Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 08 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत नारी शक्ती से विकसित भारत या
एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा
समावेश असून दिवसभरात तीन तांत्रिक सत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे. महिला आणि बालविकास
राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी या संमेलनात सहभागी आहेत. दरम्यान, गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात आज आयोजित
लखपती दीदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दीदींशी संवाद साधत आहेत.
****
राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि
सांस्कृतीक कार्य मंत्री विधिज्ज्ञ आशिष शेलार आणि कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला यांची
आज एशियन क्रिकेट परिषद, एसीसीच्या
संचालक मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आशिया खंडातील क्रिकेटला प्रोत्साहन
देण्यासाठी स्थापन झालेल्या एशियन क्रिकेट परिषदेत भारतासह बांग्लादेश, मलेशिया, सिंगापूर,
श्रीलंका या देशांचा पुढाकार होता. या परिषदेमध्ये आता अफगाणिस्तान,
संयुक्त अरब अमिरात, नेपाळ, ओमान, मलेशिया, जपान, इराण, चीनसह एकूण ३० देशांच्या
सदस्यांचा समावेश आहे.
****
उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती
तसंच सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाला मिळालेल्या तक्रारींच्या अनुषंगानं जिल्हा
उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील चार सावकारांच्या घरांवर विविध
पथकांनी धाड टाकली.
या धाडीदरम्यान एक कोरा मुद्रांक, उसनवार पावती, भूखंड
खरेदीचे कागदपत्र तसंच अन्य दस्तावेज पथकानं जप्त केले.
****
कुटुंबाच्या आरोग्याबरोबरच महिलांनी
स्वतःचं आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्यावं. योगा प्राणायाम, योग्य आहार, नियमित
आरोग्य तपासणी करायला हवी, असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे.
जागतिक महिला दिनी छत्रपती संभाजीनगर
इथं जिल्हाधिकारी कार्यालयात महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य विषयक मार्गदर्शननपर
व्याख्यानात ते बोलत होते. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.ज्योती शेवगण-बिराजदार, आहारतज्ज्ञ डॉ.स्वप्नाली पिंपळे यांच्यासह
जिल्हाधिकारी कार्यातील महिला अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होत्या. महिलांचं आरोग्य
त्यांच्या संप्रेरक संतुलनावर अवलंबून असतं. हे संतुलन राखण्यासाठी योग्य ती काळजी,
आहार आणि आरोग्य तपासणी वेळेवर करून घ्यावी, असं
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्योती बिराजदार यावेळी म्हणाल्या.
****
महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे.
महिलांनी न घाबरता मोठी स्वप्न बघावीत असा संदेश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी मीनल करनवाल यांनी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने दिला आहे. महिलांनी आपल्या
श्रमाची प्रतिष्ठा करायला शिकत आत्मसन्मानाला महत्त्व द्यावं, रूढी,परंपराच्या
अडथळ्यांमधून बाहेर पडावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातील दैठणा इथं जिल्हा
परिषद केंद्रीय कन्या प्रशालेमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सर्व विद्यार्थिंना परीक्षा
पॅडचे वाटप करण्यात आलं. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, गावकरी उपस्थित होते.
****
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य
संचालनालयाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं उद्या रविवार ९ ते ११ मार्च रोजी दररोज
सायंकाळी साडेसहा ते १० या वेळात दुर्मिळ वाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या तीन दिवसीय महोत्सवाचं उद्घघाटन सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात तीन दिवसांत धार्मिक वाद्ये, निसर्गातील वाद्यांवर तसंच दुर्मिळ पारंपारिक
वाद्यांवर आधारित कार्यक्रम होणार आहेत.
****
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट
विकास घटक अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यात उद्या ९ तारखेपासून वॉटरशेड
यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा कळमनुरी तसंच सेनगाव तालुक्यातील ६ गावांमध्ये
जाणार असून पाणलोटविषयक कामाचं महत्त्व विशद करून या कामी लोकसहभाग वाढावा हा या यात्रेमागचा
उद्देश आहे. यावेळी वृक्षारोपण, ग्रामस्थांना पाणलोटविषयी शपथ महिला बचतगटांच्या बैठका आदी कार्यक्रम
घेण्यात येणार आहेत.
****
भारतीय ग्रँडमास्टर प्रणव वेंकटेशनं
काल रात्री मॉन्टेनेग्रो इथं झालेल्या फिडे जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद
जिंकलं. दरम्यान, ग्रँडमास्टर
अरविंद चिथंबरम् यानं झेक प्रजासत्ताकमध्ये प्राग मास्टर्स बुद्धिबळ
स्पर्धा जिंकली. काल रात्री झालेल्या अंतिम फेरीत, अरविंदनं तुर्कीच्या
एडिझ गुरेलशी सामना बरोबरीत सोडवला आणि पहिलं स्थान पटकावलं. या विजयासह, ग्रँडमास्टर अरविंदनं जगातील सर्वोत्तम १५ खेळाडूंमध्ये प्रवेश केला.
****
No comments:
Post a Comment