आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१५ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
स्वच्छता ही एक सवय असून, ती दैनंदिन आचरणात आणणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वच्छता
ही सेवा या देशव्यापी पंधरा दिवसीय
अभियानाचा नवी दिल्लीत दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आज उदघाटन केलं,
त्यावेळी ते बोलत होते. देशभरात स्वच्छता क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्तींशी पंतप्रधानांनी
यावेळी संवाद साधला. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन
यांनी यावेळी दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. प्रत्येकानं आपल्या
आजूबाजूचा फक्त दहा फूट परिसर जरी स्वच्छ ठेवला, तरी देखील संपूर्ण देश स्वच्छ होईल,
असं मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं, तर
टाटा विश्वस्त मंडळ गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियानात आपलं योगदान देत
असून, यापुढेही योगदान देत राहिल, असं रतन टाटा म्हणाले.
संपूर्ण देशभरात या अभिनायांतर्गत आज स्वच्छता अभियान
राबवलं जात आहे. शालेय विद्यार्थी, आध्यात्मिक
नेते, विविध सहकारी संघांचे सदस्य, स्थानिक प्रशासनातले अधिकारी-कर्मचारी, स्वयं-सहायता गट, तसंच सामाजिक संघटना या अभियानात सहभागी झाल्या आहेत.
***
प्रसिद्ध अभियंते भारतरत्न मोक्षगुंडम् विश्वैश्वरय्या
यांची आज जयंती. विश्वैश्वरय्या यांच्या स्मरणार्थ हा दिवस, अभियंता दिवस म्हणून साजरा
केला जातो. या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी कुलगाम जिल्ह्यात झालेल्या
एका चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान, अतिरेक्यांनी
केलेल्या गोळीबाराला सुरक्षा जवानांनी चोख उत्तर दिलं, या कारवाईत हे तीन दहशतवादी
मारले गेल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हैद्राबाद रेल्वे स्थानक इथं सिग्नल दुरूस्तीच्या
कामामुळे आज पूर्णा-हैद्राबाद, हैद्राबाद-औरंगाबाद आणि हैद्राबाद – परभणी, या प्रवासी
गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. धर्माबाद – मनमाड मराठवाडा एक्सप्रेस ही गाडीही आज
रद्द करण्यात आली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment