Friday, 28 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.03.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

वित्त विधेयक २०२५ वर काल राज्यसभेत चर्चा होऊन, ते लोकसभेकडे परत पाठवण्यात आलं. त्यानंतर २०२५-२६च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संसदीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली. कर निश्चिती करणं, व्यवसाय सुलभतेला चालना देणं, आणि भारतीय करदात्यांचा सन्मान करणं हा वित्त विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितलं. 

****

देशात विमान तिकिटांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी राज्यांना एव्हिएशन टर्बाइन इंधनावरील व्हॅट कमी करण्याची सूचना, नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी केली आहे. ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. काही राज्यं या इंधनावर २९ टक्के मूल्यवर्धित कर आकारत आहेत, तर काही राज्यांनी हा कर पाच टक्क्यांपेक्षा कमी केल्याचं नायडू यांनी सांगितलं. 

****

देशातल्या प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने २०२४ मध्ये सुमारे अडीच हजार अब्ज रुपयांची उलाढाल केली, तर जाहिरातीतून मिळणारा महसूल आठ पूर्णांक एक दशांश टक्क्यांनी वाढला आहे. फिक्की आणि अर्न्स्ट अँड यंग या संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. गेली २० वर्षं अग्रेसर राहीलेल्या दूरचित्रवाहिन्यांवर आघाडी घेऊन डिजिटल माध्यमांनी १७ टक्के वाढ नोंदवत पहिलं स्थान मिळवलं आहे. मुंबईत काल एका कार्यक्रमात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेव्ज उपक्रमाबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.

****

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं प्रधानमंत्री बाल पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय नागरिक असलेल्या पाच वर्ष वयापेक्षा अधिक आणि १८ वर्षांखालील मुलांसाठी ३१ जुलैपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. हे अर्ज येत्या एक एप्रिपासून राष्ट्रीय पुरस्कार या संकेतस्थळावर उपलब्ध असतील. लहान मुलांनी शोर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, संस्कृती या क्षेत्रात बजावलेल्या अतुलनीय कार्याबद्दल हे पुरस्कार देण्यात येतात.

****

जिंदाल स्टेनलेस स्टील महाराष्ट्रात ४२ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे राज्यात १५ हजार ५०० रोजगार निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस आणि जिंदाल स्टेनलेस स्टीलचे प्रमुख रतन जिंदाल यांची काल मुंबईत बैठक झाली.

****

महाप्रीत, अर्थात महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित, आणि एन बी सी सी इंडिया लिमिटेड, यांनी मुंबईत सामंजस्य करार केला. याअंतर्गत मुंबईतल्या गृहसंकुलाची गरज पूर्ण करण्यासाठी महाप्रित आणि एनबीसीसी या कंपन्या सहकार्य करणार असून, त्यामुळे गृहसंकुलांना पुनर्विकास करण्याची संधी मिळेल.

****

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची 'राज्य ग्राहक हेल्पलाईन' ३१ मार्च रोजी मध्यान्हानंतर बरखास्त करून, ती 'राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन' मध्ये विलीन करण्यात येत आहे. राज्यातल्या सर्व ग्राहकांनी एक एप्रिल पासून आपल्या समस्या आणि तक्रारी या हेल्पलाइनकडे मांडाव्यात, असं विभागाकडून कळवण्यात आलं आहे. कन्ज्यूमर हेल्पलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरही ग्राहकांना समस्या आणि तक्रारी नोंदवता येतील. 

****

पुण्यातल्या कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या दोन निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी, पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, आणि सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. निलंबनानंतर विभागीय चौकशीत ते दोघं दोषी आढळले. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटकेत आहेत.

****

कर्णबधीरांच्या सर्व शाळांमध्ये सांकेतिक भाषेची एकवाक्यता आणि समानता यावी या दृष्टीकोनातून, मुंबईच्या अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थेच्या सहकार्याने तीन दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. या वर्गात प्रशिक्षण घेतलेले शिक्षक, त्यांच्या शाळेतल्या इतर शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातंर्गत हिंगोली, लातूर, नांदेड, आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतल्या ४७ कर्णबधिर विद्यालयांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

****

एका खासगी व्यापारी नौकेवरच्या दहा खलाशांचं समुद्री चाच्यांनी अपहरण केलं असून, त्यातल्या सात भारतीयांमध्ये रत्नागिरीतल्या दोन तरुणांचा समावेश आहे. ही नौका मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ गिनीच्या आखातात असताना १७ मार्चला चाच्यांनी खालशांचं अपहरण केलं, त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

****

सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांना जरब बसवण्यात येत असून पुढच्या टप्प्यात महसूल विभागाच्या सहाय्याने व्हिडीओ पार्लर आणि कॅसिनोंची तपासणी करावी, अशा सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. अंमली पदार्थ कृती दलाच्या सहाव्या बैठकीत ते काल बोलत होते.

****


No comments: