Saturday, 29 March 2025

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २९ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं, त्यानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचा आढावाही घेतला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचं तुळजापूर इथल्या हेलिपॅडवर धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील,माजी मंत्री बसवराज पाटील आदींनी त्यांचं स्वागत केलं.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विडंबनात्मक गाण्यासाठी विनोदवीर कुणाल कामरा याच्याविरोधात मुंबईतील खार पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, जळगाव शहराच्या महापौरांनी एक तक्रार दाखल केली असून, नाशिकमधील एक हॉटेल व्यावसायिक आणि एका उद्योजकानं अन्य दोन तक्रारी नोंदवल्या आहेत. खार पोलिसांनी कामरा याला दोनवेळा चौकशीसाठी बोलावलं, मात्र त्यानं हजेरी लावलेली नाही. आता त्याला पुन्हा परवा ३१ तारखेला खार पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

भाजप-प्रणीत केंद्र सरकारविरोधात टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कामरा याने या प्रकरणी माफी मागण्यास नकार दिला आहे.

****

सौर ऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जेच्या अन्य पर्यायांच्या वापरास चालना देण्यासाठी नागरिकांनी पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर करावा, असे आवाहन अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं केलं.

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आणि ऊर्जा दक्षता विभागाच्या संयुक्त विद्यमानं इलेक्ट्रिक वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. टीव्ही सेंटर मैदानापासून सुरु झालेल्या या रॅलीचा क्रांतीचौकात समारोप झाला.

****

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५’ साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र इच्छुकांनी www. awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं केलं आहे. हा पुरस्कार दरवर्षी देशतील ५ ते १८ वर्षाखालील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना प्रदान करण्यात येतो. शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

****

राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचं २५ कोटी ४४ लाख रुपयांचं अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं जमा करण्यात आलं आहे. हे जानेवारी, फेब्रुवारी तसंच मार्च २०२५ अशा तीन महिन्यंचं अनुदान आहे. गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिवस प्रती गाय ५० रुपये इतकं अनुदान देण्यात येतं.

****

म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळानं काल प्रथमच जनता दरबाराचं आयोजन केलं. नागरिकांच्या तक्रारींचं तातडीनं आणि न्याय्य समाधान व्हावं यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून ६० अर्जदारांच्या तक्रारींचे निराकरण मंडळाचे मुख्य अधिकारी किशोरकुमार काटवटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. जनता दरबार दिन आयोजित करणारे छत्रपती संभाजीनगर मंडळ हे म्हाडाचे दुसरे विभागीय मंडळ आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील गाळेधारक, भूखंडधारक, सदनिकाधारक यांना पुढील जनता दरबार दिनामध्ये गाळे, भूखंड, सदनिकांबाबत समस्या आणि अडचणी असतील तर लेखी निवेदन, अर्ज मंडळाकडे सादर करावेत, असं आवाहन म्हाडातर्फे करण्यात आलं आहे.

****

वाशिम जिल्ह्यातल्या क्षय रुग्णांची तपासणी करण्याच्या उद्देशानं जिल्ह्याला मिळालेल्या फिरत्या क्ष-किरण तपासणी वाहनाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या वाहनानं राज्यभरातून प्रथम क्रमांक मिळाला असून ५० हजार रुपयांचं पारितोषिकही जाहीर झालं आहे. केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आंकांक्षित जिल्ह्यामध्ये वाशिमचा समावेश आहे. या अनुषंगानं वाशिम जिल्ह्याला प्राप्त झालेल्या या फिरत्या क्ष-किरण तपासणी वाहनाच्या माध्यमातून क्षयरोग झालं असल्याचं राज्यस्तरावर या संदर्भात करण्यात आलेल्या मूल्यमापनातून स्पष्ट झालं आहे.

****

पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आलं आहे. यामध्ये भालगाव आणि कोलारा या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती चिखलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली.

भालगाव इथं १ हजार ६२० पशुधन तसंच ३ हजार २७३ इतक्या लोकसंख्येसाठी एक टॅंकर तर कोलारा गावाला ४ हजार पशुधन आणि ४ हजार ८५६ इतक्या लोकसंख्येसाठी एक टॅंकर पाणीपुरवठा करेल.

****

No comments: