Monday, 31 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.03.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३१ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करण्यात आलं.   

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव बंधुता, सहकार्य आणि करुणेचा संदेश देतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

हा सण समाजात आशा, आकांक्षा, सद्भाव आणि दयाळूपणाची भावना वृद्धिंगत करेल, असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी, सगळ्यांना आनंद आणि यश मिळण्याची प्रार्थना केली. 

राज्यभरातही ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. 

छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं. 

हिंगोली इथंही आज सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुस्लिम बांधवांना पोलिसांच्या वतीने ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

****

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० नक्षलवाद्यांनी काल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात प्रत्येकी ६८ लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या १४ नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

दरम्यान, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन एका आदिवासी महिलेचा काल मृत्यू झाला. तर गडचिरोली जिल्ह्यात जुव्वी गावातल्या एका व्यक्तीची नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री हत्या केली. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

****

राज्यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर झाली. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. चारचाकी प्रकारात यंदा २२ हजार ८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून, ही मागील वर्षीच्या तुलनेत चार हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८ पर्णांक ८४ इतकी आहे. 

****

अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं काल गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर नाईट लँडिंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी इंडिगो कंपनीच्या यात्रेकरू विमानाचं यशस्वी लँडिंग झालं. भाजपचे माजी खा. डॉ. सुजय विखे यांच्यासह विमान प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सेवेमुळे हवाई प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात, असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचं लोकार्पण आणि अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक इथं करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एसटी बस स्थानकांचं सुशोभीकरण, बस स्थानकांची आणि बसेसच्या नियमित स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असून, एसटी स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी एसटी बसमधून प्रवास करत प्रवाश्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती घेतली. 

****

जालना इथं काल दु:खी आणि ना. धो. महानोर पुरस्कारांचं वितरण "कवितेचा पाडवा" या कार्यक्रमात साहित्यिक महावीर जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. लेखक, साहित्यिकांनी चांगली लेखणी घेऊन सक्षमपणे समाज साकारावा लागेल असं मत, जोंधळे यांनी यावेळी व्यक्त केलं. उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  २७ वा "दु:खी" राज्य काव्य पुरस्कार कवी -गीतकार प्रकाश होळकर यांना, तर ना. धों. महानोर राज्य साहित्य पुरस्कार ज्येष्ठ लेखक रफीक सूरज यांना यावेळी प्रदान करण्यात आला. 

****

लातूर पोलीस दलातर्फे काल घेण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये सुमारे आठ हजार धावपटुंनी सहभाग घेतला. वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जनजागृतीसाठी ही मॅरेथॉन काढण्यात आली.  

****

परभणी ते मनमाड दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे एक, पाच आणि आठ एप्रिल दरम्यान धावणारी काचीगुडा- नगरसोल जलदगती गाडी नियमित वेळेपेक्षा उशिरानं धावेल. तर औरंगाबाद-गुंटूर ही गाडी एक ते आठ एप्रिल दरम्यान दुपारी पाच वाजून ४० मिनिटांनी सुटेल, अशी माहिती रेल्वे विभागानं दिली आहे. 

****

हवामान

राज्यात काल सर्वात जास्त ४२ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक चार, तर परभणी इथं ३९ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

****


No comments: