Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 07 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. कृषी आणि निगडीत क्षेत्र आठ पूर्णांक सात दशांश, सेवा क्षेत्र सात पूर्णांक आठ दशांश आणि उद्योग क्षेत्र चार पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. या आर्थिक वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न ४५ लाख ३१ हजार ५१८ कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे. तर दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपयांवरून ११ टक्क्यांनी वाढून ३ लाख ९ हजार ३४० रुपये होण्याचा अंदाज आहे.
****
विधानपरिषदेत आज २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सहा हजार ४८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या.
या चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची टीका केली. या मागण्यांमध्ये कौशल्य विकास विभागाकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात अनेक विभागाच्या मागण्या असूनही त्यांना निधी मिळाला नाही तर, काही विभागांकडे निधी असूनही तो खर्च करण्यात आला नाही, याकडे दानवे लक्ष वेधलं.
****
मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर दिली, मात्र सभागृहाला हे अजूनही कळवलेलं नाही, हा सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत केला. कुठल्याही मंत्र्याने राजीनामा दिल्यावर ते सर्वात आधी सभागृहाला कळवलं जातं, त्यामुळे असा चुकीचा पायंडा पाडू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं. मात्र असं कळवण्याची पद्धत नाही, पण यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढलं जाईल, असं तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी सांगितलं. यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचं समाधान न झाल्यामुळे त्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.
****
गेल्या दहा वर्षांतली विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात आली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या डी पी आय आय टी ने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, राज्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एकूण एक लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. महायुती सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला असल्याचं सांगत त्यांनी या विक्रमी गुंतवणुकीबद्दल राज्यातल्या जनतेचं अभिनंदन केलं.
****
सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. तामिळनाडूमध्ये तक्कोलम इथं आयोजित सीआयएसएफ स्थापना दिन संचलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले होते. सीआयएसएफनं गेल्या ५६ वर्षात नेहमीच सुरक्षेला प्राधान्य दिलं असून, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेत सर्वोच्च मानदंड तयार केल्याचे गौरवोद्गार शहा यांनी यावेळी काढले.
****
२६/११ च्या मुंबईत दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याची भारतात प्रत्यार्पण रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरीक असलेला तहव्वूर राणा यानं, भारतात प्रत्यर्पणानंतर आपल्याला धोका असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात संयुक्त पत्रकार परिषदेत तहव्वूर् राणा याच्या भारतात प्रत्यार्पणाची घोषणा केली होती.
****
सातवा जनऔषधी दिवस आज साजरा होत आहे. जेनेरिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या योजनेविषयी जागरुकता निर्माण कऱण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या योजनेमुळे नागरिकांना बाजार भावापेक्षा ५० ते ८० टक्के कमी किमतीत औषधं उपलब्ध होत आहेत.
****
उद्या साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज ही माहिती दिली. या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी रहावी, महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणं गावपातळीवर अंमलात यावीत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश अशल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, यंदाचा जागतिक महिला दिन देशभरात ‘नारी शक्ती सह विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे.
****
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून जिल्हा परिषद मैदानावर बचत गटातल्या महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव सुरु झाला. या तीन दिवसीय मेळाव्यात ५० पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment