Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19
March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९
मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
· भीम-यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारची प्रोत्साहन
योजना
· छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित भारत गौरव रेल्वे सुरू करण्याचा केंद्र सरकारचा
निर्णय
· महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये घट-गुन्हेगारीत देशात आठव्या क्रमांकावर-मुख्यमंत्र्यांची
माहिती
· उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठरावावरून विरोधकांचा सभात्याग
आणि
· नाशिक तसंच तुळजापूरसह राज्यात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा
****
भीम-यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना
देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती
दिली. या योजनेअंतर्गत कमी रकमेच्या प्रत्येक व्यवहारावर शून्य पूर्णांक १५ शतांश टक्के
प्रोत्साहन देण्यात येईल. दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी हा नियम लागू असेल.
या निर्णयामुळे छोटे व्यापारी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय यूपीआय सेवांचा लाभ घेऊ
शकतील असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेसाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित
आहे.
नवी मुंबईत जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण
जेएनपीएच्या ग्रीनफील्ड हायवेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली, यासाठी
साडे चार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग जेएनपीए बंदराला नवी मुंबई
आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार आहे.
याशिवाय सुधारित गोकूळ मिशनच्या कार्यान्वयनालाही
मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दोन वर्षांसाठी ही मंजूरी असेल, यामुळे
दूध उत्पादनात मोठी वाढ होईल, तसंच दूध उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा
विश्वास वैष्णव यांनी वर्तवला.
****
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना
जोडणारी भारत गौरव रेल्वे सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रेल्वे मंत्री
अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. नांदेड - पुणे रेल्वे गाडीला
वंदे भारत मध्ये रुपांतरित करण्यासंदर्भात परभणीचे खासदार संजय जाधव यांनी प्रश्न विचारला.
यावर उत्तर देताना,
देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं
काम सुरु असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात गुन्ह्यांमध्ये
घट झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज विधानसभेत अर्थ
संकल्पातल्या गृह विभागाच्या अनुदानावरील चर्चेला उत्तर देत होते. गुन्हे सिद्धीचा
१० टक्क्यांपेक्षा कमी असलेला दर आता ५० टक्क्यांपर्यंत वाढला असून, हा
दर ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
गुन्हेगारीच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक आठवा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
कोकण रेल्वे महामंडळाचं रेल्वे विभागात विलीनीकरणाला
सहमती दर्शवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत
ही माहिती दिली,
गटनेते प्रवीण दरेकर यांनी कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाबाबत मांडलेल्या
लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
****
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा
विश्वासदर्शक ठराव आज विधान परिषदेत आवाजी मतदानानं पारित झाला. यावर बोलू देण्याची
विरोधकांची मागणी सभापतींनी फेटाळून लावली. त्यावरून सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण
झाल्यानं सभापतींना कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं.
हा ठराव कोणत्या नियमानुसार मांडला याचा
खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तालिका सभापती चित्रा
वाघ यांनी ही मागणाही फेटाळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग करत दिवसभराच्या कामकाजावर
बहिष्कार घातला. सरकारच्या या भूमिकेचा निषेध म्हणून उद्या काळ्या पट्ट्या बांधून कामकाजाचा
निर्णय विरोधकांनी घेतला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे पक्षपाती तसंच एकांगीपणे
कामकाज चालवत असल्याचा आरोप करत, महाविकास आघाडीच्या आमदारांनी त्यांच्यावरही
अविश्वास दाखवला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट
केली.
बाईट – अंबादास दानवे
****
राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजनांच्या
लाभार्थ्यांना एकसमान अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत
निर्णय घेण्यात येईल, असं इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल
सावे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत
विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
****
राज्यातली वीज निर्मिती सुधारण्यासाठी आधुनिक
तंत्रज्ञान वापरून टप्प्याटप्प्यानं नवीन प्रकल्प कार्यान्वित होत असून, भविष्यात
वीज पुरवठा अधिक सक्षम केला जाईल, असं ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला
उत्तर देताना त्या बोलत होत्या.
****
जालना शहरालगतच्या शासकीय जमिनीवर झालेल्या
अतिक्रमणासंदर्भात पाठक समितीच्या अहवालातील वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे सखोल चौकशी
केली जाईल,
असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते विधानसभेत
सदस्य अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देत होते.
****
महामार्गावर दर २५ किलोमीटर अंतरावर शौचालयं
उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सदस्य चित्रा वाघ यांनी यासंदर्भात सूचना केली होती.
महामार्गांवरच्या पेट्रोल पंपांवर शौचालयं दर्शनी भागातच असावीत असा नियम करणार असल्याचंही
भोसले यांनी सांगितलं.
****
कन्नड तालुक्याला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची
मागणी आमदार संजना जाधव यांनी केली. अर्थसंकल्पाच्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेत
त्या बोलत होत्या. सरकारने स्वदेश दर्शन तसंच प्रसाद योजनांचा वापर करून पर्यटन विकासाच्या
पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार जाधव यांनी केली.
****
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देय
असलेली नुकसान भरपाईची रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना दिली जाईल, असं
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य राजेश विटेकर यांनी
याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
****
नाशिकमध्ये परंपरेनुसार रंगपंचमीच्या दिवशी
म्हणजे आज मोठ्या उत्साहात रंगोत्सव साजरा करण्यात आला. नाशिकमधल्या पेशवेकालीन सात
रहाडी अर्थात जमिनीच्या खाली असलेल्या हौदांचं पूजन करून त्यात नैसर्गिक रंग तयार करण्यात
आले. दुपारी दोनच्या सुमारास शहराच्या मध्य भागातल्या रहाडीमध्ये मध्ये उत्सव सुरू
झाल्याचं, तसंच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रहाडींचं औपचारिक पूजन केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी
मातेच्या मंदिरात महंत,
पुजारी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली.
यावेळी तुळजाभवानीच्या महावस्त्रावर नैसर्गिक सप्तरंगांची उधळण करत पारंपारिक पद्धतीनं
तुळजाभवानीची रंगपंचमी साजरी करण्यात आली. त्याआधी सकाळी तुळजाभवानीची अलंकार महापूजा
मांडण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा एक्सेलेटर
फॉर ग्रोथ अँड इन्क्यूबेसन कौन्सिल-मॅजिक या एन्क्यूबेशन केंद्राच्या पहिला स्टार्टअप
असलेला पेस्टीसाइड स्प्रेची दखल उद्योजक बिल गेट्स यांनी घेतली आहे. ज्येष्ठ उद्योजक
आशिष गर्दे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या
युवा संशोधक योगेश गवांदे यांनी या स्टार्टअपच्या माध्यमातून निओ सोलर स्प्रे तयार
केला आहे. शेतीमध्ये कमी खर्चात बचत करून, कमी खर्चामध्ये शेतकरी आपल्या
शेतात कीटकनाशकाची फवारणी करू शकतो, बिल गेट्स यांनी योगेश गवांदे
यांचे कौतुक देखील केले.
****
No comments:
Post a Comment