Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 March
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव सदनाने फेटाळला
· राज्यासमोर अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याची क्षमता, मुख्यमंत्र्यांचं
प्रतिपादन
· घरगुती गॅसच्या टंचाईबाबत राज्य सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात, विधानसभा
अध्यक्षांचे निर्देश
· महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार पुढच्या अधिवेशनात विशेष विधेयक आणेल, उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांची घोषणा
आणि
· छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन औरंगाबाद शहर भेटीला ३६० वर्षे पूर्ण, १५
मार्च रोजी विशेष हेरिटेज वॉकचं आयोजन
****
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या
विरोधातला अविश्वास प्रस्ताव काल सदनाने फेटाळून लावला. दोन दिवस झालेल्या या चर्चेला
काल सायंकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं. गेल्या अनेक वर्षात लोकसभेतल्या
विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपती अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव, अर्थसंकल्पावरची
चर्चा किंवा महत्त्वाच्या एकाही विधेयकावरच्या चर्चेत भाग घेतला नसल्याकडे त्यांनी
सदनाचं लक्ष वेधलं. सदनाचं कामकाज नियमानुसार चालतं, विरोधी पक्षनेत्यांना
हे नियम ठाऊक नसतील,
तर त्यांनी आपल्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडून हे नियम समजून
घ्यावेत, असा उपरोधिक सल्लाही शहा यांनी दिला. ते म्हणाले…
बाईट- गृहमंत्री अमित शहा
****
जल सुरक्षा हे प्रत्येक नागरिकाचं
कर्तव्य असून,
जल संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं
आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत
राष्ट्रीय जल महोत्सवात त्या काल बोलत होत्या. पाणी ही फक्त वापरण्याची वस्तू नसल्याचं, राष्ट्रपतींनी
नमूद केलं. सध्या देशातल्या सुमारे ८२ टक्के ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा
होत असून, ही जल जीवन मिशनची मोठी आणि यशस्वी कामगिरी असल्याचं त्या म्हणाल्या. या कार्यक्रमादरम्यान
जल जीवन मिशन अंतर्गत तळागाळात उत्कृष्ट काम करून समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्ती
आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला.
****
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती
उत्तम असून,
आर्थिक शिस्तीचं पालन करत यंदाचा अर्थसंकल्प मांडल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत होते.
राज्य दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात पाचव्या क्रमांकावर आहे, मात्र
राज्याच्या जीडीपी वाढीचा दर देशाच्या जीडीपी वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे असं त्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले…
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सन २०१३-१४ ला राज्याचा जी एस
डी पी १६ लाख कोटी होता,
तो आता ५१ लाख कोटींवर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा जीडीपीतला
वाटा १४ पूर्णांक तीन दशांश टक्के असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्राची
अर्थव्यवस्था ही जगातली तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं.
अडचणीतून मार्ग काढण्याची क्षमता
महाराष्ट्रात असल्याचं,
मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यावरील कर्ज वाढलं आहे, मात्र
राज्याचं कर्ज हे,
सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या २५ टक्क्यांच्या आत असणं आवश्यक
असतं आणि महाराष्ट्रावरचं हे प्रमाण १८ टक्के असल्याचं ते म्हणाले..
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजकोषीय तूट तीन टक्क्यांपेक्षा
कमी आणि महसूली तूट एक टक्क्यांपेक्षा कमी राखण्यात यश आल्याचं सांगतानाच, राज्याने
सिंचन, ऊर्जा,
सामाजिक न्याय अशा सर्व विभागांत प्रगती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
घरगुती गॅसच्या टंचाईबाबत राज्य
सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
दिले आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला
होता.
****
दरम्यान, गॅस
आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या मुलांची गैरसोय होऊ नये, याची
जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम
शिंदे यांनी दिले आहेत. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि सचिन अहिर
यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला होता. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात
सूचित केल्याचं,
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं, ते
म्हणाले…
बाईट- सामाजिक न्याय
मंत्री संजय शिरसाट
****
हिंगोली जिल्ह्यात गँस सिलिंडरचा
पुरेसा साठा असून,
नागरिकांनी घाबरून जावू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानेही, घरगुती
एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून, नागरीकांनी अफवांवर विश्वास
ठेवू नये, असं आवाहन केलं आहे.
