Monday, 17 March 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १७ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.

****

भारत शांततेचा संदेश देणारा देश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन, पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद 

अंमली पदार्थ तस्करांची गय केली जाणार नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा 

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर, छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर यांचा समावेश 

आणि

विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ 

****

भारत शांततेचा संदेश देणारा देश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रसिद्ध पॉडकास्टर आणि कृत्रिम बुध्दिमत्ता संशोधक लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. हा पॉडकास्ट काल जारी करण्यात आला. बुद्ध आणि गांधींच्या भूमीचा वारसा जपत, भारताचा शांततेचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचतो, भारतीय नेहमी सद्भावना आणि शांततेसाठी ठाम भुमिका घेतात, असं पंतप्रधान म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी


आपण लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आलो असून, जनतेचा विश्वास हाच आमच्या सरकारचा पाया असल्याचं पंतप्रधान म्हणाले. तीन तास चाललेल्या या चर्चेत, पंतप्रधानांनी त्यांचं बालपण, ‍हिमालयात व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, सार्वजनिक जीवनातला त्यांचा प्रवास, भारत आणि इतर देशांचे संबंध, जागतिक शांतता, भारतातली राजकीय परिस्थिती यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या आयुष्यातलं सर्वात प्रभावी संभाषणांपैकी एक, असं वर्णन फ्रिडमन यांनी यासंदर्भात केलं आहे. 

****

अंमली पदार्थाचा धंदा करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. समाजमाध्यमावरच्या संदेशात काल त्यांनी, देशाला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी तपास संस्था चांगलं काम करत असल्याचं नमूद केलं. इम्फाळमधे नुकतंच ८८ कोटी रुपयांच्या मेथमफेटामाइन टॅब्लेट अमंली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केल्या, तसंच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटशी संबंधित असणाऱ्या चौघांना अटक केल्याच्या कारवाईचं शहा यांनी कौतुक केलं आणि अंमली पदार्थविरोधात कारवाई सुरूच राहील, असं सांगितलं. देशाला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. 

****

नशामुक्त अभियानांतर्गत नवी मुंबईतल्या गुन्हे शाखेनं काल केलेल्या कारवाईत दिघा इथल्या एका व्यक्तीकडून ३८ लाख ७९ हजार रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात गांजा, मेफेड्रोनसारखे अंमली पदार्थ, तसंच गावठी दारू, देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. या आरोपीला न्यायालयानं येत्या १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

****

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. यात छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर, नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे. या निवडणुकीसाठी २७ मार्च रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. 

****

राज्यातली सद्भावना तळाशी नेण्याचं काम भाजप आणि मित्रपक्षांनी केलं असून, ती पुन्हा जागृत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते काल रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच नाही; मात्र त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं असल्याची निशाणी म्हणजे त्याची कबर आहे. ती कबर उखडणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मराठ्यांच्या शौर्याची निशाणी पुसून टाकण्यासारखं ठरेल, असं सपकाळ यावेळी म्हणाले. 

****

मुंबईत होऊ घातलेल्या वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं गेमिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गेम विकसित करण्याचा अनुभव मिळणार असून, त्यांच्या कल्पकतेला चालना मिळेल. ही स्पर्धा इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्सच्या सहकार्याने आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहिती वेव्ह्ज इंडिया डॉट ओआरजी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

****

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा काल पुणे जिल्ह्यात श्रीक्षेत्र देहू इथं साजरा झाला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं देहू नगरीत दाखल झाले होते. 

दरम्यान, संत तुकाराम महाराज देहू संस्थानाच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ काल प्रदान करण्यात आला. वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि- निर्मल वारी, हरित वारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे. तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांनी धर्माबरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं मोठं कार्य केलं, असं मनोगत शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केलं. ते म्हणाले,

बाईट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


परभणी जिल्ह्यात तुकाराम बीज निमित्त नावकी, कातनेश्वरसह अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी उत्सवात काल रांजण भरण्यास सुरुवात झाली. येत्या गुरुवारी नाथषष्ठी उत्सव साजरा होणार असून, मानाची दिंडी निघणार आहे, तर शुक्रवारी छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

****

मास्टर्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय मास्टर्स संघानं वेस्ट इंडीज मास्टर्स संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. काल रायपूर इथं झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्स संघानं प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १४८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारतीय मास्टर्स संघानं हे लक्ष्य १८व्या षटकात चार गडी गमावत पूर्ण केलं. 

****

परभणी इथलं वैद्यकीय महाविद्यालय आणि आरपी रुग्णालय यांच्या वतीने काल जागतिक महिला दिनी महिलांसाठी सर्व रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आलं. अतिरिक्त जिल्हा शल्यचकित्सक डॉ. सारिका बडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या शिबिरात जवळपास ४८० महिलांची तपासणी करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोल्हाटी इथं लघुदाब विद्युत वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. महावितरणचे सहायक अभियंता गोविंद दुसंगे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. 

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पाच्या बैठकीत सिनेट सदस्यांनी अनेक विषय मांडले. धाराशिव जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ, कुंथलगिरिचा खवा, आणि जिल्ह्याचं पर्यटन यावर आधारित विविध कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर धाराशिव इथल्या विद्यापीठ उपकेंद्रात प्री - आय ए एस, आयपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि फॉरेन लँग्वेज प्रशिक्षण सुरू करण्यासंदर्भातही प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या अर्थसंकल्पात धाराशिव उपकेंद्रात क्रीडांगणासह मुलांच्या वस्तीगृहासाठी तरतूद करण्यात आली आहे.

****

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्या मंगळवारी मेगा जॉब फेअर होणार आहे. विद्यापीठातल्या नायलेट इथं छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई इथल्या नामांकित कंपन्या या जॉब फेअर मध्ये सहभागी झाल्या आहेत. 

****

तुळजापूर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांनी केली. ते काल धाराशिव इथं वार्ताहरांशी बोलत होते. अंमली पदार्थाच्या विळख्यात जिल्ह्यातले ५०० तरुण गुरफटले असून, नऊ जणांचा बळी गेला, हे अंमली पदार्थ मुंबई, पुणे, सोलापूर आणि परंडा मार्गे तुळजापुरात पुरवठा करणारं मोठे रॅकेट असून, यामध्ये राजकीय पक्षाशी निगडीत सदस्यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप पाटील यांनी केला. या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर पकडलं नाही, तर जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

****

हवामान 

विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भात काल काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात काल सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं ४२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. परभणी इथं ३९, तर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं काल सरासरी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. 

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...