Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
• सणांतून दिसणारी एकतेची भावना बळकट व्हावी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
• युवकांनी नवी कौशल्यं शिकण्याचं पंतप्रधानांचं `मन की बात`द्वारे आवाहन
• पंतप्रधानांच्या हस्ते नागपूरमध्ये विविध विकास प्रकल्पाचं उदघाटन
आणि
• शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू - कृषीमंत्री कोकाटे यांची माहिती
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या `मन की बात` कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधला. हा या मालिकेतला एकशे विसावा भाग होता. आपल्या सणांतून दिसणारी एकतेची भावना आपल्याला सातत्यानं बळकट करायची आहे, असं प्रतिपादन त्यांनी याद्वारे केलं. महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह, देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात नववर्षाच्या स्वागतानिमित्त साजऱ्या होत असलेल्या रोंगाली बिहू, पोईला बोइशाख, नवरेह सणांच्या, तसंच उद्या साजऱ्या होणाऱ्या ईदच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. परीक्षा संपून लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि युवा वर्गानं नवी कौशल्यं शिकावीत यावर त्यांनी आजच्या मन की बात मध्ये भर दिला. या काळात मुलांनी तंत्रज्ञान, नाट्यकला, पर्यावरणासह विविध विषयांवरची शिबीरं तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. अशा उपक्रमांची माहिती `माय हॉलीडेज` या हॅशटॅगसह सामायिक करावी असं ते म्हणाले. या निमित्तानं पंतप्रधानांनी उन्हाळी सुट्टीसाठी
तयार केलेल्या ` माय भारत` या दिनदर्शिकेची माहिती दिली. उन्हाळा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जल संवर्धनावरही भर दिला. या मोहीमेअंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षांत पावसामुळे वाहून जाणारं अकरा अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अलिकडेच झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. तंदुरुस्तीविषयी बोलताना त्यांनी दिल्लीमध्ये आयोजित `फिट इंडिया कार्निव्हल`विषयी सांगितलं. आपापल्या परिसरात अशा प्रकारचे उत्सव आयोजित करण्याचं आवाहन त्यांनी केलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला केवळ १०० दिवस उरले असल्याचं स्मरण पंतप्रधानांनी करून दिलं. जगभरात भारतीय समुदाय आपल्या सांस्कृतिक संवर्धनासाठी करत असलेल्या कामांची उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असलेल्या `टेक्स्टाईल वेस्ट` अर्थात कपड्यांमुळे निर्माण होत असलेल्या कचऱ्यांच्या नव्या आव्हानाविषयी देखील त्यांनी चर्चा केली. असा कचरा निर्माण करण्यात आज भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची जाणीव त्यांनी श्रोत्यांना करून दिली. मात्र यावरही अनेक स्टार्टअप्स आणि संस्था उपाय शोधत आहेत, शाश्वत फॅशन आणि कचरा
व्यवस्थापनासाठी अभिनव पद्धतीनं काम करत आहेत असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
****
देशवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं ही आपली प्राथमिकता आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर इथं केलं. त्यांच्या हस्ते आज नागपूर इथं माधव नेत्रालय संशोधन केंद्राच्या इमारतीची पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे नागरिकांना मोफत उपचार दिले जात आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्या आहेत. जास्तीत जास्त आणि चांगले डॉक्टर तयार करणं हे सरकारचं ध्येय असल्याचं मोदी म्हणाले. संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असं आवाहन त्यांनी केलं. नागपूर मध्ये विमान उड्डाण चाचण्यांसाठी बांधलेल्या हवाईपट्टीचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मधल्या रेशिमबाग भागातील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांच्या स्मृतीस्थळांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर जाऊन मोदी यांनी डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली. त्या आधी पंतप्रधानांचं आज सकाळी नागपूर मधल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या स्वागताला उपस्थित होते.
****
वर्षप्रतिपदा, अर्थात गुढी पाडव्याचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. रेशमी वस्त्र, कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी
घरोघरी उभारुन, तिची पूजा करुन तसंच रांगोळ्या, झेंडूच्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी कडुनिंबाची पानं आणि
गुळाचा प्रसाद खाल्ला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सोनं, चांदी, इत्यादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी
दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल आहे.
