Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 22 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
पाणी वाचवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला
चालना देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केला आहे. आजच्या जलदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सामाजिक माध्यमावर
यानिमित्त दिलेल्या संदेशात मानवी संस्कृतीतील पाण्याची महत्त्वाची भूमिका
असल्याचं म्हचलं आहे. भावी पिढ्यांसाठी पाणी हा अमूल्य स्रोत असून, त्याचं
रक्षण करण्यासाठी सामूहिक कृती करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं आहे.
पाण्याचं संकट हा जागतिक चिंतेचा विषय
बनला आहे, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात
म्हटलं आहे. जल जीवन मिशननं कोट्यवधी घरांना नळाचं पाणी पुरवलं आहे, अटल
भूजल योजनेनं घटत्या पाण्याच्या पातळीबद्दल जागरूकता निर्माण केली असून, अमृत
सरोवर योजनेमुळे जलस्रोतांचं पुनरुज्जीवन केलं आहे, असं पाटील यांनी
म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आल्याचं
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी कळवलं आहे. ही परीक्षा १०
नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आली होती. यातील उमेदवारांना आपलं म्हणणं मांडता यावं, यासाठी
२५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान सुनावणी होणार आहे. याबाबतचं पत्र संबंधित
उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे, तसंच परीक्षार्थ्यांच्या
लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी कळवलेल्या दिवशी सकाळी ११
वाजता स्वखर्चानं,
सर्व आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यासाठीची मुदत परिवहन आयुक्त
कार्यालयानं दोन महिन्यांनी वाढवली आहे. आता वाहनधारकांना ३० जूनपर्यंत ही नंबर
प्लेट बसवावी लागणार आहे. राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ही नंबर
प्लेट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्ह्यात साडे नऊ लाख वाहनांपैकी
आतापर्यंत केवळ २० हजार वाहनधारकांनी 'एचएसआरपी'ची
ऑर्डर दिली आहे. त्यात सुमारे ५ हजार वाहनांना प्रत्यक्षात ही नंबर प्लेट
बसविण्यात आली आहे. यामुळेच परिवहन आयुक्त कार्यालयानं ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली
आहे.
****
नवी मुंबईतल्या शिरवणे औद्योगिक
वसाहतीतल्या शुभदा पॉलिमर्स या कारखान्यात काल रात्री ११ वाजेच्या सुमारास भीषण आग
लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी
झाल्याचं वृत्त नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चित्रपट चावडी या उपक्रमात यावेळी
इस्राएलच्या सैन्यातील एका सैनिकावर आधारित 'फॉक्सट्रॉट' हा
चित्रपट दाखविण्यात येणार आहे. एमजीएमच्या व्ही. शांताराम प्रेक्षागृहात उद्या
सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल. यशवंतराव चव्हाण सेंटर, एमजीएम
वृत्तपत्रविद्या विभाग आणि एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस् यांच्या वतीनं हा उपक्रम
राबवण्यात येतो. प्रवेश सर्वांसाठी खुला असून, जास्तीत जास्त रसिक, विद्यार्थी, अभ्यासकांनी
उपस्थित राहावं,
असं आवाहन संयोजकांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील
वडोद तांगडा इथल्या प्रसिद्ध श्री जगदंबा माता यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे.
सोंगे काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत आज रात्री गणरायाचे
सोंग काढले जाईल. तसंच उद्या दुपारी जगदंबा मातेची मुखवटा मिरवणूक, बारा
गाडे नवस फेडण्याचा कार्यक्रम आणि उद्या रात्री पुन्हा विविध देवी-देवतांची सोंगे
काढण्यात येणार आहेत. सोमवारी पहाटे जगदंबा मातेच्या स्वारीने यात्रेची सांगता
होणार असल्याचं उत्सव समितीनं कळवलं आहे.
****
भाषेचा विकास ही निरंतर प्रक्रिया आहे.
भाषांवर आधारित ज्ञानव्यवहाराची महत्त्वाची केंद्रं म्हणून ग्रंथालयांना विशेष
महत्त्व आहे,
असं प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने
यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या ग्रंथोत्सवात, 'मराठी भाषेच्या विकासात ग्रंथालयांचं योगदान’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत
होते. डॉ. रा. शं. बालेकर,
अनिल लहाने, गुलाबराव मगर, कुंडलिक
अतकरे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला होता.
****
शिका, संघटित व्हा आणि
संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी
समाजकल्याण विभाग कार्यरत असून, भविष्यात शिक्षणासाठी मुलामुलींचे
वसतिगृह उभारण्याला प्राधान्य दिले जाईल, असं प्रतिपादन सामाजिक
न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. कोल्हापूर इथल्या माणगाव परिषदेच्या १०५
व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते.
****
स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या आज
महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत त्रिशा जोली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना
चीनच्या शेंग शु लिऊ आणि टॅन निंग यांच्याशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी ५
वाजून १० मिनिटांनी स्वित्झर्लंडमधल्या बासेल इथं खेळला जाईल. काल झालेल्या
सामन्यात भारतीय जोडीनं हाँगकाँगच्या युंग नगा टिंग आणि युंग पूई लाम यांचा २१-१८, २१-१४
असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment