Sunday, 16 March 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १६ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 16 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

****

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा आज पुणे जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र देहू इथं साजरा होत आहे. यंदाचा हा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत असून प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान, देहू इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि- निर्मल वारी, हरित वारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुसस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण इथंही संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाथांचा रांजण भरण्यास आज सुरुवात झाली आहे. येत्या गुरुवारी २० तारखेला नाथषष्ठीचा मुख्य सोहळा होणार आहे.  

                               ****

न्यूजीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोवफर लक्सन यांचं पाच दिवसीय भारत दौ-यासाठी आज दुपारी नवी दिल्ली इथं आगमन होत आहे. या दौऱ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोसफर लक्सन यांच्यासोबत उभय देशांशी निगडीत विविध पैलुंवर चर्चा करणार आहेत.

तसंच लक्सन हे उद्या नवी दिल्लीत आयोजित दहाव्या रायसीना चर्चासत्र -२०२५च्या उद्घघाटन सत्राचे प्रमुख पाहुणे आणि मुख्य वक्ते म्हणूनही उपस्थित असणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रतपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेणार आहेत. 

                               ****

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते फिट इंडिया महोत्सवाचं नवी दिल्ली इथं आज उद्घघाटन झालं. यावेळी मांडवीय यांनी भारताच्या तरुणाईला मार्गदर्शन केलं. निरोगी आणि लठ्ठपणामुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणं हे या महोत्सवाचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय म्हणाले. दर रविवारी सायकल चालवण्याच्या उपक्रमाद्वारे आपल्या शहराचं प्रदुषण तसंच वैयक्तिक आरोग्य चांगलं ठेवता येईल. या उपक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसीत भारत संकल्पनेत आपल्याला योगदान देता येणार असल्याचंही मांडवीय म्हणाले.

                               ****

पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाइन नामांकनं सुरू झाली आहेत. नामांकनाची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. या पुरस्कारांसाठी नामांकनं आणि शिफारसी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन स्वीकारल्या जातील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.  

                               ****

प्रख्यात चित्रपट संगितकार ए. आर. रहमान यांना आज चेन्नई इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रहमान यांची प्रकृती आज अचानक बिघडली, छातीत त्रास होत असल्यानं  त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. हृदय विकाराच्या झटक्याच्या शक्यतेनं त्यांची अँजिओग्राफी होवू  शकते असं वृत्त आहे.

                               ****

भारतात यावर्षी पहिली स्वदेशी चिप जारी करण्यात येईल आणि येत्या दोन वर्षात अशा चार स्वदेशी चिप बाजारात येतील, त्यामुळे भारत टेस्ला, फोक्सवॅगनसह जगातील कुठल्याही कंपन्याना त्याची निर्यात करू शकेल, असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. तामिळनाडूत चेन्नई इथं भारतीय तंत्रज्ञान संस्था- आयआयटीतील विद्यार्थ्यांशी त्यांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. भारतात सध्या पाच सेमी कंडक्टर कंपन्या कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.

                               ****

आजचा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. १९९५ साली याच दिवशी प्रथमत: देशातून पोलिओच्या उच्चाटनासाठी तोंडाद्वारे लस देण्यास प्रारंभ झाला होता. निरोगी आयुष्याचे करुया रक्षण लसीकरणापासून मिळेल संरक्षण, या जागृती संदेशाद्वारे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटंबकल्याण, पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समाजमाध्यमांवर माहिती सामाईक केला आहे. या अनुषंगानं २०१४ साली शिशुंच्या मृत्युदराचं प्रमाण कमी करण्यासाठी इंद्रधनुष्य लसीकरण अभियानाला सुरुवात झाली.

                               ****

भंडारा जिल्ह्यात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात बसच्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. बपेरा - तिरोडा ही बस आज सकाळी तिरोडाकडे जात असताना वाहणी गावात हा अपघात झाला. मीना कळू असे मृत महिलेचे नाव असून त्या पती, दोन मुलींसोबत जात असताना दुचाकी स्लीप झाल्यानंतर मागून आलेल्या बसखाली त्या चिरडल्या गेल्या.   

                               ****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत पीट लाईन क्रमांक-दोनच्या विस्तारीकरणाचे काम करण्यासाठी आजपासून ३१ मार्चपर्यंत पंधरा दिवसांसासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या कामामुळे काही रेल्वे ठराविक तारखांना रद्द राहणार आहेत. यामध्ये गाडी क्रमांक ५७६५९ परभणी-नांदेड एक्स्प्रेस ही आजनंतर १९ ते २३ तसंच २६, २७, २९ आणि ३० मार्च  रोजी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक १७६२० नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस २१ आणि २८ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. आवश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभाग प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

                               ****



No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...