Friday, 7 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      प्रशासकीय कामकाजात नवी संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर-विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता

·      महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांविरोधातला कायदा चालू अधिवेशनात मंजूर करावा-खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

आणि

·      छत्रपती संभाजीनगरच्या मिनाक्षी बिराजदार यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

****

प्रशासकीय कामकाजात नवी संस्कृती रुजवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलत होते. प्रत्येक विभागाला शंभर दिवसांत कामकाजाचं उद्दीष्ट दिलेलं असून, उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा एक मे रोजी सत्कार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जनतेने भरघोस मतदान करून जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला अनुरुप असं काम राज्य सरकार करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

राज्यात चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एक लाख ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या योजनेच्या अंतर्गत शंभर युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या दीड कोटी ग्राहकांना घराच्या छतावर सौर पॅनल बसवता येतील आणि त्यातून त्यांना मोफत वीज मिळेल. स्मार्ट मीटर लावणाऱ्या घरगुती ग्राहकांनी दिवसा वापरलेल्या वीजेवर सवलत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. शक्तिपीठ महामार्गासाठी भूमीअधिग्रहण लवकरच सुरू करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

दरम्यान, राज्याच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विरोधकांनी जनतेच्या कामांत राजकारण न आणता विकास यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देत होते.

महायुतीच्या नव्या सरकारची सुरूवात दमदार झाली असून, पहिल्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंबही दिसेल. आपल्याला दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने राज्याचा विकास करण्याचा मानस शिंदे यांनी व्यक्त केला, ते म्हणाले

बाईट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. सर्वाधिक कृषी क्षेत्राचा विकास दर आठ पूर्णांक सात दशांश, सेवा क्षेत्र सात पूर्णांक आठ दशांश आणि उद्योग क्षेत्र चार पूर्णांक नऊ दशांश टक्के असण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न ४५ लाख ३१ हजार ५१८ कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे. तर दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपयांवरून ११ टक्क्यांनी वाढून ३ लाख ९ हजार ३४० रुपये होण्याचा अंदाज आहे.

****

महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांवर कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा विधानसभेच्या चालू अधिवेशनात मंजूर करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ते आज सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या कायद्यात दोषीला किमान दहा वर्षाची शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद केली जावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

****

लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी तसंच मार्च महिन्याचा प्रत्येकी दीड हजार रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जात असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या म्हणाल्या

बाईट – आदिती तटकरे

****

आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त आज विधानपरिषदेत ‘महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि सक्षमीकरण ‘ या विषयावर चर्चा झाली, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रज्ञा सातव, चित्रा वाघ, मनिषा कायंदे यांच्यासह इतर सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

विधानसभेतही महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चा झाली. मनिषा चौधरी, सरोज अहिरे आणि इतर महिला सदस्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला.

****

महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी राहावी तसंच महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हा यामागचा उद्देश असल्याचं, तटकरे यांनी सांगितलं.

****

जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येत आहे. या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आज महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कृषि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या महिलांची वाढती संख्या हे महिला परिवर्तनापेक्षाही काळाचे परिवर्तन असल्याचं मत कुलगुरू डॉ इंद्र मणी यांनी व्यक्त केलं.

****

जागतिक महिला दिनानिमित्त बीड इथं महिलांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात प्रसिद्ध उद्याोगांच्या वतीनं उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

****

राज्य शासनाचे २०२२-२३ वर्षाचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यात छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातल्या मिनाक्षी बिराजदार यांच्यासह राज्यातल्या पाच विभागातल्या प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे. महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.

****

केंद्र शासनाच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या पुष्यमित्र जोशी या युवकाची निवड झाली आहे. पुष्यमित्र हा संशोधक, नवोपक्रमकर्ता, लेखक आणि धोरण सल्लागार म्हणून ओळखला जातो. त्याच्या तीन संशोधनांना भारत सरकारकडून पेटंट मिळालेलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर इथल्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या वाहनावर वाळू माफियांनी हल्ला केल्याचा प्रकार काल मध्यरात्रीनंतर घडला. या प्रकणी सहा संशयितांविरुध्द परतूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देविदास पाठक तर सरचिटणीसपदी रवींद्र केसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

नांदेड जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे शाळांचं वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सकाळी साडे आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात सावंगी म्हाळसा आणि माणकेश्वर इथं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या वॉटरशेड रथाला दिल्लीच्या वॉटर शेड यात्रा निरीक्षक श्वेता नारायण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज सुरुवात झाली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मृद आणि जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली. पाणलोट योजनेतून मंजूर असलेल्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र सरकारच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या पथकानं खत निर्मिती प्रकल्प, तसंच कचरा डेपोची पाहणी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक आणि पोलीस विभागानं आज गुरुव्दारा परिसरात अतिक्रमण धारकांवर कारवाई केली. यावेळी परिसरातील ८० अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन १० ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं, गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी, उद्या सकाळी अकरा वाजता शेंद्रा औद्योगिक वसाहत इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्थितीत विभागातील आठ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि उद्योजक, यांची संयुक्त बैठक होणार आहे. सौर कृषी वाहिनी पवन ऊर्जा प्रकल्प आणि महावितरण अधिकारी तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं होळीनिमित्त धावणाऱ्या पाटणा-जालना-पाटणा या विशेष रेल्वेच्या वेळेत बदल केला आहे. नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी जालना इथून १० मार्च तसंच १५ मार्चला रात्री दहा वाजता सुटेल.

****

No comments: