Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची पंतप्रधानांची
घोषणा
Ø मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अंतिम अहवाल १५
नोव्हेंबरपर्यंत सादर होणार
Ø यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार लेखक विजय
कोलते यांना जाहीर
आणि
Ø पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडकडून ११८ धावांनी
पराभव
****
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात
वाढ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल देशभरातल्या
आशा आणि अंगणवाडी सेविकांशी दूरदृष्य संवाद प्रणाली - व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. आतापर्यंत ज्या सेविकांना तीन हजार रुपये मानधन
मिळत होतं, त्यांना आता साडेचार हजार रुपये, तर ज्यांना बाविसशे रूपये मानधन मिळत होते,
त्यांना त्यांना साडेतीन हजार रूपये मानधन दिलं जाणार असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं.
अंगणवाडी मदतनीसांचं मानधन १५०० रुपयांवरुन २,२५० रुपयांपर्यंत वाढवण्यात येत असल्याचं,
तसंच आशा कार्यकर्त्यांना देण्यात येणाऱ्या नित्य प्रोत्साहनात दुप्पट वाढ करण्याची
घोषणा पंतप्रधानांनी केली. याखेरीज सर्व आशा कार्यकर्त्या आणि मदतनीसांना पंतप्रधान
जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा संरक्षण
दिलं जाणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून हे वाढीव मानधन लागू करण्यात येतणार आहे.
राज्यातल्या नंदुरबार, पालघर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या
आशा आणि अंगणवाडी सेविका पंतप्रधानाच्या या चर्चेत सामिल झाल्या होत्या.
पालघर इथल्या अंगणवाडी सेविका अर्पिता पंडित यांनी
आकाशवाणीशी बोलतांना आपली भावना या शब्दात व्यक्त केली, त्या म्हणाल्या
मी पालघर प्रकल्पामधून बोलते
आहे. की जे आपले वार्षीक सन होतात, त्याप्रमाणे आम्ही पोषण आहार जो कार्यक्रम आहे.
तो आम्ही सणा प्रमाणे राबवितो. आणि जो रोबवितो त्याच्या मध्ये आम्हाला एवढा चांगला
प्रतिसाद मिळतो. तो हा मोठा सन झाल्यासारखा आम्ही साजरा केला. आणि नंतर जननी सुरक्षा
जी राबविली गेली आहे. ती जननी सुरक्षामुळे बऱ्याच मातांना त्याचा फायदा झाला.
****
मराठा आरक्षणासंदर्भात
नेमलेला मागासवर्गीय आयोग आपला अंतिम अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करेल, असं राज्य
सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. आरक्षणा संदर्भात मराठा क्रांती मोर्चानं
दाखल केलेल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान काल राज्य सरकारनं, राज्य अनुदानित
शैक्षणिक संस्थां आणि कार्यालयांमध्ये मराठा समुदायाला आरक्षण द्यावं की नाही, यासंदर्भात
आयोग आपल्या शिफारशी सादर करेल, असंही सांगितलं. आयोगाचा अंतिम अहवाल येईपर्यंत आयोगाच्या
अहवालाबाबतचा प्रगती अहवाल दर चार आठवड्यांनी सादर करावा, असे निर्देश न्यायालयानं
यावेळी दिले.
****
महात्मा ज्योतिबा
फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक उपाय योजना राबवण्याचा निर्णय
राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. ही योजना शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयं किंवा संलग्नित रूग्णालयात राबवताना,
विमा निधीतली २० टक्के रक्कम प्रक्रियेतल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता
म्हणून, २५ टक्के रक्कम अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडे देण्याचा
आणि ५२ टक्के रक्कम संबंधित संस्थेतल्या शैक्षणिक, रूग्णालयीन विकासासाठी देण्याचा
निर्णय यावेळी घेण्यात आला.
यवतमाळ तसंच सांगली
जिल्ह्यांमध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं
घेतला आहे. हे महाविद्यालय उभारण्यासाठी १०२ कोटी रूपयांच्या निधीला यावेळी मंजूरी
देण्यात आली.
मुंबईत दहिसर ते
मीरा भाईंदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा दोन मार्गावरच्या
मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
झोपडपट्टी
पुनर्वसन प्राधिकरणानं तयार केलेल्या ‘आसरा’ या
मोबाईल ॲप्लीकेशनचा शुभारंभ काल मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते झाला. झोपडपट्टीवासियांना विविध सोयी सुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीनं
या ॲपचा उपयोग होईल, कामकाजात पारदर्शकता
येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी
व्यक्त केला.
