Tuesday, 25 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.03.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.

****

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर 

हास्य कलाकार कुणाल कामराविरोधात एफआयआर; तोडफोड प्रकरणी ११ जणांना अटक

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु; उपाध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक 

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक 

विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन सर्वत्र साजरा

आणि

खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाची चमकदार कामगिरी 

****

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत काल एकमतानं मंजूर झाला. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मांडलेल्या या ठरावाला सर्वांनी पाठिंबा दिला. हा पुरस्कार देताना त्यांचा महात्मा, हा सन्मान कमी होऊ नये, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. महात्मा ही लोकमान्यता आहे तर भारतरत्न ही राजमान्यता आहे, त्यामुळे महात्मा, हा सन्मान कुठेही कमी होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  

****

हास्य कलाकार कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचं, आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिलं. संविधानानं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं, तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं स्पष्ट सांगत, कामरा यांनी माफी मागावी, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले.. 

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दरम्यान, कुणाल कामरा याचे बॅंक व्यवहार तपासले जातील आणि त्याच्या मागे कोण आहे याचा शोध घेतला जाईल, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितलं. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं वाटत नसल्याचं, म्हटलं आहे. नागपूर दंगलीतल्या नुकसान भरपाईप्रमाणेच, कामराच्या स्टुडिओ तोडफोड प्रकरणात संबंधितांकडून भरपाई वसूल केली पाहिजे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, कुणाल कामरा याच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल-एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या ४० शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्धही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. शिवसेना कार्यकर्ता राहुल कनाल सह ११ जणांना पोलिसांनी तोडफोड प्रकरणी अटक केली आहे. 

****

विधानसभेत काल अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. राज्यात जाती धर्माच्या आधारे अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. जयंत पाटील, नाना पटोले यांनीही विविध मुद्यांवर सरकारवर टीका केली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून टीका केली.

****

विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या २६ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या निवडणुकीसाठी आज दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज सादर करता येतील, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणी नियमानुसार योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन नार्वेकर यांनी दिलं. 

****

सातबाऱ्यात असलेली मृतांची नावं हटवून त्यावर वारसांची नावं घालण्याची मोहीम येत्या एक एप्रिल पासून सुरू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. वारसांची नोंदणी करताना succession certificate आवश्यक नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

****

शून्य ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचं शासनाचं कोणतंही धोरण नसल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. गुणवत्ता पूर्ण तसंच दर्जेदार शिक्षणासाठी शाळा दत्तक योजना राबवण्यात येत असल्याचं, भोयर यांनी सांगितलं. 

****

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या वसतीगृहांसाठी पंधराशे कोटी रुपये निधीची तरतूद केल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. वसतीगृहातली प्रवेश प्रक्रिया समाजकल्याण आयुक्तामार्फत राबवली जाईल असं शिरसाट यांनी सांगितलं. 

****

राज्यात वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी ‘महापारेषण’च्या विविध मंजूर प्रकल्पांची कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल यासंदर्भात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

****

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनद्वारे धमकी देणारा तसंच शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. ११ मार्च रोजी अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री कोरटकरने इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती, तेव्हापासून तो फरार होता. 

****

नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या महिला संघानं चमकदार कामगिरी केली. अ‍ॅथलेटिक्समध्ये नागपूरच्या अकुताई उल-भगत तसंच भाग्यश्री जाधव यांनी, तर पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रतिमा भोंडे यांनी सुवर्ण पदक जिंकलं. पुरूषांच्या गटात पॅरा पावर लिफ्टिंग मध्ये विक्रम अधिकारी यानं कांस्यपदक जिंकलं. या स्पर्धेत महाराष्ट्र आत्तापर्यंत १४ सुवर्णपदकांसह, एकूण ३६ पदकं जिंकत पाचव्या स्थानावर आहे. यात १३ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही, कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान पवार यांनी, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रा.रं. बोराडे तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे दिवंगत महासचिव मधुकर मुळे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. 

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातली रिक्त पदं येत्या तीन महिन्यात भरले जातील, असं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सांगितलं. आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यासंदर्भात कृषी विद्यापीठांचा आकृतीबंध सुधारित करावयाची कार्यवाही जलद गतीने सुरू असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं.

****

जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस काल पाळण्यात आला. ‘होय आपण क्षयरोगाचा नायनाट करू शकतो; वचनबद्ध व्हा, प्रयत्न करा आणि परिणाम मिळवा’ अशी यंदाच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. 

छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयात टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा पार पडला. जिल्ह्यातल्या ३०४ ग्रामपंचायतींना कांस्यपदक, तर सलग दोन वर्षे उत्कृष्ट कामगिरी राखणाऱ्या २४ ग्रामपंचायतींना 'महात्मा गांधी रौप्य सन्मान' प्रदान करण्यात आला. 

****

हिंगोली जिल्ह्यात टीबीमुक्त ३४ ग्राम पंचायतींना रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते सरपंच, आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. 

****

लातूर इथं क्षयरोग निर्मुलनाबाबत पथनाट्य, जनजागृती फेरी, आदी कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी, जास्तीत जास्त ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त करण्याबाबत योग्य उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. 

****

नांदेड जिल्ह्यात टीबीमुक्त ६७ ग्रामपंचायतींना रौप्यपदक देऊन गौरवण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते महात्मा गांधी स्मृतिचिन्ह तसंच प्रशस्तीपत्रं प्रदान करण्यात आली. 

****

गडचिरोली जिल्ह्यात कृत्रीम बुद्धिमत्ता-एआयच्या मदतीनं क्षयरोग रुग्णांचं निदान करण्यात येत आहे. डॉक्टर अभय बंग यांच्या, सर्च, या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मॉ दंतेश्वरी रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं वर्षभरात ८८ क्षयरुग्णांचं निदान करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर स्त्री रोग संघटनेच्या वतीने काल घेण्यात आलेल्या वंध्यत्व निवारण नवीन उपचार प्रणाली विषयावरील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत डॉ.वसुधा जाजू, डॉ.भालचंद्र मॅडम, डॉ. शोभराणी कर्पे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम बहुविधाच्या संचालक स्नेहलता दत्ता यांचं काल निधन झालं, त्या ८४ वर्षांच्या होत्या. एमजीएम महागामीच्या संचालक गुरु पार्वती दत्ता यांच्या त्या मातोश्री होत. 

****

बीड जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाला जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी मान्यता दिली आहे. या अर्थसंकल्पात एकूण महसुली जमा रुपये १६ कोटी १३ लाख रुपये तर १५ कोटी २१ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. 

****

हवामान 

राज्यात काल सर्वात जास्त ४० पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान सोलापूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव इथं ३७ अंश सेल्सियस, परभणी इथं ३८ अंश तर बीड इथं ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

दरम्यान, काल सोलापूर इथं जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****


No comments: