Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर, रेशीम बाग
आणि दीक्षाभूमीवर आदरांजली अर्पण करणार
·
तुळजाभवानी विकास आराखड्यासाठी तत्काळ निधी जारी करण्याचं
मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
·
छत्रपती संभाजी महाराज यांना ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त
विविध कार्यक्रमातून अभिवादन
·
वाढत्या तापमानामुळे राज्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात
भरवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश
·
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह-विविध ठिकाणी शोभायात्रांचं
आयोजन
आणि
·
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना
जालना पोलिसांकडून अटक
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत. रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर इथं डॉ केशव
बळीराम हेडगेवार यांना ते आदरांजली वाहतील. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या
हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला, त्या दीक्षाभूमीलाही ते भेट देऊन आदरांजली
वाहणार आहेत. माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते
होणार असून, त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
नागपूरमधल्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं युद्धोपयोगी सामग्री चाचणी तळ
आणि यूएव्हीसाठी धावपट्टीचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, आकाशवाणीवरच्या
‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमातून पंतप्रधान आज देशवासियांशी संवाद साधतील. या कार्यक्रम
मालिकेतला हा १२० वा भाग आहे.
****
वैद्यकीय
विद्यार्थ्यांनी आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सतत शिकत राहावं, असं आवाहन,
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नागपूरच्या अखिल भारतीय
आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला ते काल संबोधित करत
होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना, थॅलेसेमिया
आणि सिकलसेल ॲनिमिया यांसारख्या आजारांवर आधुनिक उपचारांची गरज व्यक्त केली.
****
श्री तुळजाभवानी
मंदिर विकास आराखड्यासाठी तत्काळ निधी जारी करण्याचं आश्वासन, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते काल तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन
घेतल्यानंतर बोलत होते. यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
यांनी कवड्याची माळ घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचा
आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. पुढच्या दोन वर्षांमध्ये या तीर्थक्षेत्राचा कायापालट
होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फडणवीस
यांनी मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या कामांची, छत्रपती शिवाजी
महाराज प्रवेशद्वाराची पाहणी केली, तसंच ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचं
अनावरण केलं.
दरम्यान, पंढरपूर इथं
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामाची देखील
मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. या मंदिराच्या जिर्णोद्धाराचं काम आषाढी एकादशीपर्यंत
पूर्ण होणार असून, पंढरपूर कॉरिडॉरचं काम सर्वांना विश्वासात
घेऊन करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त काल पुणे जिल्ह्यातल्या वढू बुद्रुक
इथं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री
अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजी
महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. तुळापूर आणि वढू इथं संभाजी महाराजांच्या
स्मारकाचं काम हाती घेतलं असून, त्याच्या भव्यतेचा सर्व शंभू
प्रेमींना अभिमान वाटेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्य्कत केलं. ते म्हणाले..
बाईट
- उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातले
सर्व गडकोट किल्ले कायमचे अतिक्रमणमुक्त करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री
शिंदे यांनी यावेळी सांगितलं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे दिला जाणारा
'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार' यंदा परमपूज्य रामगिरी महाराजांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
धाराशिव
इथं श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त
आयोजित रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केलं.
****
उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह गाण्यासाठी विनोदवीर कुणाल कामरा याच्याविरोधात
मुंबईतील खार पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. जळगाव शहराच्या महापौरांनीही
एक तक्रार दाखल केली असून, नाशिकमधल्या एक हॉटेल व्यावसायिक आणि एका उद्योजकानं अन्य दोन
तक्रारी नोंदवल्या आहेत. खार पोलिसांनी कामरा याला उद्या ३१ तारखेला चौकशीसाठी बोलावलं
आहे.
****
वाढत्या
तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व शाळांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचे
निर्देश, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी
दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते सव्वा अकरा आणि माध्यमिक शाळांसाठी
सकाळी सात ते पावणेबारा अशी वेळ निश्चित केली आहे.
****
छत्तीसगडमध्ये
सुकमा जिल्ह्यात काल पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षलवादी ठार झाले.
या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाचे दोन सैनिक किरकोळ जखमी झाले. सर्व १७ नक्षलवाद्यांचे
मृतदेह ताब्यात घेतल्याचं पोलीसांनी सांगितलं.
