Saturday, 8 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.03.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०८ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

छत्रपती संभाजीनगर इथं, गुंतवणूकदार तसंच उद्योजकांना येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठी, शेंद्रा औद्योगिक वसाहत इथं थोड्याच वेळात महत्वाची बैठक होत आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्थितीत विभागातील आठ जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि उद्योजक बैठकीत उपस्थित राहतील. सौर कृषी वाहिनी पवन ऊर्जा प्रकल्प आणि महावितरण अधिकारी तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे. 

****

जागतिक महिला दिन राज्यात ठिकठिकाणी साजरा होत असून अकोला शहरात महिला आणि बालविकास विभागामार्फत बेटी बचाव बेटी पढाव उपक्रम तसंच वॉकेथॉनद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.

वॉकेथॉनमध्ये महिला हक्क, सुरक्षा, सुरक्षितता याबाबत जाणीव जागृती करण्यात आली. यावेळी अकोला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

****

गोंदीया शहरात आज जागतिक महिला दिनानिमित्त सायकल संडे ग्रुपच्या महिलांनी सायकल रॅली काढत हा दिन साजरा केला, या रॅलीत गृह पोलिस अधिकक्ष आणि उप विभागीय महिला पोलिस अधिकारी तसंच गोंदिया शहरातील तरुणींची उपस्थिती होती.

****

सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मदत व्हावी आणि वैद्यकीय उपचार स्वस्त व्हावेत, यासाठी २०१४ मध्ये केंद्रसरकारनं सुरू केलेली जनऔषधी योजना अतिशय लोकोपयोगी असून, जेनेरिक औषधांच्या वाढत्या उपलब्धतेमुळं रुग्णांच्या पैशांची बचत होत असल्याचं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

जनऔषधी दिनानिमित्त मुंबईतल्या जेनेरिक औषधांच्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राला भेट दिल्यानंतर काल ते बोलत होते. या योजनेमध्ये सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध व्हावीत आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी मागील ११ वर्षात देशातील ७६८ जिल्ह्यांमध्ये १५ हजारांहून अधिक प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र उघडण्यात आली आहेत. रुग्णांनी जेनेरिक औषधांचा वापर वाढवावा, असं आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केलं.

****

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुटूंर तांडा इथल्या परिक्षा केंद्रावरील गैरव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली, तर गोंधळाला नियंत्रीत न करू शकल्याबद्दल केंद्र संचालक आणि कर्मचाऱ्यांना निलंबीत केलं आहे तसंच या परिसरात नियुक्त केलेल्या बैठेपथकातील सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, परिक्षा केंद्राच्या आसपास अनावश्यक गर्दी करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कर्डीले यांनी दिले आहेत.

****

जालन्यात भोकरदन तालुक्यातील अन्वा गावातील कैलास बोराडे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी, अशीच राज्य सरकारची भूमिका असून यातील आरोपींना मकोका लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत केली जाईल अशी ग्वाही सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. यासंदर्भात भाजपचे सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, यांनी अन्वा इथला प्रकार सभागृहासमोर मांडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं होळीनिमित्त धावणाऱ्या पटणा-जालना-पटणा या विशेष रेल्वेच्या वेळेत बदल केला आहे. नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी जालना इथून १० मार्च तसंच १५ मार्चला रात्री दहा वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पावणे दहा वाजता पटणा इथं पोहोचेल. तर पटणा इथून ही गाडी उद्या, १२ आणि १७ तारखेला दुपारी पावणे चार वाजता सुटेल आणि जालना इथं तिसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचच्या दरम्यान पोहोचेल, असं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

भारतीय हवामान विभागानं आज कोकण, गोवा इथं काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.  

****

तेहरानमध्ये आज सहाव्या आशियाई महिला कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या भारताचा सामना यजमान इराणशी होणार आहे. दुपारी बारा वाजता हा सामना सुरू होईल. काल संध्याकाळी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं नेपाळला ५६-१८ असे हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 

****

महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये, गुजरात जायंट्सनं काल रात्री लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पाच खेळाडू राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं दिलेलं १७७ धावांचं लक्ष्य गुजरात जायंट्सनं तीन चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं. 

****


No comments: