Saturday, 15 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 स्वच्छता ही सेवा या देशव्‍यापी पंधरा दिवसीय अभियानाला आजपासून प्रारंभ झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्‍लीत दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून या अभियानाचं आज उदघाटन केलं, देशभरात स्वच्छता क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्तींशी पंतप्रधानांनी यावेळी दूरदृश्यप्रणाली द्वारे संवाद साधला. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर, लडाख इथं तैनात भारत तिबेट सीमा पोलिस दलाचे जवान, यांच्यासह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. प्रत्येकानं आपल्या आजूबाजूचा फक्त दहा फूट परिसर जरी स्वच्छ ठेवला, तरी देखील संपूर्ण देश स्वच्छ होईल, असं मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं, तर  टाटा विश्वस्त मंडळ गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियानात आपलं योगदान देत असून, यापुढेही योगदान देत राहिल, असं रतन टाटा म्हणाले.  



 संपूर्ण देशभरात या अभिनायांतर्गत आज शालेय विद्यार्थी, विविध सहकारी संघांचे सदस्य, स्थानिक प्रशासनातले अधिकारी-कर्मचारी, स्‍वयं-सहायता गट, तसंच सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली. औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही कार्यालय परिसराची स्वच्छता केली. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे.  

****

 जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान, अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा जवानांनी चोख उत्तर दिलं, या कारवाईत हे पाच दहशतवादी मारले गेल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या दहशतवाद्यांचा लष्कर ए तय्यबा तसंच हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची माहिती, पोलिस सूत्रांनी दिली. बँक लूट, शस्त्र लूट प्रकरण तसंच दोन बँक अधिकारी आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात या पाचही दहशतवाद्यांचा शोध सुरू होता, असंही पोलिस सूत्रांनी सांगितलं. या कारवाईच्या वेळी दगडफेक करणारे काही तरुण, पोलिस दलाच्या कारवाईत जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****



 सरकारने चालू खात्यातली तूट आणि रुपयाच्या किमतीमध्ये सातत्याने होत असलेली घसरण रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या मध्ये मार्च अखेरपर्यंत मसाला रोख्यांवर कर आकारणी करणे, तसंच जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान आणि इतर उपास्थितांना अर्थव्यवस्थेबाबत माहिती दिली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून येत्या आठवड्याभरात या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात येईल, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं.

****

 १९९५ नंतर देशभरात एच आय व्हीची नव्यानं लागण होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झालं आहे. राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेनं काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. एच आय व्ही अंदाज २०१७ या नावानं या संस्थेन एक अहवाल जारी केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे. एड्सचा सामना आणि प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहितीही संस्थेनं या अहवालात दिली आहे. २०३० मध्ये या रोगावर संपूर्णपणे मात करण्याचं उद्दीष्ट असल्यामुळे याबाबत कोणत्याही प्रकारची अल्पसंतुष्टता बाळगण्याचं कारण नाही, असंही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

*****

 केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के जे अल्फान्सो यांनी काल छत्तीसगडमधल्या धमतारी जिल्ह्यात पहिल्या आदिवासी पर्यटन सर्कीटचं उदघाटन केलं. पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये केंद्र सरकार भरीव काम करत असून गेल्या चार वर्षात परदेशी पर्यटकांकडून मिळत असलेल्या चलनामध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या तीन वर्षांमध्ये पर्यटकांची संख्या दुप्पट करणे हे सरकारचे ध्येय असल्याचंही अल्फान्सो यावेळी म्हणाले.

****

 सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यात आज पहाटे झालेल्या एका अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेत, दुचाकीस्वार तिघे तरुण ठार झाले. हे तिन्ही तरुण एकाच घरातले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 दरम्यान सातारा जिल्ह्याच्या जावली तालुक्यात एका तरुणाचा वीजेचा धक्का बसल्यान मृत्यू झाला. सार्वजनिक गणेश मंडळात वीजेचा दिवा लावताना, ही दुर्घटना घडली.

****



 अशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईत प्रारंभ होत आहे. भारतासह पाकिस्तान,  श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात आज सायंकाळी उदघाटनाचा सामना होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला सामना येत्या मंगळवारी हाँगकाँगसोबत होणार आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...