****
हिंदू नववर्षाचा
पहिला दिवस, वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण आज साजरा होत आहे. या निमित्तानं
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी पी राधाकृष्णन,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या,
देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया, विकासाची
महागुढी उभारू या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यानिमित्त
आज राज्यभरात शोभायात्रा काढण्यात येणार आहेत.
दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त
ठिकठिकाणच्या बाजारपेठा विविध पूजासाहित्यानं फुलून गेल्या आहेत. गुढी उभारण्यासाठी
वेळूच्या काठ्या, वस्त्र, विविध प्रकारची
धातुची भांडी, साखरगाठ्या आणि इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची
गर्दी झाल्याचं दिसून येत आहे.
पैठण इथं, सातकर्णी
सम्राट शालिवाहनाच्या प्रसिद्ध तीर्थस्तंभ परिसरातही विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं आहे.
तुळजापूर
इथं श्री तुळजाभवानी मंदीरात आज पहाटे गुढी उभारण्यात आली. यानिमत्त आज तुळजाभवानी
मातेची अलंकार महापूजा आणि रात्री छबिना मिरवणूक पार पडेल. तसंच पाडवा वाचन होईल.
****
जालना इथं
दु:खी राज्य काव्य पुरस्कार आणि ना. धों. महानोर राज्य साहित्य पुरस्काराचं वितरण, तसंच चित्र
प्रदर्शन आणि नामवंत कवींची काव्यमैफल अशा त्रिवेणी संगमाची पर्वणी रसिकांना आज अनुभवता
येणार आहे. यावर्षी लासलगाव इथले शेतकरी कवी-गीतकार प्रकाश होळकर यांना दु:खी राज्य
काव्य पुरस्कार, तर कोल्हापूरचे ज्येष्ठ लेखक रफीक सूरज यांना
ना. धों. महानोर राज्य साहित्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
बीड इथं
श्री संस्थान कोरडे गणपती मंदिर इथं हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवानिमित्त द्राक्ष महोत्सवाचं
आयोजन करण्यात आलं असून, यात जवळपास ७०० किलो द्राक्षांचा वापर करण्यात येणार आहे. उद्या
ही द्राक्षं प्रसाद म्हणून वितरित केली जाणार असल्याचं मंदिर व्यवस्थापन समितीकडून
सांगण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्हा
शांतता समितीची बैठक काल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार
पडली. जिल्ह्यात सण, उत्सव साजरे करताना सर्वांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी
यावेळी केलं.
****
आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या सामन्यावर सट्टा
लावणाऱ्या पाच जणांना जालना पोलिसांनी काल जालना तसंच हिंगोली इथून अटक केली. पोलिसांनी
त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉपसह इतर साहित्य, असा एकूण आठ लाख ५३
हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हिंगोली इथूनही काही संशयित आयपीएल सामन्यांवर सट्टा
लावत असल्याचं या तपासात समोर आलं आहे.
****
पारंपरिक
इंधन आयात करण्यासाठी देशाच्या परकीय चलन गंगाजळीतील मोठा हिस्सा खर्च करावा लागतो.
त्यात बचत करण्यासाठी सौर ऊर्जा तसंच अपारंपारिक ऊर्जेच्या अन्य पर्यायांचा वापर करावा, असं आवाहन
अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र
ऊर्जा विकास अभिकरण आणि ऊर्जा दक्षता ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक
वाहन फेरी काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या फेरीत दुचाकी,
तीन चाकी रिक्षा, मालवाहू वाहने, अशा विविध ३५० हून अधिक ईलेक्ट्रिक वाहनांनी सहभाग घेतला.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेच्या वतीनं दिला जाणारा यशवंतराव चव्हाण विशेष वांगमय पुरस्कार फुलटायमर
या ग्रंथासाठी कॉम्रेड अण्णा सावंत यांना आणि नटवर्य लोटू पाटील पुरस्कार ज्येष्ठ लेखक
अजित दळवी यांना काल प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल प्राचार्य कौतिकराव
ठाले पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
बीड इथं
आज भक्ती-शक्ती जागृती कार्यक्रमाच्या अंतर्गत रामनवमी आणि नववर्ष स्वागतासाठी महिला
आणि मुलींची दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. दुपारी साडेतीन वाजता शहरातल्या जिजामाता
पुतळा राजीव गांधी इथून ही फेरी निघणार आहे.
****
No comments:
Post a Comment