****
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी
सरकार पुढच्या अधिवेशनात विशेष विधेयक आणेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा
पवार यांनी केली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान भवनाच्या मध्यवर्ती
सभागृहात त्या काल बोलत होत्या. राज्यात शेती कसणाऱ्या महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा
२० टक्क्यांनी जास्त असलं,
तरी जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर नसल्यामुळे शेतीशी संबंधित
विविध योजनांचे लाभ त्यांना मिळण्यात अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी राज्यात लिंगभाव
संसाधन केंद्र सुरू करावं,
अशी सूचना ज्येष्ठ कृषितज्ञ नित्या राव यांनी या कार्यक्रमात
केली.
****
मराठवाड्यात प्रशासकीय सोयीसाठी
नांदेड किंवा लातूर इथं दुसरं महसूल आयुक्तालय आणि उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय स्थापन
करण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी काल विधानसभेत ही माहिती
दिली.
दरम्यान, जमीन
मोजणी प्रक्रियेचा कालावधी ६० ते ९० दिवसांवरून
३० दिवसांवर आणला जाईल,
अशी ग्वाही त्यांनी दिली. भूमी अभिलेख विभागातली रिक्त पदं भरण्यासाठी
विशेष मोहीम राबवणार असून उप अधीक्षकाची पदं तीन महिन्यांच्या आत भरली जातील असं बावनकुळे
यांनी सांगितलं.
****
पैठण इथल्या नाथषष्ठी उत्सवाचा
काल समारोप झाला. काल सायंकाळी काल्याच्या कीर्तनानंतर रावसाहेब महाराज गोसावी यांच्या
हस्ते हंडी फोडण्यात आली. उपस्थित भाविकांनी नाथसमाधीचं दर्शन घेऊन, भानुदास
एकनाथचा जयघोष केला.
****
समाजाने परमार्थासोबत प्रपंचातही
तुकोबांचा आदर्श ठेवावा,
असं आवाहन संत साहित्याचे अभ्यासक जयंत देशपांडे यांनी केलं
आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जीवन विकास ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त तुकाराम
बीजेच्या अनुषंगाने,
‘तुका झालासे कळस’ या विषयावर ते बोलत होते. आत्मसाक्षात्कारानंतरही
समाजात परतण्याच्या निर्णयामुळे संत तुकाराम महाराज वेगळे ठरतात, असं
देशपांडे यांनी नमूद केलं.
****
लोकसंस्कृतीचा वारसा लोक कलावंतानी
भक्तीच्या जोरावर जतन करुन ठेवावा, असं आवाहन, मुंबई
विद्यापीठातल्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केलं आहे. बीड इथं
लोककला संवर्धन आणि जतन या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते.
****
तुळजापूर इथं 'जिल्हा
आणि अतिरिक्त सत्र न्यायालय' स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली
आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला. या नवीन न्यायालयासाठी विविध २५ पदांच्या
निर्मितीलाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं
काल “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” घेण्यात आला. या मेळाव्यात १६६ पैकी ८३
उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात काल एचपीव्ही
लसीकरण मोहिम राबवण्यात आली. सेनगाव तालुक्यातल्या कापडसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीत
१५ मुलींना ही लस देण्यात आली.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
तत्कालीन औरंगाबाद शहर भेटीच्या ऐतिहासिक घटनेला यंदा ३६० वर्षे पूर्ण होत आहेत. या
स्मृतींना उजाळा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक यांच्या संयुक्त
विद्यमाने येत्या १५ मार्च रोजी जयसिंगपुरा परिसरात विशेष ‘हेरिटेज वॉक’ चं आयोजन करण्यात
आलं आहे. इतिहासानुसार,
पुरंदरच्या तहानंतर आग्र्याला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी
औरंगाबाद इथं मुक्काम केला होता. पाच मार्च १६६६ रोजी रायगडावरून आग्रा प्रवासासाठी
निघालेले महाराज साधारण आठवडाभरात इथं पोहोचले होते. शहराच्या या ऐतिहासिक वारशाची
ओळख करून देणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी
मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केलं
आहे.
****
No comments:
Post a Comment