Tuesday, 18 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक १८.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त

·      नागपुरातल्या घटनेचे विधीमंडळात पडसाद-सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप

·      बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकारची विशेष मोहीम-गृहराज्यमंत्र्यांची माहिती

आणि

·      गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

****

महाकुंभातून प्रेरणा घेत, नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी आज लोकसभेत महाकुंभाबाबत निवेदन सादर केलं, त्यावेळी त्यांनी विविधतेत एकतेचं महाकुंभातून दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली, एकतेची ही भावना सतत समृद्ध करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरम्यान, पंतप्रधानांच्या काही विधानाच्या निषेधात विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज एक वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

गेल्या दहा वर्षांत रेल्वेने पाच लाख नोकऱ्या दिल्या असून एक लाखांहून अधिक नोकऱ्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचं, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजावरच्या चर्चेला उत्तर देत होते. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली असून, त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी सरकार काम करत आहे, २०२० पासून देशात प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही, आणि इतर देशांच्या तुलनेत भारतीय रेल्वेचे तिकीटदर खूपच किफायतशीर आहेत, रेल्वे अपघात कमी करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे, असंही वैष्णव यांनी सांगितलं.

****

नागपुरात काल घडलेल्या घटनेचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करत आपापली मतं मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवदेन सादर करत, लोकांनी संयम राखावा, एकमेकांप्रती आदर बाळगावा, असं आवाहन केलं. राज्यात पोलिसांवर हल्ला सहन करणार नाही, दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना या घटनेचा निषेध केला. ही घटना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पूर्वनियोजित असल्याचं ते म्हणाले. विधान परिषदेतही त्यांनी याप्रकरणी निवेदन सादर केलं. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनीही परिषदेत या बाबत माहिती दिली.

दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. पोलिस तसंच गुप्तचर यंत्रणांनी लक्ष दिलं असतं, तर नागपुरात ही घटना घडली नसती, असं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज सदनात या मुद्यावर बोलत होते. या मुद्यावर स्थगन प्रस्ताव देत, चर्चेची मागणी त्यांनी केली. दरम्यान, या मुद्यावरून गदारोळ झाल्यानं, सदनाचं कामकाज सभापतींनी १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.

****

राज्यात औरंगजेबच्या कबरीपेक्षा मोठे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यात सरकार अपशयी ठरल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.

बाईट – उद्धव ठाकरे

 

दरम्यान, नागपुरात काल घडलेल्या प्रकरणात पोलिसांनी ५० जणांना अटक केली असल्याची माहिती, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या घटनेमध्ये ३४ पोलिसांना दुखापत झाली असून, पाच नागरिकांनाही इजा झाली आहे.

****

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव, सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावला. अविश्वास प्रस्तावात कोणतंही ठोस कारण नमूद केलेलं नाही तसंच याबाबतचे निकष पूर्ण केले नाहीत असं निरीक्षण सभापतींनी नोंदवलं.

बाईट – राम शिंदे, सभापती, विधान परिषद

****

राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकार एक मोहीम राबवत असून येत्या तीन महिन्यात बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली, ते एका लक्षवेधीला उत्तर देत होते. बांगलादेशी घुसखोरांबद्दलची सगळी माहिती केंद्र सरकारकडे दिली असून केंद्रीय गृहमंत्रालय या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालत असल्याचं कदम यांनी सांगितलं.

****

मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी रिवर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी यावेळी दानवे यांनी केली. यावर बैठक घेऊन हा निर्णय घेऊ असं आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.

****

 

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

****

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यांना परत आणण्यासाठी गेलेले ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे साडे तीनच्या सुमारास हे यान अमेरिकेत फ्लोरिडाच्या समुद्रात अवतरण करेल, अशी अपेक्षा आहे.

पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर भारताला भेट देण्याचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना दिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२० वा भाग असेल.

****

राज्याचं भव्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे ही घोषणा केली.

****

सहकारी बँकांप्रमाणे मल्टिस्टेट पतसंस्थांमधल्या छोट्या गुंतवणूकदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत प्रकाश सोळंके यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात उपप्रश्न विचारला होता. बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ८० मालमत्तांचा लिलाव करून, फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यातील बसस्थानकं अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी बांधा वापरा हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे, असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. मुंबईत परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसंच जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा बसस्थानकात अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपामध्ये प्रवेश केल्याचं, आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे.

****

राज्यातल्या यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतल्या घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य नारायण कुचे यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.

****

हवामान

राज्यात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं ४० पूर्णांक सहा दशांश सेल्सियस एवढं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३७ अंश, धाराशिव इथं ३८, परभणी इथं ३९ तर बीड इथं ४० अशं तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...