Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं
आजपासून वितरण; राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षातली नुकसान भरपाई
देण्याचा निर्णय
·
केंद्रीय मंत्रिमंडळाची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं उत्पादन
योजनेला मंजुरी; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३० तारखेला नागपूर दौऱ्यावर
·
फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या
टप्प्याचं १३ ते २४ एप्रिलदरम्यान पुण्यात आयोजन
आणि
·
१८ वा गोविंद सन्मान संगीत विदुषी सीताभाभी राव यांना
समारंभपूर्वक प्रदान
****
'नमो शेतकरी
महासन्मान निधी योजने'च्या सहाव्या हप्त्यांतर्गत आजपासून ९३
लाख २६ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. सहाव्या हप्त्यात सुमारे
२ हजार १६९ कोटी रुपये रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार आणि डीबीटी संलग्न सक्रीय
बँक खात्यात जमा केली जाईल असं शासनाकडून कळवण्यात आलं आहे.
****
राज्यातील
तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट दोन हजार ५५५ कोटी रुपये विमा नुकसान भरपाई
जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे, राज्याचे कृषी मंत्री
माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली. शासनानं विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित
राज्य हिस्सा अनुदान म्हणून दोन हजार ८५२ कोटी रूपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
खरीपाचे गेले तीन हंगाम आणि रबीच्या गेल्या दोन हंगामासाठी ही नुकसान भरपाई मिळणार
असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.
****
इलेक्ट्रॉनिक्स
क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं उत्पादन
योजनेला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी
दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी २२ हजार कोटींहून अधिक रुपयांची
तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ९१ हजारांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष
रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास वैष्णव यांनी वर्तवला. ते
म्हणाले...
बाईट – अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण मंत्री
केंद्रीय
कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात दोन टक्के वाढीलाही केंद्रीय
मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. चालू वर्षी एक जानेवारीपासून ही वाढ लागू होईल. सुमारे
४८ लाख ६६ हजार कर्मचारी आणि ६६ लाख ५५ हजारावर निवृत्ती वेतनधारकांना या निर्णयाचा
लाभ होईल.
**
एटीएममधून
मासिक मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात १ मेपासून
प्रति व्यवहारासाठी दोन रुपयांनी वाढ होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकांना या
शुल्कवाढीची परवानगी दिली आहे. सध्या हे शुल्क प्रति व्यवहार २१ रुपये असं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या ३० तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात
ते नागपूरला भेट देतील आणि स्मृती मंदिराचं दर्शन घेतील. त्यानंतर ते दीक्षाभूमीला
भेट देतील. त्यानंतर ते माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीचं भूमिपूजन करतील आणि
सभेला संबोधित करतील. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं लॉइटरिंग म्युनिशन टेस्टिंग
रेंज आणि यूएव्हीसाठी रनवे सुविधेचं देखील पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान
मोदी उद्या ३० तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा १२०वा भाग असेल.
****
चौथ्या
महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य
देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह
बांधण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
या स्वच्छतागृहांची देखभाल आणि व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल.
याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात
येणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
साखरेच्या
मासिक साठ्याची मर्यादा निश्चित असून या मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध
सरकार कठोर कारवाई करेल, असा इशारा अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिला आहे. साखरेची
साठेबाजी रोखण्यासाठी आणि दरवाढ नियंत्रित करण्यासाठी एप्रिल महिन्याची साठ्याची मर्यादा
२३ लाख ५० हजार टन इतकी निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात राज्यात
आतापर्यंत आठ कोटी १४ लाख ९२ हजार टन उसाचं गाळप झालं असून, त्यातून
७६ लाख ४३ हजार टन साखरेचं उत्पादन झालं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादनात २४
लाख टन घट होण्याचा अंदाज आहे.
****
विविध माध्यमांमधून
प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे शासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना
अधिक चांगल्या सेवा देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. माहिती आणि जनसंपर्क
महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात
एक महत्त्वपूर्ण परिपत्रक काल जारी करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र
बुद्धिबळ संघटनेच्या वतीने फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या
टप्प्याचं आयोजन करण्यात आलं आहे. १३ ते २४ एप्रिल या कालावधीत पुण्यात ही स्पर्धा
होणार आहे. जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेती आणि ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणारी
ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली, यांच्यासह
विविध देशांच्या बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यापैकी सर्वोत्तम दोन
बुद्धिबळपटू कँडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून पुढच्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेसाठी
चॅलेंजर निश्चित करण्यातही ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.
****
१८ वा गोविंद
सन्मान काल संगीत विदुषी सीताभाभी राव यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर
इथं, ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पंडित विश्वनाथ ओक यांच्या हस्ते सीताभाभींना
हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. स्मृतीचिन्ह आणि ११ हजार रुपये असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे. सीताभाभी यांनी हा पुरस्कार संगीताचा अभ्यास करणारे शिष्य, त्यांचे पालक आणि श्रोत्यांना अर्पण करत असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या...
बाईट – सीताभाभी राव
****
छत्रपती
संभाजीनगर इथं विमानतळ परिसरात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं काल अनावरण
करण्यात आलं. उद्योगमंत्री उदय सामंत, इतर मागास आणि बहुजन कल्याणमंत्री अतुल
सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
मराठा आरक्षण
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची काल बीड इथे एका मेळाव्यात भाषण करताना अचानक
प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
मुलींच्या
जन्माचं घटतं प्रमाण चिंताजनक असून त्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा,असं आवाहन
धाराशिवचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी केलं आहे. धाराशिव
इथे गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व लिंगनिदान तंत्र यासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या
उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते. गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपये बक्षीस यावेळी
जाहीर करण्यात आलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात दोन एप्रिल रोजी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ‘कन्या दिन’ साजरा
करण्यात येणार आहे. याबाबत तालुका, उपविभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी नियोजन
करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
****
हिंगोली
इथं ‘जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव भरवण्यात आला, जिल्हाधिकारी
अभिनव गोयल यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं, या महोत्सवात शेतकरी आणि महिला बचत गटांनी २२ दालनांमधून पौष्टिक तृणधान्यांपासून
तयार केलेल्या विविध पदार्थांची विक्री केली, ज्यातून सुमारे
दीड लाख रुपयांची उलाढाल झाली.
****
मराठवाड्यातील
नागरिक सार्वजनिक समस्यांबाबत जागरूक झाल्याचं, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील ५३ गावांच्या
शेतकरी तसंच अन्य नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या, सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्याची सूचना दानवे यांनी संबंधित प्रशासकीय
अधिकाऱ्यांना केली.
****
No comments:
Post a Comment