sunday, 16 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.04.2017 - 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 16 April 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

बेकायदेशीर तसंच काळा पैसा संबंधातल्या प्रकरणांच्या तपासासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय ला नवीन ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामुळे बँका, आयकर विभाग तसंच आर्थिक दक्षता विभागासह अनेक संस्थांकडून माहिती संकलित करणं, सुलभ होणार आहे. केंद्रीय दक्षता आयोगामार्फत गठीत समितीनं केलेल्या शिफारसींवर विचार करुन, सरकारनं सध्याच्या प्रणालीत बदल करण्याबाबतचा हा निर्णय घेतला आहे. सीबीआयला ही सुविधा उपलब्ध झाल्यानं सर्व प्रकारचं अघोषित उत्पन्न उघड होणं सहज शक्य होणार आहे. 

****

कथित हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या रावळपिंडी लष्करी न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्ताननं नवीन कागदपत्रं तयार केली आहेत. ही कागदपत्रं संयुक्त राष्ट्र तसंच पाकिस्तानातील परराष्ट्रदुतांना यांना पाठवली जाणार आहेत. फिल्ड जनरल कोर्ट मार्शल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान जाधव यांनी दिलेल्या जबानीवर ही कागपत्रं आधारित असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

शेतीसाठी दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सह्याद्री वाहिनीच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमातून शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते आज बोलत होते. केंद्र सरकार उपलब्ध करून देत असलेल्या निधीतून राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं काम सुरु आहे. यातूनच शेतकऱ्यांसाठी दिवसा १२ तास अखंड वीज उपलब्ध होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सरकारी साखर कारखाने तसंच शेतकऱ्यांच्या मदतीनं राज्यशासन, राज्यातल्या पाच धरणक्षेत्रातील संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनावर आणणार असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याचा विकास करताना कृषी आणि ग्रामविकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.

****

शेतकरी कर्जमाफीसाठी निघालेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेनं आज जळगाव जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. विधान सभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी, 'रिपाइं'चे जोगेंद्र कवाडे यांच्यासह अनेक मान्यवर या यात्रेत सहभागी झाले आहेत. पाळधी, एरंडोल आदी गावांत शेतकऱ्यांशी संवाद साधत, त्यांची निवेदनं स्वीकारत ही संघर्ष यात्रा धुळ्याकडे मार्गस्थ झाली.

****

औरंगाबाद इथं आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा आज ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या उपस्थित समारोप झाला. या दोन दिवसीय संमेलनात प्रकट मुलाखत, कथाकथन, कवी संमेलन, तसंच परिसंवाद घेण्यात आले. राज्यभरातून शिक्षक साहित्यिक या संमेलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हडप करण्याचा प्रकार कोल्हापूर इथं उघडकीस आला आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांनी एका घरफोडी प्रकरणात जप्त केलेली सहा कोटी रुपये घरफोडीतल्या आरोपींशी संगनमत करून हडप करण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी चंदनशिवे यांना मदत केल्याचं निष्पन्न झालं आहे. या सर्वांविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

सिंगापूर खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या साईप्रणीतनं भारताच्याच के श्रीकांतवर मात करत, पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं दमदार सुरूवात करत, पहिला सेट २१-१७ नं जिंकत सामन्यात आघाडी घेतली, मात्र साईप्रणीतनं पुढचे दोन सेट २१-१७, २१-१२ नं जिंकून विजेतेपद पटकावलं. भारतीय बॅटमिंटनपटूंनी एखाद्या स्पर्धेत विजेतेपद आणि उपविजेतपद मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

****

राज्यात आज चंद्रपूर इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक आठ, उस्मानाबाद इथं ४३ अंश तर औरंगाबाद इथं ४१ पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...