Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
· भारताची सांस्कृतिक एकता संविधानातून राजकीय एकतेत परिवर्तित-मुख्यमंत्र्यांचं
प्रतिपादन
· महाराष्ट्राची ई-व्हीची राष्ट्रीय राजधानी होण्याकडे वाटचाल-ईव्हीवर सहा टक्के
कराचा निर्णय रद्द
· विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड
· ‘जीएसटी अभय योजना २०२४’ला ३० जून पर्यंत मुदतवाढ
आणि
· खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंची आतापर्यंत १४ सुवर्णासह ३६ पदकांची
कमाई
****
भारताची सांस्कृतिक एकता, संविधानातून
राजकीय एकतेत परिवर्तित करण्यात आल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केलं आहे. ते आज विधान सभेत ‘संविधान गौरव’ या
विषयावर बोलत होते. मानवी जीवनातल्या प्रत्येक घटनेला आपलं संविधान प्रतिष्ठा देत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
महाराष्ट्र हे इलेक्ट्रिक व्हेईकलची राष्ट्रीय
राजधानी होत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, ते विधान परिषदेत प्रदुषणाच्या
मुद्यावर बोलत होते. सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक
करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. २०३० सालापर्यंत ८० ते ९० टक्क्यांपर्यंत
नवी वाहनं ही ई व्हेईकल असावीत, असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं, ते म्हणाले.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक
वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र
मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन असा कर लावण्याची गरज नाही असा निर्णय झाला. त्यामुळे
हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. आमदारांना
यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यांनी जाहीर केलं. दरम्यान, केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा
निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या
उत्तरात स्पष्ट केलं.
****
राज्यात पायाभूत सुविधांची दहा लाख कोटी
रुपयांची कामं सुरु आहेत,
शेती, उद्योग, ऊर्जा क्षेत्रात उत्साहाचं
वातावरण आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज विधान परिषदेत अंतिम
आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यावर सात लाख कोटीं रुपये कर्ज
असलं तरी इतर राज्यांच्या तुलनेत कर्ज घेण्याचं प्रमाण कमी आहे, तसंच
९५ टक्के महसूल जमा झाल्याकडे उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.
दरम्यान, आपल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्र्यांनी
समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचं, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं
आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे अनेक मुद्दे आपण उपस्थित केले होते त्यांचा उल्लेख उत्तरात
झाल नाही अशी खंत दानवे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांनी याबाबत
बोलतांना, शेतकऱ्यांची कर्जमाफी,
कुपोषण, दलितांवरील अत्याचार याबद्दल उपमुख्यमंत्री
काहीच बोलले नाहीत असं नमूद केलं.
****
महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी
आणि महिलांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठीचे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान
शिबिर महाअभियान’ सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व्यक्त केला. प्रत्येक महसूली मंडळात
वर्षातून चार वेळा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरासाठी २५ हजार
रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून, वर्षाला किमान १६०० शिबिरे घेतली
जातील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
****
विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे
अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मांडलेल्या
प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर
आवाजी मतदानाने अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांनी ही घोषणा केली. त्यानंतर सभागृहाच्या वतीने बनसोडे यांचं अभिनंदन करण्यात आलं.
****
पार- गोदावरी या एकात्मिक नदी जोड प्रकल्पाचे
पाणी दिंडोरी-चांदवड-येवला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर या दुष्काळी
भागात नेण्यासाठी मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात
आल्या आहेत,
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
आज यासंदर्भात बैठक घेण्यात आली, त्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
****
देशभरातल्या सर्व राज्ये आणि केंद्रशासित
प्रदेशांतले धान्य व्यापारी, अडते आणि प्रक्रियाकर्त्यांनी त्यांच्याकडचा
गव्हाचा साठा येत्या एक एप्रिलपासून दर आठवड्याला सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर जाहीर
करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. देशातली अन्न सुरक्षा राखण्यासाठी आणि बाजारभावातले
चढउतार नियंत्रित करण्यासाठी आखलेल्या सर्वसमावेशक धोरणाला अनुसरून हा आदेश दिला असल्याचं
सरकारी पत्रकात म्हटलं आहे.
****
स्वित्झर्लंडमधल्या दावोस मध्ये यावर्षी
झालेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत झालेल्या ५१ सामंजस्य करारांपैकी १७ करारांना मंजुरी
मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याअंतर्गत तीन लाख
९२ हजार ५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला कालच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता
दिल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. यामुळे राज्यात एक लाख ११ हजार ७२५
प्रत्यक्ष आणि अडीच ते तीन लाख प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
याअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन मोठे
प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दहा हजार ५२१ कोटी रुपये गुंतवणुकीचा अनवी पावर इंडस्ट्रीजचा
लिथियम सेल आणि बॅटरी निर्मितीचा प्रकल्प, १४ हजार ३७७ कोटी रुपये गुंयवणुकीचा
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प आणि चार हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा जन्सोल इंजिनिअरिंगचा
इलेक्ट्रिक चारचाकी बनवण्याच्या प्रकल्पाचा यात समावेश आहे. यात मिळून सुमारे १२ हजार
रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
‘जीएसटी अभय योजना २०२४’अंतर्गत कर भरण्यासाठी ३१ मार्च तर अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी
अर्ज दाखल करण्याकरीता ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे.२०१७ ते २०२० या आर्थिक
वर्षांसाठी जीएसटी कराचे वाद मिटवण्यासाठी ही विशेष सवलत योजना केंद्र सरकारने सुरु
केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य कर सहआयुक्त अभिजीत राऊत यांनी केले
आहे. करदात्यांनी ठराविक मुदतीत रक्कम भरल्यास या योजनेअंतर्गत माफ केले जाईल.
ही योजना पूर्णपणे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे
राबवली जाणार असून,
करदात्यांनी संबंधित पोर्टलवर जाऊन अर्ज करण्याचं आवाहन राऊत
यांनी केलं.
****
नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा
स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत १४ सुवर्णपदकांसह एकंदर ३६ पदकं पटकावली
आहेत. यात मैदानी स्पर्धांमधल्या १० सुवर्णपदकांचा समावेश आहे. भालाफेकमध्ये एफ तेरा
या प्रकारात प्रतीक पाटीलनं कास्यपदक तर कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिनं महिलांच्या
गोळाफेकमध्ये रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या एफ 56 प्रकारात मीना पिंगाने हिने
थाळीफेक मध्ये तिसरं स्थान मिळवलं. राजश्री कासदेकर हिने भालाफेकमध्ये कास्यपदक प्राप्त
केलं. एकूण ३६ पदकांसह महाराष्ट्र पदक पालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
****
आयपीएल टीट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी
फेरीत आज राजस्थान रॉयल्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. गुहाहाटी
इथंल्या बरसापारा स्टेडियम इथं हा सामना खेळाला जाणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता
सामन्याला सुरुवात होईल.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष
देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली. या
सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते, तर आरोपींना दूरदृश्यप्रणालीद्वारे
न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील
मेंढवन गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बढे यांना जम्मू - काश्मीरमधील भारत - पाकिस्तान
नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना वीरमरण आलं, त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या
गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरसैनिकाला गावकऱ्यांनी साश्रूनयनांनी
अखेरचा निरोप दिला.
****
बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक
थोरात यांच्या समर्थनार्थ सामाजिक संघटनांनी तसंच इंडियन मेडिकल असोसिएशन आज जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर आंदोलन केलं. डॉ.थोरात यांचे निलंबन रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन
आयएमएच्यावतीने सर्व डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
****
No comments:
Post a Comment