Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आज सुरुवात झाली. यानिमित्त आज सकाळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित तसंच अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून लहान मोठ्या अनेक दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्या आहेत. नाथमंदिरात या निमित्तानं कीर्तन प्रवचन आणि छबीना मिरवणूकीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
शाश्वत विकास या संकल्पनेत सर्वोच्च स्थान शिक्षणाचंच असून, शिक्षणानं ज्ञानी झालेला समाज हाच विकास आणि सुधारणांची पूर्वअट आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत काल शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. शिक्षक आणि डॉक्टर घटकांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली तर समाज लयास जाण्याची भीती असते, त्यामुळे शिक्षकांनी आपल्या कर्तव्याबाबत अधिक जागरूक असणं आवश्यक आहे, असं मतही स्वामी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
या वर्षापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येतील,तसंच या स्पर्धा परीक्षांचं आणि मुलाखतींचं संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसारच त्या घेतल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. विधान परिषद सदस्य शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यापुढे वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ ची पदभरती अधिक गतीनं करण्यासाठी आयोगाची पुनर्रचना केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी जर्मनीतल्या बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे. या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग इथं विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणावर यात भर देण्यात येणार असल्याचं, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
****
नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या ५१ जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
****
आसाममधे नामरूप इथं ब्रह्मपुत्र खोरे खत महामंडळाच्या परिसरात १० हजार ६०४ कोटी रुपये खर्चाच्या अमोनिया युरिया खत निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १२ लाख ७० हजार टनांची असेल. या प्रकल्प निर्मितीतली केंद्र आणि राज्य सरकारं तसंच इतर महामंडळांच्या भागीदारी तसंच त्यासंबंधीच्या प्रक्रीयेवर देखरेख ठेवण्यासाठी आंतरमंत्रालय समितीची स्थापना आदींनाही आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
****
अधिक चांगलं कृषी उत्पादन, आरोग्यविषयक अधिक सक्षम सोयीसुविधा, कालानुरूप शिक्षण आणि हवामान लवचिकता याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता यावा या उद्देशानं इंडिया ए आय मिशन आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यात लवकरच सामंजस्य करार होणार आहे. इलेकट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत फाऊंडेशनचे संस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतली, त्यानंतर समाजमाध्यमांवर ही माहिती दिली.
****
देशात सध्या एकंदर वीजनिर्मितीच्या क्षेत्रात हरित ऊर्जा निर्मितीचा वाटा ४२ टक्के इतका आहे, अशी माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नवी दिल्लीत काल ३२ व्या कनवर्जन्स इंडिया एक्सपो, आणि दहाव्या स्मार्ट सिटी इंडिया कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. केंद्र सरकार पर्यायी इंधन आणि आणि जैव इंधन निर्मितीला प्रोत्साहन देत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं बीड इथं आजपासून येत्या २४ तारखेपर्यंत उत्सव स्वयंसहायता समूहातल्या महिलांच्या वतीनं गुढी पाडवा महोत्सव, ईद बाजार, खाद्य जत्रा आणि जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री महोत्सव होत आहे. या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आज भारताची ट्रीसा जॉली आणि तिची जोडीदार गायत्री गोपीचंद यांचा सामना जर्मन जोडीशी होणार आहे. महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूला काल पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या जूली डावल जेकबसन हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतनं पहिल्या फेरीत देशाच्या एच.एस. प्रणॉयचा पराभव केला.
****
दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धांच्या दुसऱ्या आवृत्तीला आजपासून नवी दिल्ली इथं प्रारंभ होत आहे. या स्पर्धांमध्ये ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले तेराशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment