Wednesday, 19 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.03.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      मतदान ओळखपत्र आधारकार्डशी संलग्नीकरणासंदर्भात निवडणूक आयोगाची तांत्रिक चाचपणी

·      महाकुंभमेळ्यातून प्रेरणा घेत, नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप द्यावं - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

·      नागपुरातल्या घटनेचे विधीमंडळात पडसाद-सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप

·      बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकारची मोहीम, लवकरच स्थानबद्ध करण्यासाठी केंद्राची स्थापना

आणि

·      विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद, निवडणूक होणार बिनविरोध

****

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांकाच्या संलग्नीकरणाचा निर्णय, केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. काल नवी दिल्लीत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालय, विधिमंडळ विभागाचे सचिव आणि आधारच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आधार प्राधिकरण आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांची चर्चा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. बनावट मतदार ओळखपत्रांची समस्या येत्या तीन महिन्यांत सोडवण्यासह विविध समस्या दूर करण्यासाठी अनेक पावलं उचलल्याचंही आयोगानं सांगितलं. 

****

महाकुंभातून प्रेरणा घेत, नदी उत्सवाच्या परंपरेला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल लोकसभेत महाकुंभाबाबत निवेदन सादर करताना त्यांनी, विविधतेत एकतेचं महाकुंभातून दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली. एकतेची ही भावना सतत समृद्ध करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले... 

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

नागपुरात परवा घडलेल्या घटनेचे पडसाद काल विधीमंडळात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी निवदेन सादर करत, लोकांनी संयम राखण्याचं आवाहन केलं. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर तसंच दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना या घटनेचा निषेध केला. ही घटना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पूर्वनियोजित असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली. पोलिस तसंच गुप्तचर यंत्रणांनी लक्ष दिलं असतं, तर नागपुरात ही घटना घडली नसती, असं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल सदनात या मुद्यावर बोलत होते. या मुद्यावर स्थगन प्रस्ताव देत, चर्चेची मागणी त्यांनी केली. या मुद्यावरून गदारोळ झाल्यानं, सदनाचं कामकाज सभापतींनी १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.

****

राज्यात औरंगजेबाच्या कबरीपेक्षा महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यात सरकार अपशयी ठरल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,

बाईट – उद्धव ठाकरे

 

दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली. या घटनेमध्ये ३४ पोलिसांना दुखापत झाली असून, पाच नागरिकांनाही इजा झाली आहे.

****

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव, सभापती राम शिंदे यांनी काल फेटाळून लावला. अविश्वास प्रस्तावात कोणतंही ठोस कारण नमूद केलेलं नाही तसंच याबाबतचे निकष पूर्ण केले नाहीत असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

****

अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी काल विधानपरिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिलं. आर्थिक शिस्त पाळत असताना जनकल्याणाच्या योजनांसाठी पुरेशी तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मर्यादेत कर्ज घेण्यात आल्याचंही जैस्वाल यांनी नमूद केलं.

****

राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या शोधार्थ राज्य सरकार एक मोहीम राबवत असून, येत्या तीन महिन्यात बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. बांगलादेशी घुसखोरांबाबत केंद्र सरकारला माहिती दिली असून, केंद्रीय गृहमंत्रालय या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी रिवर बेसिस स्टिम्युलेशन पद्धतीचा अवलंब करण्याची मागणी त्यांनी केली. यावर बैठक घेऊन हा निर्णय घेऊ असं आश्वासन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.

****

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

****

राज्यातल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची बदली करण्यात आली आहे. तर किनवट इथं कार्यरत उपजिल्हाधिकारी कवली मेघना यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.

****

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेसएक्स क्रू ड्रॅगन या यानाने आज पृथ्वीवर परतले. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडे तीनच्या सुमारास हे यान अमेरिकेत फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यापासून अंतराळात होते.

****

सहकारी बँकांप्रमाणे मल्टिस्टेट पतसंस्थांमधल्या छोट्या गुंतवणूकदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या ८० मालमत्तांचा लिलाव करून, फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला.

****

महिलांनी लघुउद्योजक होऊन आत्मनिर्भर होण्याचं आवाहन, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी यांनी केलं आहे. परभणी इथं काल महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तुंचं जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या तेर इथं संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या समाधीमंदिर परिसरात महाद्वार उभारणीच्या कामाचं भूमिपूजन काल गावातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं. वारकरी संप्रदायाच्या लौकिकाला साजेसं हे महाद्वार भाविकांना मोठा आत्मिक आनंद देईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

****

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल खुलताबाद इथं औरंगजेब कबर सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करुन आढावा घेतला. जिल्ह्यातली कायदा- सुव्यवस्था आणि शांतता अबाधित असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखावी, प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाचे चार दरवाजे काल सायंकाळच्या सुमारास उघडण्यात आले. लातूर जिल्ह्यातल्या  शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा लाभ होणार आहे. पुढील दोन दिवस धरणाचे चारही दरवाजे उघडे राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.

****

धाराशिव इथं जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त काल ग्राहक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना, ग्राहक संरक्षण कायद्यामुळेच ग्राहकाला जलदगतीने न्याय मिळण्यास मदत झाली असल्याचं सांगितलं.

****

हवामान

राज्यात काल सर्वात जास्त ४० पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३७ अंश, धाराशिव इथं ३८, परभणी इथं ३९ तर बीड इथं ४० अशं तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...