Thursday, 20 March 2025

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २० मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 20 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात नवीन वाळू धोरणाची लवकरच अंमलबजावणी सुरु करण्यासाठी शिफारशी मागवल्या असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं. परवाना असलेल्या ठिकाणी अवैध वाळू उपसा झाला असेल तर त्याठिकाणी दंडासह वसुली केली जाईल, वाळू क्रशरसाठी एक खिडकी योजना सुरू करून तीन दिवसात परवानगी दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असं गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य अमित साटम, नितेश राणे यांनी हा मुद्दा सदनात उपस्थित केला होता. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याचं विधानसभेचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केलं. दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

****

महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापींविरोधात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात या सदस्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. सभागृहात विरोधी पक्ष सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

****

उत्तराखंडमधल्या चार धाम यात्रेसाठी नोंदणी आजपासून सुरू झाली. यावर्षी नोंदणी आधार कार्डद्वारे प्रमाणित केली जाणार असून, एकूण नोंदणींपैकी ६० टक्के नोंदणी ऑनलाइन असतील तर ४० टक्के नोंदणी ऑफलाइन पद्धतीनं होणार आहे. पर्यटन विभागानं भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी, यात्रेच्या चाळीस दिवस आधीच ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली आहे.

****

जागतिक चिमणी दिवस आज पाळण्यात येत आहे. मला चिमण्या आवडतात या संकल्पनेनं चिमणी संवर्धनासाठी पुढे या, तसंच यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातल्या अंगणात, छतावर किंवा गॅलरीत चिमण्यांसाठी जलपात्राची सोय करावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आज सुरुवात झाली. यानिमित्त आज सकाळी स्वच्छता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित तसंच अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून लहान मोठ्या अनेक दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्या आहेत. वारकऱ्यांनी एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन गोदावरी नदी पात्रात तसंच जायकवाडी धरणात स्नान केलं.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा येथील नाथ मंदिरातही नाथषष्ठीचा उत्सव साजरा होत आहे. याठिकाणी काकड आरती, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नागपूर शहरातल्या हिंसाचारानंतर आज चौथा दिवशीही ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे. याप्रकरणी एक हजाराहून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, ५० जणांवर सामाजिक माध्यमावर चिथावणीखर पोस्ट साठी गुन्हे दाखल करण्यात आले.

****

धाराशिव इथं जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. औद्योगिक क्षेत्रात सुविधा उपलब्ध करून दिल्यास उद्योग वाढीसोबतच रोजगार निर्मितीस मदत मिळेल, असं ते यावेळी म्हणाले. या सभेत जिल्ह्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या अडचणी सोडवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

****

जागतिक ग्राहक दिनानिमित्त परभणी इथं काल जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित नागरीकांना ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती देऊन, ग्राहकांनी त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवून सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं.

****

नांदेड इथं दोन दिवसीय जिल्हा कृषी आणि धान्य महोत्सवाचा काल समारोप झाला. यामध्ये ५० लाख रुपयांपेक्षा अधिक शेत मालाची थेट विक्री झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली. नागरिक, ग्राहकांचा या महोत्सवाला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला.

****

नागपूर इथं उद्यापासून तीन दिवसीय बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळावं, तसंच समाज निरोगी व्हावा, या उद्देशानं या बीजोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यात शेतीचं पारंपारिक ज्ञान, कृषी परिसंस्थेचा विचार या विषयावर विविध सत्र, परिसंवाद, मुलाखती होणार आहेत.

****

भारतीय क्रिकेट नियामनक मंडळ - बीसीसीआयनं आयसीसी चॅम्पियन्स करंडक जिंकल्याबद्दल भारतीय संघाला ५८ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. खेळाडू, प्रशिक्षक, मदत करणारे इतर कर्मचारी आणि पुरष संघ निवड समितीला हे बक्षिस जाहिर झालं असल्याचं बीसीसीआयने सांगितलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला होता.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...