Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०५ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगारावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. लोकांमध्ये गुंतवणूक, अर्थव्यवस्था नवोन्मेष हा या चर्चासत्राचा विषय असून, यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील. रोजगार निर्मिती हा सरकारचा प्रमुख विषय असून, पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे सरकारने रोजगार वाढीला चालना देण्यासाठी आणि रोजगारासाठी अधिक संधी निर्माण करण्याची अनेक पावले उचलली आहेत. या चर्चासत्रामधून सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्यामधील सहकार्य वृद्धिंगत करून, परिवर्तनकारी अर्थसंकल्पीय घोषणा प्रभावी उपाययोजनांमध्ये परावर्तित करण्यासाठीच्या चर्चेला प्रोत्साहन देईल.
****
नवी दिल्लीत आज होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत, पंचायती राज मंत्रालयातर्फे महिला-अनुकूल ग्रामपंचायत उपक्रमाचा आरंभ करण्यात येणार आहे. हा उपक्रम मंत्रालयाच्या यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा एक भाग आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक महिला-अनुकूल ग्रामपंचायत स्थापन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हे लिंग-संवेदनशील आणि मुली-अनुकूल प्रशासन पद्धतींसाठी एक दीपस्तंभ म्हणून काम करेल.
****
वेव्ह्ज शिखर परिषदेत आयोजित केलेल्या कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेत सर्जनशीलतेला मोठा वाव आहे, असं या स्पर्धेत उपांत्य फेरीतले विजेते निवडण्यासाठी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय ज्युरींपैकी एक असलेल्या जजेल होमावजीर यांनी सांगितलं. भारतात कॉमिक्सची बाजारपेठ किंवा वितरण प्रणाली नाही, या स्पर्धेमुळे कलाकारांना आपली कला बाजारपेठेत नेण्याची संधी निर्माण होईल, असं होमावजीर म्हणाले. कलाकारांनी आपली आवड जपावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
दरम्यान, वेव्ह्ज २०२५ कार्यक्रमांतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी बेंगळुरू इथं मार्गदर्शपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुण निर्मात्यांना या क्षेत्राविषयी अधिक माहिती मिळावी हा या कार्यशाळेचा उद्देश होता.
****
येत्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन महिन्याचे हप्ते दिले जातील, अशी घोषणा राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा मिळून तीन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला आहे. आमदार भास्कर जाधव यांची नेमणूक करावी, असं पत्र पक्षाने काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं. अर्थसंकल्पापूर्वी भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते पदी नेमणूक होईल, अशी आशा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांसोबत अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून देण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
समाजातल्या दुर्बल घटकांना कायदेशीर सल्ला आणि मदत देण्यासाठी कायदा क्षेत्रातल्या पदवीधरांनी पुढे यावं, असं आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय विधी विद्यापिठाचे कुलपती भूषण गवई यांनी केलं आहे. मुंबईत काल महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा दुसऱ्या पदवी प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते. या कार्यक्रमात पदवी आणि पदव्युत्तर अशा ३५० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या हिंदी विभाग आणि विद्यार्थी कल्याण विभागाच्यावतीने सुरु असलेल्या व्याख्यानमालेत काल प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांचं ‘भाषा, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर व्याख्यान झालं. माणसांनी भाषा अभिमानाने जगवली पाहिजे, वाढवली पाहिजे, भाषा आणि संस्कृतीने माणसाला जगायल शिकवलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
****
महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या वतीनं काल लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. यात महावितरणचं परिमंडल कार्यालय ते तापडिया नाट्यमंदिरापर्यंत जनमित्र गौरव फेरी काढण्यात आली. यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जनमित्राचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसंच उपस्थितांना विद्युत सुरक्षेची शपथ देण्यात आली.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यामुळे आज शिरुर तालुक्यात बंद पाळण्यात येत आहे. काल बीड आणि केज तालुक्यात कडकडीत बंद पाळून नागरीकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या उपस्थितीत मुखेड पंचायत समितीत काल तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. करनवाल यांनी नागरिकांच्या व्यक्तिगत तक्रारी ऐकून त्यांच्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
****
नाशिक ओझर विमानतळावरील धावपट्टीला नवीन समांतर धावपट्टी तयार करण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती, मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ही धावपट्टी ३ किलोमीटर लांब आणि ४५ मीटर रुंद असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment