Monday, 31 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.03.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन होईल. उद्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

****

देशभरात आज ईद-उल-फित्रचा उत्साह आहे. मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता ईदच्या दिवशी होते. रमजान ईदनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

हा सण समाजात आशा, आकांक्षा, सद्भाव आणि दयाळूपणाची भावना वृद्धिंगत करेल, असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी, सगळ्यांना आनंद आणि यश मिळण्याची प्रार्थना केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रमजान ईद हा सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक असल्याचं पवार यांनी समाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

राज्यभरातही ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं.

हिंगोली इथंही आज सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुस्लिम बांधवांना पोलिसांच्या वतीने ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

****

छत्तीसगढमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. बिजापूर - दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवत असताना आज सकाळी ही चकमक झाली. घटनास्थळावरुन काही शस्त्र, दारुगोळा जप्त करण्यात आला.

****

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं उद्यापासून तीन एप्रिल पर्यंत नवी दिल्ली इथं विकसित भारत युवा संसदेचं आयोजन केलं आहे. देशभरातल्या ७५ हजार युवांनी माय भारत पोर्टलमधे आपली व्हिडिओ नोंद केली आहे. जिल्हा नोडल फेरी, राज्य फेरी आणि राष्ट्रीय फेरी अशा तीन टप्प्यात विकसित भारत युवा संसद होत असल्याचं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सांगितलं.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं काल गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवणे अर्थात नाईट लँडिंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी इंडिगो कंपनीच्या यात्रेकरू विमानाचं यशस्वी लँडिंग झालं. भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह विमान प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सेवेमुळे हवाई प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना इथं काल दु:खी राज्य काव्य पुरस्कार आणि ना. धो. महानोर पुरस्कारांचं वितरण कवितेचा पाडवा या कार्यक्रमात साहित्यिक महावीर जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  २७ वा दु:खी राज्य काव्य पुरस्कार कवी -गीतकार प्रकाश होळकर यांना, तर ना. धों. महानोर राज्य साहित्य पुरस्कार ज्येष्ठ लेखक रफीक सूरज यांना  यावेळी प्रदान करण्यात आला.

****

धाराशिव जिल्ह्यात भूम इथल्या खवा क्लस्टरमध्ये इंडक्शन मशीनवर खवा निर्मितीसाठी वीज जोडणीला शासनाची मान्यता मिळाली आहे. इंडक्शन मशीनद्वारे सोलरवर खवा निर्मिती करण्याचा भारतातला पहिला प्रकल्प भूम इथल्या या क्लस्टरमध्ये सुरु करण्यात आला आहे. परंतू, वीज जोडणी घेत असताना खवा उत्पादनासाठी इंडस्ट्रियल टेरिफच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाते, त्यामुळे महावितरणचे दर खवा उत्पादकांना परवडत नव्हते. मात्र, सोलर इंडक्शन मशीनवर खवा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एग्रीकल्चर अँड ऑदर या टेरिफमध्ये वीज जोडणी मिळणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट प्रतीच्या खव्याच्या निर्यातीमध्ये भर पडेल. यासाठी निर्मल प्रॉडक्ट असोसिएशन, खवा क्लस्टरचे अध्यक्ष विनोद जोगदंड यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. या वीज जोडणीला मान्यता मिळाल्यामुळे खवा उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

****

वाशिम इथं दोन दिवसीय महाड सत्याग्रह स्मृती व्याख्यानमालेचा काल समारोप झाला. यावेळी मुंबई इथले घटनातज्ञ विधिज्ञ डॉक्टर सुरेश माने यांचं भारतीय राज्यघटनेचा भारत विरुद्ध राज्यकर्त्यांचा हिंदुस्तान या विषयावर व्याख्यान झालं. लोकशाहीमध्ये अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक दोघांचाही जातीयवाद धोकादायक असला, तरी बहुसंख्याकाचा जातीयवाद लोकशाहीला मारक ठरतो, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

जॉर्डनची राजधानी अम्मान इथं झालेल्या अशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाईल प्रकारात दीपक पुनिया आणि उदित यांनी काल रौप्य पदकं पटकावली. दिनेशने १२५ किलो वजनी गटात तुर्कमेनिस्तानच्या खेळाडुला नमवत कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताने दहा पदकं जिंकली, यामध्ये एक सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

हवामान

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

****

No comments: