Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०६ मार्च
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल
झालेल्या बैठकीत पशुधन आरोग्य आणि रोगप्रतिबंधाकरता तीन हजार ८८० कोटी रुपये तर केदारनाथ
आणि हेमकुंड साहिब रोपवे करता सहा हजार ७३० कोटी रुपये खर्चाला मंजूरी देण्यात आली.
सोनप्रयाग ते केदारनाथ या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या रोपवे विकासाकरता चार हजार
कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाला या बैठकीत मंजूरी देण्यात आल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. याबरोबरच
दोन हजार ७३० कोटी रुपये खर्चाच्या साडे बारा किलोमीटर लांबीच्या हेमकुंड साहिब रोपवेची
माहितीही त्यांनी दिली.
दोन नवीन रोपवे भाविकांचा वेळ
वाचवून प्रवास अधिक सोयीचा करतील तसंच सुधारित पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रम
हे चांगलं पशु-आरोग्य, उच्च-उत्पादकता आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या दिशेनं
टाकलेलं मोठं पाऊल ठरेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
वाढवण बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय
विमानतळ यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल असा विश्वास
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काल विकसित भारतासाठी लघु
- मध्यम उद्योग क्षेत्राचा शाश्वत विकास; या विषयावरील शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या
हस्ते राज्यातल्या विविध लघु आणि मध्यम उद्योगांना उत्कृष्टता पुरस्कार आणि “प्राइड
ऑफ महाराष्ट्र” पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय लघु आणि मध्यम उद्योग उत्पादकता
अभियानाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या रौप्य
महोत्सवी स्थापना दिनानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
विधानसभेत काल राज्यपालांच्या
अभिभाषणावर चर्चा झाली. परभणी जिल्ह्यातले सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी
कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी टीका राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यावेळी केली. तसंच जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं
बोऱ्हाडे नावाच्या युवकाला गरम सळईनं चटके दिल्याचं प्रकरण महाराष्ट्रासाठी दुर्दैवी
आहे असं ते म्हणाले. या घटना थांबवायची गरज त्यांनी व्यक्त केली. यावर बोऱ्हाडे याला
झालेल्या मारहाण प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करावी असे निर्देश पोलीस अधीक्षकांना
दिल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. जखमी
तरुणाच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल चर्चेवर बोलताना सरकारवर
टीका केली. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतरही त्यांचं सदस्यत्व
रद्द होत नाही हा सरकारचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारनं करावी अशी मागणी भाजप आमदार
सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्यातल्या अनेक अंगणवाड्यांमध्ये वीज आणि शौचालय नाही, त्यामुळे अंगणवाडी दत्तक घेऊन तिथं सुविधा द्याव्यात असे मुनगंटीवार
म्हणाले.
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांबद्दल
राज्यपालांच्या अभिभाषणात काहीही उल्लेख नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले. लाडकी
बहिण योजनेतून दहा ते वीस लाख महिलांना अपात्र ठरवलं जात आहे, त्यामुळे ही योजना निवडणुकीसाठी होती असा आरोप त्यांनी केला.
****
शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि संशोधन तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातल्या सौहार्दवृद्धीसाठी
राज्य शासनाने बेल्जियमशी सामंजस्य करार केले. काल मुंबईत बेल्जियमच्या प्रिन्सेस ॲस्ट्रिड
यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात
आलेल्या या करारांमुळे बेल्जियमशी मैत्रीपूर्ण संबंध आणखी मजबूत होतील अशी माहिती यावेळी
देण्यात आली.
****
गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय
राखीव दलाच्या जवानांनी भामरागड तालुक्यातल्या आरेवाडाच्या जंगलातून दोन जहाल नक्षलवाद्यांना
अटक केली आहे. एक पोलीस शिपाई आणि भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी
यांच्या हत्येत हे नक्षलवादी सहभागी होते. केलू पांडू मडकाम उर्फ दोळवा आणि रमा दोहे
कोरचा उर्फ डुम्मी, अशी या दोघांची नावं असून, यापैकी केलू मडकामवर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर
केलं होतं.
****
बालविवाह ही सामाजिक समस्या
सोडवण्यासाठी स्वयंप्रेरणेनं काम करणं आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं
आहे. काल सोयगाव इथं यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक गावात
पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी
प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
****
भारताचे दिग्गज टेबल टेनिसपटू
ए. शरथ कमल यांनी या महिन्याच्या अखेरीस निवृत्ती जाहीर केली आहे. चेन्नईत २५ ते ३०
मार्च दरम्यान होणाऱ्या डब्ल्यूटीटी स्टार कॉन्टेम्पर स्पर्धेत मित्र परिवारासमोर निवृत्ती
घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment