Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
नागपूरमध्ये उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रविंदर सिंघल यांनी शहरातल्या काही ठिकाणी संचारबंदीचं कलम १६३ लागू केलं आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास धार्मिक प्रतिकांची कथित तोडफोड झाल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, यात दगडफेक करण्यात आली, तसंच काही गाड्या जाळण्यात आल्या.
दरम्यान, या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार आहेत.
****
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी अर्थात पीएम-किसान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी एम किसान लिस्ट एपीके किंवा पी एम किसान एपीके या संदेशाची लिंक उघडताच त्यांच्या बँक खात्यातली रक्कम नाहीशी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी, अज्ञात ए पी के फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नये, असं आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ आणि अॅपचाच वापर करावा तसंच फसवणूक झाल्यास सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संचालक तुलसी गबार्ड भारतीय भेटीवर आल्या असून, त्यांनी काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यान, अत्याधुनिक संरक्षण, संशोधन आणि संरक्षणाशी संबंधित विविध उद्योगांमध्ये सहकार्याबद्दल यावेळी चर्चा झाली. तसंच संरक्षण उद्योग विषयक पुरवठा साखळी अधिक बळकट करण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली.
****
फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित महागाई दरात, किंचित वाढ होऊन तो २ पूर्णांक ३८ टक्क्यांवर पोहचला. तयार उत्पादनात तेल आणि शितपेयांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे महागाई दरात वाढ झाली आहे. मात्र, याच काळात भाज्यांच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे अन्नधान्यांवर आधारित महागाई दरात घट होऊन तो पाच पूर्णांक ९४ टक्क्यांवर पोहचला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथून नागपूरला जाणारा ३० टन रेशनचा तांदूळ पोलिसांनी ट्रकसह जप्त केला. या जप्त मालासंदर्भात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरु असून यातल्या दोषींवर कारवाई केली जाईल, असं राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. रेशनिंग तांदळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत पुरवठा उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून तीन महिन्यात समितीकडून अहवाल मागवण्यात येणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं.
****
शिवजयंतीच्या औचित्याने काल रत्नागिरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं. तसंच ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात देशातल्या पहिल्या थ्रीडी मॅपिंग मल्टिमीडिया शोचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं. या शिवसृष्टीत सरखेल कान्होजी आंग्रे आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचेही पुतळे उभारण्यात आले असून, शिवकालीन गाव, जहाज, शिवरायांच्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतीही उभारण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं संगमेश्वरला स्मारक उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली असून, अधिवेशन संपल्यावर तिथे वारसा विषयातल्या तज्ज्ञ आर्किटेक्टसह प्रत्यक्ष भेट देणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
तत्पूर्वी, संध्याकाळी पवार यांच्या हस्ते, रत्नागिरी शहरात होणार असलेल्या टाटा संचालित कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजन चंपक मैदानात पार पडलं. दर वर्षी या प्रकल्पामधून सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असं सांगतानाच रेवस ते रेडी या सागरी मार्गाला प्राधान्य दिलं जाईल. तसंच, पायाभूत सुविधा अतिशय उत्तमरीत्या उभारण्याला सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी ग्वाही पवार यांनी दिली
****
परभणी इथं नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू आणि मालाचं जिल्हास्तरीय प्रदर्शन आजपासून सुरु होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात बचत गटातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे स्टॉल, महिलांची आरोग्य तपासणी शिबीर, विविध परवाने शिबीर, महिला स्वयंसहायता बचत गटांना कर्ज वितरण यासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ४५ हजार रुपये लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं. सिमेंट नाला बंधार्याच्या कामाचं बिल मंजूर करुन देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
****
इंग्लंडमध्ये कालपासून विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. आशियाबाहेर आयोजित करण्यात येणारी ही पहिली स्पर्धा असून ती सात दिवस चालणार आहे. कालच्या पहिल्याच सामन्यात भारतीय पुरुष संघाने काल इटलीचा ६४-२२ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment