Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 08 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं
आयोजन
·
शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यसरकार
आदिशक्ती समिती स्थापन करणार
·
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात विकास दर सात पूर्णांक
तीन टक्के राहण्याची शक्यता
·
महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांविरोधातला कायदा चालू अधिवेशनात
मंजूर करावा-खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी
आणि
·
छत्रपती संभाजीनगरच्या मिनाक्षी बिराजदार यांना ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर तर राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी हिंगोलीच्या पुष्यमित्र
जोशी यांची निवड
****
जागतिक
महिला दिन आज साजरा होत आहे. यंदाचा जागतिक महिला दिन 'नारी शक्ती
सह विकसित भारत' या संकल्पनेनुसार साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत.
गुजरातच्या
नवसारी जिल्ह्यात आज आयोजित लखपती दीदी कार्यक्रमात पंतप्रधान, लखपती दीदींशी
संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमात प्रातिनिधिक
स्वरुपात ५ लखपति दीदींना प्रमाणपत्रं देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नवी दिल्लीत
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय
महिला आयोगाच्या वतीनं आज दिल्लीत अखिल भारतीय महिला अधिवक्ता परिषद आयोजित करण्यात
आली आहे. विकसित भारतासाठी महिलांच्या वाढलेल्या भूमिकेसंदर्भात या परिषदेत चर्चा होणार
असल्याचं, आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं आहे. देशभरातून
सुमारे एक हजार महिला वकील या परिषदेत सहभागी होणार आहेत.
**
आंतरराष्ट्रीय
महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त
काल विधीमंडळात ‘महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि सक्षमीकरण’ या विषयावर
विशेष चर्चा झाली, विधान परिषदेत उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रज्ञा
सातव, चित्रा वाघ, मनिषा कायंदे,
भावना गवळी, गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह इतर
सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
विधानसभेत
झालेल्या चर्चेत मनिषा चौधरी, सरोज अहिरे, अनुराधा
चव्हाण आणि इतर महिला सदस्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला.
**
महिला आणि
बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या चर्चेला उत्तर दिलं, राज्य शासनाच्या
विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामस्तरावर आदिशक्ती समिती या नावाने महिलांची
एक विशेष समिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, राज्यातील
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार असल्याचंही तटकरे
यांनी सांगितलं.
****
जागतिक
महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध उपक्रम घेण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात विविध क्षेत्रात
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
**
परभणी इथल्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काल विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कृषी विद्यापीठात
शिक्षण घेणाऱ्या महिलांची वाढती संख्या हे महिला परिवर्तनापेक्षाही काळाचं परिवर्तन
असल्याचं मत कुलगुरू डॉ इंद्र मणी यांनी व्यक्त केलं.
**
हिंगोली
जिल्ह्यातल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा जिल्हाधिकारी
अभिनव गोयल यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला.
**
बीड इथं
आज प्रसिद्ध उद्याोगांच्या वतीनं महिलांसाठी विशेष रोजगार मेळावा होणार आहे.
**
छत्रपती
संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महिला अधिकारी
- कर्मचाऱ्यांची काल आरोग्य तपासणी करण्यात आली. पाणी, स्वच्छता,
आणि आरोग्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा आज जिल्हा परिषद आणि
ग्रामविकास संस्थेच्या सहकार्याने सत्कार केला जाणार आहे.
**
आकाशवाणीकडूनही
महिला दिन अभिनव प्रकारात साजरा केला जात आहे, वृत्तविभागाची आज दिवसभरातली बहुतांश
बातमीपत्रं आणि इतर कार्यक्रम महिला निवेदक सादर करणार आहेत.
****
जागतिक
महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शुभेच्छा देताना
"लाडकी बहीण योजना" बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.
दरम्यान, लाडकी बहीण
योजनेअंतर्गत फेब्रुवारी तसंच मार्च महिन्याचा प्रत्येकी दीड हजार रुपयांचा हप्ता जमा
करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही
माहिती दिली. त्या म्हणाल्या..
बाईट
– आदिती तटकरे
****
प्रशासकीय
कामकाजात नवी संस्कृती रुजवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार
प्रस्तावावर बोलत होते. प्रत्येक विभागाला शंभर दिवसांत कामकाजाचं उद्दीष्ट दिलेलं
असून, उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा एक मे रोजी सत्कार करणार
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जनतेने भरघोस मतदान करून जो विश्वास दाखवला,
त्या विश्वासाला अनुरुप असं काम राज्य सरकार करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १ लाख ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं, मुख्यमंत्री
फडणवीस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी
योजना आणत असून, शंभर युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या दीड कोटी ग्राहकांना
घराच्या छतावर सौर पॅनल बसवता येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वीज दर १७ टक्क्यांनी कमी केले
जात आहेत तसंच स्मार्ट मीटर बसवल्यास, दिवसाच्या वीज वापरावर
१० टक्के सवलत मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रीपेड
मीटर ऐच्छिक असून ग्राहकांना पोस्टपेड मीटरचा पर्याय उपलब्ध असेल, अशी माहिती त्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी भूमीअधिग्रहण लवकरच सुरू
करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
**
विधान परिषदेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आभार प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर दिलं. महायुतीच्या
नव्या सरकारची सुरूवात दमदार झाली असून, पहिल्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंबही
दिसेल, असं सांगत, आपल्याला दुप्पट वेगाने
आणि चौपट क्षमतेने राज्याचा विकास करायचा असून विरोधकांनी विकास यात्रेत सहभागी व्हावं
असं आवाहन शिंदे यांनी केलं.
****
उपमुख्यमंत्री
तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल काल सादर
केला. चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची
शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली असून, राज्याचं दरडोई उत्पन्न ११ टक्क्यांनी
वाढून तीन लाख ९ हजार ३४० रुपये होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
महापुरुषांची
बदनामी करणाऱ्यांवर कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा विधानसभेच्या चालू अधिवेशनात मंजूर
करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ते काल सातारा इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते. या कायद्यात दोषीला किमान दहा वर्षाची शिक्षा आणि मोठ्या दंडाची
तरतूद केली जावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
साहित्य
अकादमीचा मराठी भाषांतरासाठीचा वर्ष २०२४ चा पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर झाला
आहे. गुरुचरण दास यांच्या 'द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड' या इंग्रजी पुस्तकाचं
त्यांनी भाषांतर केलं आहे. ५० हजार रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
राज्य शासनाचे
२०२२-२३ वर्षाचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार काल जाहीर करण्यात आले आहे.
यात छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातल्या मिनाक्षी बिराजदार यांच्यासह राज्याच्या
पाच विभागातल्या प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे.
****
केंद्र
शासनाच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी
हिंगोली जिल्ह्यातल्या पुष्यमित्र जोशी या युवकाची निवड झाली आहे. पुष्यमित्र हा संशोधक, नवोपक्रमकर्ता,
लेखक आणि धोरण सल्लागार म्हणून ओळखला जातो. त्याच्या तीन संशोधनांना
केंद्र सरकारचं पेटंट मिळालेलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल संविधान गौरव महोत्सव
साजरा झाला. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी या महोत्सवात
मार्गदर्शन करतांना, समाजाने परस्परांच्या हक्काचं रक्षण केलं, तर न्यायालयात जाण्याची वेळच येणार नाही, अशी आशा व्यक्त
केली.
****
जालना जिल्ह्यातल्या
परतूर इथल्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणी सहा संशयितांविरुध्द
परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशीरा
ही घटना घडली होती.
****
No comments:
Post a Comment