Thursday, 27 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.03.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित-३० जूनपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन

·      विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड

·      महाराष्ट्राची ई-व्हीची राष्ट्रीय राजधानी होण्याकडे वाटचाल-ईव्हीवर सहा टक्के कराचा निर्णय रद्द

·      जीएसटी अभय योजना २०२४जाहीर;अर्ज करण्यासाठी ३० जून पर्यंत मुदत

आणि

·      खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेचा आज समारोप-१५ सुवर्णांसह ३७ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर

****

विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. आगामी पावसाळी अधिवेशन ३० जून पासून मुंबईत सुरू होणार आहे. या अधिवेशनात विधानसभेत १९ बैठकांमध्ये एकूण १४६ तास कामकाज झालं, यामध्ये नऊ विधेयक मंजूर झाल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

विधान परिषदेत १६ बैठकांमध्ये ११५ तास कामकाज झालं, यामध्ये सात विधेयकं संमत करण्यात आली, तर पाच विधेयकं विधानसभेकडे परत पाठवण्यात आल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली.

****

या अधिवेशनात संमत झालेल्या अर्थसंकल्पामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधकांचे प्रश्न ऐकून घेत, त्यावर उत्तरं दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले...

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, या अधिवेशनात मूलभूत विषयांना सरकारनं बगल दिल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ते काल अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षांना मुद्दे मांडण्याची संधी दिली जाईल असं आश्वासन सरकारने दिल्यानंतर सभापतींच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्याचं दानवे यांनी सांगितलं.

विधानसभेत विरोधी पक्षनेते नियुक्तीसाठी १० टक्के सदस्य संख्येची आवश्यकता नसल्याबाबत नियम आणि प्रथा यांचा उल्लेख असलेलं पत्र विधिमंडळ सचिवालयाने दिल्याचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी यापूर्वी अनेक वेळा राज्यात आणि देशाच्या अनेक विधानसभांमध्ये विरोधी पक्षाकडे कमी सदस्य असताना विरोधी पक्षनेते पद दिल्याचे दाखले दिले.

****

विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिलं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवडीची घोषणा केली.

****

भारताची सांस्कृतिक एकता, संविधानातून राजकीय एकतेत परिवर्तित करण्यात आल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल विधानसभेत 'संविधान गौरव' या विषयावर बोलत होते. मानवी जीवनातल्या प्रत्येक घटनेला आपलं संविधान प्रतिष्ठा देत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

महाराष्ट्र हे इलेक्ट्रिक व्हेईकलची राष्ट्रीय राजधानी होत असल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली. ते काल विधान परिषदेत बोलत होते. सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. २०३० सालापर्यंत ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नवी वाहनं ही ई व्हेईकल असावीत, असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले..

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा हजार ५२१ कोटी रुपये गुंतवणुकीचा अन्वी पावर इंडस्ट्रीजचा लिथियम सेल आणि बॅटरी निर्मितीचा प्रकल्प, १४ हजार ३७७ कोटी रुपये गुंतवणुकीचा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प आणि चार हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा जन्सोल इंजिनिअरिंगचा इलेक्ट्रिक चारचाकी वाहन निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे सुमारे १२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

दरम्यान, तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय रद्द करण्यात येणार आहे, मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेत असा कर लावण्याची गरज नसल्याचं समोर आलं, त्यामुळे हा कर लावला जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. आमदारांना यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यांनी जाहीर केलं.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर दिलं. राज्यावर सात लाख कोटीं रुपये कर्ज असलं तरी इतर राज्यांच्या तुलनेत कर्ज घेण्याचं प्रमाण कमी आहे, तसंच ९५ टक्के महसूल जमा झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्यातल्या ५० विकास योजना तर पाच नगर रचना योजनांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेत केली.

****

महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठीचं,‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महाअभियान’,सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा विश्वास, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व्यक्त केला. प्रत्येक महसूली मंडळात वर्षातून चार वेळा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली..

बाईट – चंद्रशेखर बावनकुळे

****

बँकविषयक कायदे सुधारणा विधेयक काल राज्यसभेत मंजूर झालं. बँक खात्यावर वारस म्हणून एकाऐवजी ४ नावं नोंदवण्याची तरतूद या विधेयकात आहे. बँकांच्या लेखा परीक्षकांचं मानधन ठरवण्याचा अधिकार बँकांना देणं, यासह अनेक सुधारणांचाही त्यात समावेश आहे. लोकसभेत हे विधेयक याआधीच मंजूर झालेलं आहे.

****

जीएसटी अभय योजना २०२४’ अंतर्गत कर भरण्यासाठी ३१ मार्च तर अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याकरता ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. २०१७ ते २०२० या आर्थिक वर्षांसाठी जीएसटी कराचे वाद मिटवण्यासाठी ही विशेष सवलत योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य कर सहआयुक्त अभिजीत राऊत यांनी केलं आहे. ही योजना पूर्णपणे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे राबवली जाणार असून, करदात्यांनी संबंधित पोर्टलवर जाऊन अर्ज करण्याचं आवाहन राऊत यांनी केलं.

****

नवी दिल्लीत सुरु असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेचा आज समारोप होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत महाराष्ट्राने १५ सुवर्णांसह एकूण ३७ पदकांची कमाई करत पाचवं स्थान पटकावलं आहे. यामध्ये १३ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे. हरियाणा पहिल्या, तामिळनाडू दुसऱ्या, उत्तर प्रदेश तिसऱ्या तर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’एम.फिल’ची खोटी पदवी प्रमाणपत्र दाखल करुन ’पीएच.डी’ला प्रवेश घेणाऱ्या दोन जणांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी विद्यापीठाची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी काल बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते, तर आरोपींना दूरदृश्यप्रणालीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड तसंच बांधकामाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेतली. या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तहसीलदार, गटविकास अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करण्याबाबत सूचना गावडे यांनी दिल्या.

****

धाराशिव जिल्ह्यात २१ वी पशुगणना मुदतीपूर्वी पूर्ण झाली. जिल्ह्यातली ८९८ गावं आणि शहरी प्रभागांमध्ये सर्व पशुपालक आणि शेतकऱ्यांकडच्या पशुधनाची नोंदणी पूर्ण करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथले कर्मयोगी के ना तथा बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवाचं उद्घाटन येत्या शनिवारी २९ तारखेला सगरोळी इथं होणार असून, याअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत.

****

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या समर्थनार्थ सामाजिक संघटनांनी तसंच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.

****

हवामान

राज्यात काल सर्वात जास्त ४१ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ३७ पूर्णांक सात, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक दोन, परभणी इथं ३९ पूर्णांक सहा अंश तर बीड इथं ३९ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 August 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्र...