गुढीपाडव्यानिमित्त राज्यातल्या विविध मंदिरांमधे दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सणानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. पैठण इथं, सातकर्णी सम्राट शालिवाहनाच्या प्रसिद्ध तीर्थस्तंभ परिसरातही विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदीरात आज पहाटे गुढी उभारण्यात आली. यानिमत्त आज तुळजाभवानी मातेची अलंकार महापूजा आणि रात्री छबिना मिरवणूक पार पडेल. तसंच पाडवा वाचन होईल. नाशिक तसंच धुळ्यामध्ये मराठी नव वर्ष स्वागतासाठी स्वागत यात्रा काढण्यात आली.
गुढीपाडव्यानिमित्त उत्तर मुंबईत काढण्यात आलेल्या शोभा यात्रांमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आज रमले. त्यांनी कांदिवली इथल्या त्यांच्या लोककल्याण कार्यालयात गुढी उभारून पूजा केली. त्यानंतर ते चारकोप, बोरिवली, दहिसर, मालाड इथं काढण्यात आलेल्या शोभा यात्रांमध्ये सहभागी झाले. त्यांनी यावेळी लेझीम खेळ, ढोल वादनाचा आनंद घेत पालखी खांद्यावर घेतली आणि रथही ओढला.
मुंबईत गिरगाव इथं नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातल्या कौपिनेश्वर मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखीचं पूजन करून मिरवणुकीची सुरुवात केली. डोंबिवलीमधेही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नटून थटून मोठ्या संख्येनं नागरिक स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. रत्नागिरीत आज गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. वेगवेगळे संदेश देणारे विविध चित्ररथ यात्रेत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गोंदियात महिला संघटनांनी एकत्र येत सामूहिक गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत केलं. अकोल्यात पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेतल्या स्त्री-पुरुषांनी दुचाकी फेरी काढली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावरील रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. आज दुपारी घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली. देवीची महाआरती संस्थानचे सचिव, किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोन्थुला यांच्या हस्ते करण्यात आली. नऊ दिवस हा महोत्सव साजरा होणार आहे.
****
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्यात येतील, असं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत, नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनी, वावी यांच्या गोदाम बांधकामाचा प्रारंभ कोकाटे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. `स्मार्ट’ प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं निर्माण झालं आहे. शेतीत भांडवली गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता असून त्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असल्याचं मंत्री कोकाटे यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा आणि नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघानं दिल्ली कॅपीटलविरुद्ध विजयासाठी १६४ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. विशाखापट्टनम इथं सुरू या सामन्यात दिल्ली कॅपीटल संघानं दमदार सुरुवात करताना सहा षटकांत बीन बाद ५२ धावा केल्या आहेत. स्पर्धेतला दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमधे गुवाहाटी इथं संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होईल.
****
वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जनजागृती करिता आज लातूर पोलीस दलातर्फे घेण्यात आलेल्या लातूर मॅरेथॉनमध्ये सुमारे आठ हजार धावपटुंनी सहभाग घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या संदर्भातली माहिती दिली. या मॅरेथॉन स्पर्धेत शालेय विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला, पुरुष तसंच ज्येष्ठांनीही मोठा सहभाग नोंदविला.
****
भारताच्या निहाल सरीननं उझबेकिस्तानच्या ताश्कंद इथं ताश्कंद खुल्या अग्झामोव स्मारक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे. वीस वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरनं दहापैकी आठ गुणांसह हे विजेतेपद मिळवलं. या विजयामुळं निहालला ७.१ दशांश एलो रेटिंग गुण प्राप्त झाले आहेत.
****
उद्याच्या रमजान ईद निमित्त लातूर शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. बार्शी रोडवरील इदगाह मैदानावर नमाज पठणासाठी गर्दी होत असल्याने सकाळी सात ते अकरा या वेळेत वाहतुक मार्गात बदल राहील असं प्रशासानानं कळवलं आहे.
****
परभणी ते मनमाड दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे एक,पाच आणि आठ एप्रिल दरम्यान धावणारी काचीगुडा- नगरसोल जलदगती गाडी नियमित वेळेपेक्षा उशिरानं धावेल.
****
No comments:
Post a Comment