****
बालकांच्या
निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी पोषक आणि संरक्षित वातावरण असणं आवश्यक असून, प्रत्येक
शिक्षकांनी मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे, असं
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या
वतीनं काल मुंबई इथं आयोजित ‘रक्षा अभियाना’चा
शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. शाळांची
गुणवत्ता तपासताना मुलांच्या हक्कासाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होते की नाही
याची तपासणी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
भीमा कोरेगाव इथं एक जानेवारी रोजी घडलेला हिंसाचार
पूर्वनियोजित होता, असा अहवाल यासंदर्भात स्थापन समितीनं पुणे पोलिसांकडे काल सादर
केला. पुणे महापालिकेचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं,
संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी हा कट रचल्याचं, आपल्या अहवालात म्हटलं आहे. आपल्या
समिती सदस्यांनी घटनास्थळी भेट देऊन, ग्रामस्थांशी चर्चा केल्याचं, धेंडे यांनी सांगितलं,
असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, भीमा- कोरेगाव घटनाप्रकरणी संभाजी भिडे
गुरुजींची चौकशी करावी, तसंच त्यांच्या विरोधात पुरावे मिळाले तर त्यांच्यावर कारवाई
करण्याची मागणी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
ते काल अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार पुणे
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसंच सासवड इथं झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचे स्वागताध्यक्ष, लेखक विजय कोलते यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये,
सन्मान चिन्ह, आणि सन्मानपत्र, असं पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या १९ सप्टेंबरला अंबाजोगाई
इथं मुकुंदराज सभागृहात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. पुरस्कारचं हे
सहावं वर्ष आहे.
****
भारत आणि
इंग्लंड कसोटी मालिकेतल्या, पाचव्या सामन्यात इंग्लंडनं भारताला ११८ धावांनी पराभूत
केलं. लोकेश राहूल आणि ऋषभ पंत या दोघांची अनुक्रमे १४९ आणि ११४ धावांची बहारदार शतकी
खेळी इंग्लंडच्या आव्हानासमोर निष्फळ ठरली. या विजयासोबतच इंग्लंडनं ही मालिका ४-१
अशा फरकानं जिंकली. कारकिर्दीतला अखेरचा सामना खेळणारा ॲलिस्टर कुक सामनावीर ठरला असून
कर्णधार विराट कोहली तसंच सॅम करन यांनी मालिकावीर पुरस्कार पटकावला.
****
केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री जनऔषधी योजने अंतर्गत
उच्च गुणवत्ता असलेली स्वस्त औषधी बाजारभावापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध झाली आहेत. औरंगाबाद
जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या पानवडोद गावचे रहिवासी दत्तात्रय पाताळयंत्री यांच्या
औषधांचा खर्च ६० ते ७० टक्के कमी झाला आहे. पाताळयंत्री यांनी आपला अनुभव आकाशवाणीला
सांगितला.
दत्तात्रय भगवान पाताळयंत्री,
राहणार पानवडोद. तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. पोटासाठी त्रास होत होता. पोटात
जखम झालेली होती. त्याच्या नंतर एक अॅसिडिटीची गोळी जवळपास एक महिन्यापासून स्वस्त
औषधी दूकानांत आम्ही खरेदी करतो. आम्हाला बरचं जवळपास ५० ते ६० टक्के फरक पडला भावाच्या
बाबतीत. जनरीकचं आणि तिकडचं जे प्रायवेट दुकान आहे तिथलं.
****
देशातली संरक्षण सामग्री खासगी उद्योजकांना
देण्याची केंद्र सरकारची योजना चुकीची असून, देशासाठी तसंच परराष्ट्र धोरणासही धोकादायक
असल्याची टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो यांनी केली
आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. खासगी उद्योजकांसाठी संरक्षण व्यवहार
खुले करणं, हाच सरकारच्या मेक इंडिया मोहिमेचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला.
****
परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
स्थापन करण्यात यावं या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात काल विद्यार्थ्यांनी
धरणे आंदोलन केलं. शहरातल्या विविध महाविद्यालयातले हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी
झाले होते. या धरणे आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी पी. शिवशंकर
यांना निवेदन सादर केलं.
****
मुंबई गोवा महामार्गावर काल सकाळी एका अपघातात सहा
जण जागीच ठार, तर आठ जण जखमी झाले. मोटारगाडी आणि खासगी आराम बस यांच्यात हा अपघात
झाला.
****
नांदेड - अर्धापूर मार्गावर ट्रक आणि मोटार सायकलच्या
अपघातात मोटारसायकलस्वार दोन तरूण ठार झाले तर एक जण जखमी झाला. खडकुत पाटी जवळ काल
सकाळी हा अपघात झाला.
****
हिंगोली पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता अभिलाष
करेवार याला काल तीन हजार रुपये लाच घेताना, रंगेहात अटक करण्यात आली. इंदिरा आवास
योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांला तिसऱ्या टप्प्याचा धनादेश देण्यासाठी, करेवार यानं लाच
मागितली होती.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं हैद्राबाद इथून आलेला
५१ लाख रूपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाच्या
गुरप्रितकौर सोडी यांची विरोधी पक्ष नेता पदी नियुक्ती झाली आहे. नांदेड महापालिकेच्या
त्या पहिल्याच महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत.
****
परभणी
जिल्ह्यात सेलू ते ढेंगळी पिंपळगाव दरम्यान घेण्यात येणाऱ्या ब्लॉक मुळे काही
रेल्वे गाड्या उशीरा धावणार आहेत. १५ सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर दरम्यान एक दिवसाआड
हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment