Friday, 21 March 2025

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २१ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 21 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

दाओसमध्ये यंदा झालेल्या करारांमुळे राज्यात १६ लाख रोजगार निर्मिती होणार असून, या करारांची चोख अंमलबजावणी राज्य सरकार करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. राज्यातल्या पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक तसंच गृहनिर्माण, पुनर्विकास प्रकल्प, प्रदूषण यांसारख्या मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावांवरील चर्चेला ते उत्तर देत होते. दावोस करारांसंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात दावोस मध्ये झालेल्या बहुतांश करारांची अंमलबजावणीच झाली नाही याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. पुढच्या अधिवेशनात दाओसमध्ये महायुती सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती दिली जाईल, असं सामंत यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्यासंदर्भातलं विधेयक विधिमंडळात मांडण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भातल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, त्यात आणखी जाणकार व्यक्तींचा समावेश करून त्यांच्या अहवाला नुसार तसं विधेयक आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यात गेली अनेक वर्षे जुन्या बांधल्या गेलेल्या मात्र कामं अपूर्ण राहिलेल्या धरणांच्या कामासाठी प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्णत्वाला नेण्यात येतील अशी माहिती गोदावरी - कृष्णा खोरे विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना उत्तम जानकर यांनी उपस्थित केली होती.

****

विधानपरिषदेच्या पाच जागांवरची पोटनिडवणूक बिनविरोध पार पडली. या जागांसाठी पाच जणांचे अर्ज वैध ठरले. नवनिर्वाचित सदस्यांना सभापती राम शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये संजय केणेकर, चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय खोडके आणि संदीप जोशी यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. या सदस्यांची नावं राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याचं, सभागृहात सांगण्यात आलं.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सरकारने गिलोटीनचा वापर करून म्हणजे चर्चेविना वित्त विधेयक मंजूर करण्याचं नियोजन केलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासंदर्भात व्हिप जारी केलं आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे.

****

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक - HSRP बसवण्यासाठीची मुदत राज्य शासनाने ३० जून पर्यंत वाढवली आहे. एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी ही नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. परिवहन विभागाने यासाठी तीन अधिकृत संस्थांची निवड केली आहे.

****

औरंगजेब कबरीवरील वादानंतर राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएचं पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. या पथकाकडून खुलताबाद परिसराची पाहणी करण्यात येत आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबाद मधली ही कबर हटवण्यासाठी आंदोलनं सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पथक जिल्ह्यात आलं आहे.

****

पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्यात एक आगळीवेगळी आणि शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असलेली कर्जत इथल्या श्री संत गोदड महाराजांचा दिंडी सोहळा साजरा झाला. शेकडो दिंड्यांपैकी श्री संत गोदड महाराज यांच्या दिंडी सोहळ्याने ७०० किलो रांगोळीचा वापर करून संपूर्ण नगर प्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्या काढल्या, तसंच ड्रोनद्वारे संपूर्ण मार्गावर गुलाबाच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी केली.

****

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राचा दृरदश्यप्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातल्या औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या. जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या शासकीय ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी २४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परिमंडलांतर्गत विविध शासकीय कार्यालयं, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पाच हजार २२२ ग्राहकांकडे ११६ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावं, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

****

लातूर इथल्या दिशा प्रतिष्ठानकडून पाचव्या वर्धापनदिनानिमित्त दिशा शस्त्रक्रिया योजना राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत शस्त्रक्रियेसाठी ५० टक्के खर्च दिशा प्रतिष्ठानकडून केला जाणार असून, उर्वरित ५० टक्के खर्च रूग्णांना करावा लागणार आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मेघना कावली यांनी काल पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेतली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...