Sunday, 23 March 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २३ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा दिना निमित्त हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांना आज श्रध्दांजली अर्पण केली. समाजमाध्यमाद्वारे प्रसारीत आपल्या संदेशात मोदी यांनी या क्रांतीकारकांच्या सर्वोच्च बलीदानाचं अभिवादनाद्वारे स्मरण केलं आहे.

****

नाशिक इथं प्रस्तावित कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगानं आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर इथं ज्योर्तिलिंग मंदीराला भेट दिली. फडणवीस यांनी  विविध आखाड्यांच्या साधू संतांची भेटही  घेतली. तत्पूर्वी, हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. 

****

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी श्री गुरूगोविंदसिंगजी नांदेड विमानतळावर आगमन झालं. ते आज दिवसभर नांदेड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक हे देखील उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह या दौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत. 

****



भारतीय अंतराळवीराला चंद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जाणं आणि त्याला सुरक्षितपणे परत आणण्याच्या मोहिमेवर भारतीय अंतराळ संशोधन संस्था -इस्रो काम करत असल्याचं, अध्यक्ष डॉक्टर व्ही. नारायणन यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल जालंधर इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या असून, येत्या २०४० सालापर्यंत  हे उद्दिष्ट गाठण्यात इस्रोला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०३० सालापर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल, असंही इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन म्हणाले. 

****

इंटरनेटद्वारे खेळल्या जाणा-या अर्थात ऑनलाईन गेमिंगच्या अनधिकृत अशा  साडेतीनशेहून अधिक  संकेतस्थळांवर,  वस्तू आणि सेवा कर -जी.एस.टी.च्या  गुप्तचर विभागानं बंदी घातली आहे. संबंधीत चोवीसशे  बँक खातीही या कारवाईत गोठवल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. परदेशातून चालवण्यात येणाऱ्या या कंपनी नोंदणीकृत नसल्यानं जी.एस.टी.चा भरणाही होत नाही. महासंचालनालयानं सुमारे सातशे अशा कंपन्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या खेळांचे जाहिरात दुत असणा-या   चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू आणि समाज माध्यमांच्या प्रभावाखाली न येता नागरिकांनी दक्षता बाळगावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. आय पी एल क्रिकेट हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केवळ नोंदणीकृत ऑनलाईन मंचाचा वापर करावा, असं आवाहनही अर्थ मंत्रालयानं केलं आहे.

****

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याप्रकरणी,सर्वोच्च न्यायालयानं आपल्या संकेतस्थळावर अंतर्गत अहवाल जाहिर केला आहे.  दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय यांच्या नेतृत्वातील तपासणीच्या माहितीनुसार देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ति संजीव खन्ना यांनी याप्रकरणी त्रीसदस्यीय समिती स्थापन केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना न्यायदानाशी संबंधीत कोणत्याही कामास प्रतिबंध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी आपण किंवा कुटुंबियांनी अशी रोकड घरात ठेवलेली नसून यात आपल्याला बदनाम करुन फसवलं जात असल्याचा दावा न्यायमूर्ती वर्मा यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या झालेल्या बैठकीत न्यायाधीश यशवंत वर्मा यांना अलाहबाद उच्च न्यायालयात स्थलांतरीत करण्याबाबत निर्णय झाला होता. परवा- शुक्रवारी याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधिशांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

****

उष्णतेची लाट तसंच पाणी टंचाईचा कृषी क्षेत्रावर होणारा दुष्परिणाम,लक्षात घेता अशा महत्त्वाच्या विषयांवर बहुआयामी कृती करण्यावर भर दिला पाहिजे असं प्रतिपादन  पर्यावरण, वन आणि हवामान बदल केंद्रीय राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीच्या  भारत मंडपम इथं‘भारत २०४७: हवामान -  पुरक भविष्याची उभारणी’ या परिसंवादाच्या समारोप सत्रात काल बोलत होते. स्थानिक पातळीपासून प्रशासनाच्या सर्वच स्तरांवर हवामानाशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेचा समावेश केला पाहिजे असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. शाश्वत कार्यवाही, सहयोग आणि धोरणाभिमुख हवामान अनुकूलता या विषयांवरही या चार दिवसांच्या परिसंवादात मार्गदर्शन झालं. 

****

शासनाच्या विविध उपाययोजनांद्वारे मराठवाड्यावरील जलसंकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून  यात सगळ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचं राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. जागतिक जल दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं शहरात पायी फेरी काढण्यात आली. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठवाड्याच्या जलसमृद्धीसाठी शासन विविध उपक्रम राबवत असून त्याला सर्व संस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बोलताना छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाण्याच्या जपून वापराबाबत मार्गदर्शन करत जलसंवर्धनासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. 

****


No comments: