Monday, 6 February 2017


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०६ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राज्यातल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातल्या एकूण पाच जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. यात औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदार संघांचा, तर अमरावती आणि नाशिक या पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे. तीन फेब्रुवारीला औरंगाबाद विभागात आठ जिल्ह्यांतल्या २७५ मतदान केंद्रांवर सरासरी ८७ टक्के मतदान झालं होतं. औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या एका कंपनीत मतमोजणी सुरू आहे.

****

पाकिस्ताननं काश्मीरसाठी लोकांची मतं जाणून घेण्याऐवजी त्यांच्या गरजा काय आहेत याची पडताळणी करावी, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. हरिद्वार इथं ते एका कार्यक्रमात बोलत होते. विमुद्रीकरण आणि लक्ष्यभेदी कारवाई हे दोन्ही निर्णय देशाच्या हितासाठीच घेतले असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे दिर्घकालिन चांगला परिणाम होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.  

****

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बंगळुरू इथून गोवर आणि रुबेला आजारांवरील लसीकरण मोहिमेची सरुवात केली. ही मोहिम कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, गोवा आणि लक्षद्वीप या राज्यातून सुरू होत असून, त्यानंतर संपूर्ण देशभरात राबवण्यात येणार आहे. देशभरातल्या ४१ कोटी बालकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे.

****

उस्मानाबाद इथल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचं उद्धाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. समाजामध्ये तरुण जोडप्यामध्ये वाढत्या घटस्फोटाचा विपरित परिणाम होत असून, वैकल्पिक वाद निवारण केंद्रामार्फत त्यांच्यामध्ये समेट घडवून विवाह संस्था मजबूत होण्यास मदत होणार असल्याचं न्यायमूर्ती जाधव यांनी आपल्या भाषणात नमूद केलं.

****

हाँगकाँग इथं झालेल्या ज्यूनियर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. अंतिम सामन्यात भारतानं मलेशियाचा दोन - शून्य असा पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 7 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...