Thursday, 27 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.03.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 27 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ मार्च २०२ सकाळी .०० वाजता.

****

जागतिक रंगभूमी दिन आज साजरा होत आहे. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे हा दिन उत्साहाने साजरा होतो.

****

राज्यातल्या नागरीकांना त्यांच्या घरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातच उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना आणि आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात याव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करुन आरोग्य क्षेत्रातल्या सुविधा अत्याधुनिक दर्जाच्या उभाराव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यावेळी उपस्थित होते.

****

बँकविषयक कायदे सुधारणा विधेयक काल राज्यसभेत मंजूर झालं. बँक खात्यावर वारस म्हणून एकाऐवजी चार नावं नोंदता यावी अशी तरतूद या विधेयकात आहे. बँकांच्या लेखा परीक्षकांचं मानधन ठरवण्याचा अधिकार बँकांना देणं, इत्यादी सुधारणा त्यात समाविष्ट आहेत. लोकसभेनं याआधीच हे विधेयक मंजूर केलं आहे.

****

लोकसभेत काल त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५ मंजूर झालं. त्यानुसार गुजरातमधल्या आणंद इथल्या ग्रामीण व्यवस्थापन संस्थेचं नाव बदलून त्रिभुवन सहकारी विद्यापीठ असं होणार असून, संस्थेला विद्यापीठाचा तसंच राष्ट्रीय महत्वाच्या संस्थेचा दर्जा दिला जाणार आहे.

****

देशभरातल्या सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधले धान्य व्यापारी, अडते आणि प्रक्रियाकर्त्यांनी त्यांच्याकडचा गव्हाचा साठा येत्या एक एप्रिलपासून दर आठवड्याला सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर जाहीर करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. देशातली अन्न सुरक्षा राखण्यासाठी आणि बाजारभावातले चढउतार नियंत्रित करण्यासाठी आखलेल्या सर्वसमावेशक धोरणाला अनुसरून हा आदेश दिला असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.

****

बालपणीचा काळ हा रम्य, सुखाचा बनवण्यामध्ये बडबडगीतांचा महत्त्वाचा वाटा असतो. याच गीतांच्या जतन-संवर्धनासाठी आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या अभिनव स्पर्धेत भारतीय सांस्कृतिक परिप्रेक्षाशी मिळतीजुळती असणारी बडबडगीतं तीन विभागात पाठवता येणार आहेत. २२ एप्रिलपर्यंत सुरू राहणाऱ्या या निःशुल्क स्पर्धेची माहिती माय जिओव्ही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

कायदा सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी आहे, या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल ही माहिती दिली. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन नागपूर हिंसाचारासह राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सविस्तर निवेदन दिलं.

****

राज्यातल्या औद्योगिक वसाहतीमंध्ये होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी केमिकल प्रक्रियांवरील नियंत्रण, सुरक्षा आणि उपाय योजनांसाठी ‘एसओपी’ तयार केली जाईल, असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी काल सांगितलं. केमिकल कारखान्यांसाठी कडक नियम लागू करण्यात येतील, यासाठी उद्योग विभाग, कामगार विभाग आणि संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन केमिकल कारखान्यात घडणाऱ्या दुर्घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कंपन्यांच्या सुरक्षितता उपाययोजनांची तपासणी करण्यात येईल, असं त्यांनी काल विधानसभेत सांगितलं.

****

पार- गोदावरी या एकात्मिक नदी जोड प्रकल्पाचं पाणी दिंडोरी-चांदवड-येवला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर-गंगापूर या दुष्काळी भागात नेण्यासाठी, मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

****

कैद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे निर्देश, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलत होते. या प्रशिक्षणामुळे कैद्यांना रोजगार संधी उपलब्ध होतील, तसंच त्यांच्यात सकारात्मक मानसिक बदल घडतील असं ते म्हणाले. जिल्ह्यातल्या विविध संस्था आणि विभागांच्या मदतीने हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं स्वामी यांनी सांगितलं.

****

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलिकरण आणि स्‍वाभिमान योजनेअंतर्गत कन्‍नड तालुक्‍यातल्या ६० लाभार्थ्‍यांना सोडत पद्धतीने २१२ एकर जमीन वाटप करण्‍यात आली. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार विद्याचरण कडवकर यांच्या उपस्थितीत काल ही सोडत काढण्यात आली.

****

No comments: