Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 29 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
छत्तीसगडमध्ये, सुकमा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत किमान १६ नक्षलवादी ठार झाले आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत, केरलापाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात सकाळी ही चकमक झाली. ही कारवाई अजूनही सुरूच असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक इथल्या उपकेंद्राला कोणत्याही व्यक्तीचं नाव देण्यास माजी मंत्री आणि महात्मा फुले समता परीषदेचे नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. नाशिकमध्ये काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असून त्यांची अनेक उपकेंद्रं आहेत, अशाच प्रकारे राज्यातील अनेक विद्यापीठांची उपकेंद्रं असून त्यांना कोणत्याही प्रकारे वेगळं नाव दिलेलं नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्रास नाव देण्याचा वेगळा पायंडा कशासाठी असा प्रश्न त्यांनी केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका सभेत नाशिकच्या उपकेंद्रास नाव देण्यावरून वाद झाला हेाता. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी हे मत मांडलं.
****
त्र्यंबकेश्वर इथं २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारे साधू संत आणि भाविकांसाठी कुशावर्ताप्रमाणेच नवं कुंड उभारण्यात येईल, तिथल्या विविध घाटांचं विस्तारीकरण आणि स्वच्छता करण्यात येईल तसंच गोदावरी नदी वाहती राहण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महाजन यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन विविध घाटांची आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या पाच आणि सात एप्रिल रोजी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक गट - ब, वैज्ञानिक सहायक गट - क, वैज्ञानिक अधिकारी गट - ब आणि वैज्ञानिक सहायक संगणक गुन्हे, ध्वनी आणि ध्वनीफित विश्लेषण गट - क संवर्गातील पदं निव्वळ कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार असून या परीक्षेबाबत सुधारित वेळापत्रक तसंच ठिकाण नव्याने कळवण्यात येईल, असं न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयानं म्हटलं आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावरील विस्तारीकरणाचं काम पूर्ण झाल्यामुळं परभणी ते नांदेड एक्सप्रेस ही रेल्वे आज आणि उद्या तिच्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. विस्तारीकरणाच्या या कामामुळं परभणी ते नांदेड ही रेल्वेगाडी काही दिवस रद्द करण्यात आली होती.
****
लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक असलेल्या ३ कोटी ३२ लाख ६८ हजार रुपयांचा निधी, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठास वर्ग करण्याचा शासन आदेश निघाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर लातूर जिल्हा रुग्णालयाची उभारणी पूर्ण होऊन तिथं रुग्णसेवा सुरु होईल असा विश्वास, आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
लातूर जिल्हा रुग्णालय, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात लातूर इथं नवीन १०० खाटांचं जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आलं होतं.
****
राज्यात काल सर्वात जास्त ४२ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ३८ पूर्णांक दोन अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक आठ अंश, बीड इथं ३९ पूर्णांक चार तर परभणी इथं ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
जॉर्डनमधील अमान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालानं सुवर्णपदक जिंकलं असून अंतिम पंघाल हिनं कांस्यपदक जिंकलं आहे.
महिलांच्या ६२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मनीषानं कोरियाच्या ओके जू किमचा ८-७ असा पराभव केला. ५३ किलो वजनी गटातील कांस्यपदक प्ले-ऑफच्या फेरीत अंतिम पंघाल हिनं तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर तैपेईच्या मेंग ह्सीहचा पराभव केला. भारतीय कुस्तीगीरांनी या स्पर्धेत आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली असून पुरुषांची फ्रीस्टाइल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे.
****
क्रिकेट -आयपीएल स्पर्धेत आज गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. काल रात्री चेन्नई इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १९६ धावा केल्या, प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४६ धावा करता आल्या.
****
No comments:
Post a Comment