Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध-केंद्रीय
कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन
·
स्थलांतरित-परदेशी नागरिक विधेयक लोकसभेत मंजूर; सहकारी तत्वावर
टॅक्सी सेवेची घोषणा
·
छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड इथं सरकारी रुग्णालयातल्या
मृत्यू प्रकरणी तज्ज्ञ समिती नेमण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
·
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चौघांना जालना
पोलिसांकडून अटक
आणि
·
खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेचा समारोप;१८ सुवर्णांसह
४३ पदकं घेत महाराष्ट्र पाचव्या स्थानी
****
शेतमालाला
योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत
कृषी भवन इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. तूर, मसूर आणि उडदाचं
जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने
घेतला आहे. याकरता शेतकऱ्यांना नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या पोर्टलवर
नोंदणी करावी लागेल, असं चौहान यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना तूर,
मसूर आणि उडदाचा योग्य भाव मिळावा याकरता राज्य सरकारांनी प्रभावी आणि
पारदर्शी खरेदी पद्धत राबवावी असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले...
बाईट – शिवराज सिंह चौहान
****
स्थलांतरित
आणि परदेशी नागरिक विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे देशाची सुरक्षा मजबूत
होईल, अर्थव्यवस्था आणि व्यवसायाला चालना मिळेल, याशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी व्यक्त केला. भारतात येणाऱ्या प्रत्येक विदेशी व्यक्तीची तत्काळ माहिती
या विधेयकामुळे मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, उबर आणि ओला
या टॅक्सीसेवांच्या धर्तीवर केंद्र सरकार सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार शहा यांनी सांगितलं.
ते म्हणाले...
बाईट – अमित शहा
सरकार लवकरच
एका विमा कंपनीची स्थापना करणार असून, ही कंपनी देशातल्या सहकारी व्यवस्थेतले
विम्याचे व्यवहार हाताळेल, असंही शहा यांनी काल सदनात सांगितलं.
****
पश्चिम
महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गासाठी नवी ग्रीन
अलाइनमेंट तयार केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत ही माहिती
दिली. यासाठी १५ हजार कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
यामुळे पुणे-संभाजीनगर अंतर फक्त दोन तासांत पूर्ण होईल असा विश्वास गडकरी यानीं व्यक्त
केला.
****
मंत्रालयात
क्षेत्रीय कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांना यापुढे ‘डिजीप्रवेश’
या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे प्रवेश मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांगांना
दुपारी १२ वाजेनंतर, तर इतर सर्व अभ्यागतांना दुपारी दोन वाजेनंतर प्रवेश देण्यात येईल.
अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेशासाठी आधार कार्ड, वाहन परवाना,
पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणंही बंधनकारक करण्यात आलं
आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर तसंच नांदेड इथल्या सरकारी रुग्णालयांमध्ये २०२३ साली मृतांच्या वाढलेल्या
संख्येचा तपास करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचं दिले
आहेत. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या पीठाने, रुग्णांच्या
मृत्यूच्या प्रमाणात झालेली वाढ गंभीर असल्याचं निरीक्षण नोंदवत, तपास समिती नेमण्याचे आदेश दिले.
****
आयपीएल
क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
काल अटक केली. कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान सुरू
असलेल्या सामन्यावर आरोपी सट्टा लावत असतांना ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून
मोबाईल आणि इतर साहित्य, असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
खेलो इंडिया
पॅरा क्रीडा स्पर्धेचा काल नवी दिल्लीत समारोप झाला. शेवटच्या दिवशी झालेल्या खेळांमध्ये
टेबिल टेनिसच्या अंतिम फेरीत शशिधर कुलकर्णी, दत्तप्रसाद ज्योतिराम चौगुले आणि विश्वविजय
तांबे यांनी विविध श्रेणींमध्ये सुवर्णपदकं जिकंली. तर महिलांच्या गटात देवयानी वाल्हे
हिनंही सुवर्णपदक पटकावलं.
या स्पर्धेत
महाराष्ट्र ४३ पदकासंह पदकतालिकेत पाचव्या स्थानावर राहीला. त्यात १८ सुवर्ण, १३ रौप्य
आणि १२ कास्य पदकांचा समावेश आहे. पहिल्या स्थानावर हरयाणा असून त्यानंतर तामिळनाडू,
उत्तर प्रदेश, राजस्थान यांचा समावेश आहे.
