Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 22 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
केंद्रीय विनियोजन विधेयक लोकसभेत मंजूर-राज्याच्या अर्थसंकल्पालाही
विधीमंडळाची मंजुरी
·
घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया इमारतीसाठी ७१० कोटी-आठवडाभरात
प्रशासकीय मान्यतेची ग्वाही
·
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचं
दंडाधिकारी चौकशीत स्पष्ट
·
यंदाचा भानुदास एकनाथ पुरस्कार संतसाहित्याचे अभ्यासक
डॉ सदानंद मोरे यांना प्रदान
आणि
·
आयपीएलच्या अठराव्या हंगामाला आजपासून प्रारंभ
****
केंद्रीय
विनियोजन विधेयक काल लोकसभेनं मंजूर केलं. विविध मंत्रालयांच्या अनुदान मागण्या कोणत्याही
चर्चेविना मंजूर करण्यात आल्या, काही मंत्रालयांच्या अनुदान मागण्यांमध्ये
काही सदस्यांनी मांडलेले कपातीचे प्रस्ताव सदनाने फेटाळून लावले. त्यानंतर केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सदनासमोर मांडलेलं विनियोजन विधेयक आवाजी मतदानानं
मंजूर झालं.
राज्याचा
आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प काल मंजूर झाला. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या विभागवार
मागण्यांवर विधानसभेत चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित
पवार यांनी महाराष्ट्र विनियोजन विधेयक मंजुरीसाठी सादर केलं आणि ते सभागृहाने एकमताने
मंजूर केलं, त्यानंतर विधान परिषदेनंही अर्थसंकल्प मंजूर केलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया इमारत
उभारणीसाठी ७१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात याला प्रशासकीय
मान्यता दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधान
परिषदेत दिली. आमदार सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ते
बोलत होते. दोन महिन्याच्या आत सदरील इमारत उभारणीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं, मुश्रीफ यांनी
सभागृहात सांगितलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विक्रम काळे,
संजय केणेकर आदी सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
****
विधान परिषदेच्या
पाच जागांवर बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची नावं काल राजपत्रात प्रसिद्ध करण्यात
आली. त्यानंतर विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर इथले भाजप नेते
संजय केणेकर यांच्यासह पाचही सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी नवीन सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला.
****
जल प्रदुषण
कायद्यात सुधारणेचं विधेयक काल विधान परिषदेत संमत करण्यात आलं. पर्यावरण मंत्री पंकजा
मुंडे यांनी हे विधेयक सदनासमोर सादर केलं.
मोटार वाहन
कर सुधारणा विधेयकावर काल विधान परिषदेत चर्चा झाली. वाहनांच्या किंमतीवर आधारित कर
आकारणी करणं, तसंच कराच्या कमाल मर्यादेत वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे,
असं सरनाईक यांनी सांगितलं.
****
हिंगोली
जिल्ह्यात हर घर नल योजना डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यमंत्री
मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यात १८० योजना पूर्ण
झाल्या असून, १९० योजनांचं ७५ टक्क्यांपेक्षा अधिक, तर
१३१ योजनांचं ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम झालं आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या ३३७ कंत्राटदारांना
नोटीसा बजावून ९१ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून, कुचराई
करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत बोर्डीकर यांनी दिले.
****
लातूर शहरात
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस नियोजन करण्याची सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. विधान भवनात घेतलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, यांच्यासह जिल्हाधिकारी,
पोलीस अधीक्षक, आणि इतर अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे
या बैठकीत सहभागी झाले.
****
आग्रा इथं
छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणीसाठी कार्यान्वयीन तसंच निधीची जबाबदारी
राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल निर्गमित करण्यात
आला. या निर्णयामुळे या स्मारकाच्या उभारणीस गती मिळणार आहे.
****
ग्रामविकासमंत्री
जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या महिलेस सातारा पोलिसांच्या गुन्हे
शाखेच्या पथकाने काल खंडणीप्रकरणी अटक केली. संबंधित महिलेने मंत्री गोरे यांच्या विरोधात
अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी देत तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. आपल्या
वकिलाच्या कार्यालयात एक कोटी रुपये घेतांना या महिलेला रंगेहात अटक करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
परभणी इथं
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या
चौकशीत स्पष्ट झालं आहे. राज्य मानवाधिकार आयोगानं ही माहिती दिली. या प्रकरणी आयोगानं
संबंधित यंत्रणेला नोटीस बजावून अहवाल मागवले. तसंच दंडाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी
आयोगानं त्यांनाही नोटीस बजावली. परभणीत हिंसाचार प्रकरणानंतर गेल्या १५ डिसेंबर रोजी
सूर्यवंशी यांचा सरकारी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता.
*****
पैठण इथल्या
संत एकनाथ महाराज मिशनच्या वतीने संत एकनाथ महाराजांच्या नावाने देण्यात येणाऱ्या ६
पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं. यंदाचा सर्वोच्च भानुदास एकनाथ पुरस्कार संत साहित्याचे
गाडे अभ्यासक तथा संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांना प्रदान करण्यात
आला. नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
इंडियन
प्रीमियर लीग अर्थात आएपीएल क्रिकेटचा १८ वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. आज या स्पर्धेचा
पहिला सामना कोलकाता इथं, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार
आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत १० संघ एकूण ७४ सामने
खेळतील. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे.
****
भारतीय
सौर कालगणनेनुसार नवीन वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. भारताची ओळख असलेली आणि आकाशवाणीसह
काही संस्थांमधून प्रचलित असलेली ही कालमापन पद्धती सर्वसामान्य व्यवहारात वापरली जावी, या हेतुने
जालन्याच्या जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री कार्यरत आहेत,
त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली...
बाईट – डॉ गणेश अग्निहोत्री
****
जागतिक
जल दिन आज साजरा होत आहे. धाराशिव इथं आज गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या विषयावर
विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
होणार आहे.
****
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनी यावर्षीपासून प्रत्येक देवगड
हापूस आंब्यावर टॅम्परप्रूफ यूआयडी सील सक्तीचं करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची
फसवणूक आणि खऱ्या उत्पादकांचं नुकसान टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबाबत आमच्या
प्रतिनिधीनी अधिक माहिती दिली...
बाईट – निलेश जोशी
****
छत्रपती
संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड तसेच बांधकामाबाबत
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार
आहे. विभागीय आयुक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी ही माहिती दिली. नागरिकांनी सर्वेक्षणातील
प्रश्नावली बाबत अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन गावडे यांनी केलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात वाळूने भरलेल्या भरधाव टिप्परने दुचाकीला धक्का दिल्याने एकाचा जागीच मृत्यू
झाला. सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथं हा अपघात झाला, गणेश उत्तम तनपुरे
असं या युवकाचं नाव असून, त्याचा येत्या सोमवारी २४ मार्च रोजी
विवाह होणार होता.
****
नांदेड
महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा एक हजार ५२३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक तथा
आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मंजूर केला. ५ कोटी ८५ लाख रुपये शिलकीच्या या
अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही.
****
No comments:
Post a Comment