****
लातूर महानगरपालिकेचं
२०२५-२६ या वर्षासाठीचं १७ लाख रुपये शिलकीचं अंदाजपत्रक आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी
काल सादर केलं. आगामी वर्षासाठी एक हजार ६४ कोटी सात लाख रुपये अपेक्षित जमा होणार
असून, एक हजार ६३ कोटी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. करवाढ नसलेलं
हे अंदाजपत्रक असल्याचं, मनोहरे यांनी सांगितलं:
बाईट - आयुक्त बाबासाहेब
मनोहरे
****
जालना इथं
पाच दिवसीय गोदा समृद्धी कृषी महोत्सवाचं उद्घाटन काल महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात
आलं. या महोत्सवात कृषी निविष्ठा, कृषी औजारे, बचत
गटांचे स्टॉल्स यासह गहू, ज्वारी, डाळी
विविध प्रकारचे धान्य विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या महोत्सवास भेट देण्याचं आवाहन जिल्हा
कृषी विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्हा
परिषदेच्या वतीने काल तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यशाळा
घेण्यात आली. या कार्यशाळेत पाणी गुणवत्ता, तसंच पेयजलाची देखभाल, आदींबाबत प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात आली.
****
‘चला जाणू या
नदीला’ या उपक्रमांतर्गत आज बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील
विडा इथं बोबाटी नदी संवाद परिक्रमेचं उद्घाटन होणार आहे. राज्यातल्या नद्या अमृतवाहिनी
करण्याचा संकल्प या उपक्रमात करण्यात आला आहे.
****
महाराष्ट्र
वैद्यकीय परिषदेवर एकूण नऊ सदस्य निवडणुकीसाठी पुढच्या गुरुवारी तीन एप्रिल रोजी निवडणूक
घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी आठ
ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप
स्वामी यांनी ही माहिती दिली.
****
गाळमुक्त
धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात भोकर इथं सुधा प्रकल्पातला गाळ काढण्याचा
शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते काल करण्यात आला. नारवट इथल्या वन
विभागाच्या तळ्यातला गाळ काढण्याचं कामही हाती घेण्यात आलं असून, श्रमदानातून
ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम हात, पाय आणि कॅलिपर्स
वितरण शिबीरांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड,
फुलंब्री, तसंच वाळुज इथं येत्या तीन एप्रिलपर्यंत
ही शिबीरं होणार आहेत. गरजूंनी या शिबीराचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
ही शिबीरं, भारतीय कृत्रिम अवयव निर्माण निगम, सक्षम देवगिरी प्रांत, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग
आणि इतर सामाजिक संघटनांच्या सहकार्यानं भरवण्यात येत आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या
कळवण तालुक्यामध्ये बांगलादेशी शेतकऱ्यांनी शेतकरी पीक विम्याचा लाभ घेतल्याची घटना
समोर आल्यानंतर या प्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी १८१ बोगस शेतकऱ्यांच्या विरोधात
शासनाची दोन कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
****
परभणीच्या
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे आणि क्रीडा अधिकारी नानकसिंग महासिंग बस्सी या
दोघांना दीड लाख रुपये लाच स्वीकारताना काल रंगेहात पकडण्यात आलं. परभणी इथं २०२४ मध्ये
घेतलेल्या क्रीडा स्पर्धांसह क्रीडा ॲकॅडमीच्या जागेवर उभारलेल्या स्विमिंग पुलाच्या
बांधकामाचं देयक काढण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती.
****
बीड जिल्ह्यात
पाटोदा पंचायत समितीमध्ये कार्यालयीन कामाविषयीच्या तक्रारींविरुद्ध काल आंदोलन करण्यात
आलं. लाचखोरीचा आरोप करत, शेतकऱ्यांनी ५० लाख रुपयांच्या खोट्या नोटा उधळत आंदोलन केलं.
****
हवामान
राज्यात
काल सर्वात जास्त ४२ अंश सेल्सिअस तापमान अकोला
इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर इथं अनुक्रमे ३८ आणि
३९ अंश तर परभणी तसंच बीड इथं ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment