Monday, 23 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

कॉर्पोरेट कायदे दुरुस्ती विधेयक २०२६’ संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय लोकसभेत आज घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. या विधेयकाद्वारे ‘मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००६’ आणि ‘कंपनी कायदा २०१३’ मध्ये सुधारणा करण्याचा उद्देश आहे.

दरम्यान, लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आखाती देशातल्या परिस्थितीवर निवेदन देणार आहेत.

****

संसदेच्या दोन्ही सदनात आज क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना त्यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आदराजंली अर्पण करण्यात आली. या वीरांनी त्यांच्या लहान वयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलं असून, त्यांचं शौर्य, साहस आणि निस्सीम देशभक्तीमुळे स्वतंत्र भारताचा पाया रचला गेला, अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना नमन केलं.

भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचं हौताम्य हा स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातला केवळ एक अध्याय नव्हे, तर या बलिदानानं राष्ट्राच्या अंतरात्म्याला जागृत करण्याचं आणि लाखो लोकांना इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा दिली असल्याचं राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी नमूद केलं.

**

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशातून भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना आदराजली वाहिली. या क्रांतीकारकांच्या अदम्य साहसाला आणि बलिदानाला त्यांनी नमन केलं.

****

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त आज मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. डॉ. लोहिया यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून वर्णन करत, वसाहतवादी राजवटीविरुद्ध सामान्य जनतेला संघटीत करण्यात लोहिया यांनी निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर तसंच १९४७ नंतर भारताच्या प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानावर मोदी यांनी प्रकाश टाकला.

****

'जल जीवन मिशन' अंतर्गत १६ कोटींहून अधिक घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी दिली. नवी दिल्लीत आज जागतिक जल दिन परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. जलसंवर्धन आणि शाश्वत जलव्यवस्थापनाबाबत सूचना मांडण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही परिषद एक व्यासपीठ म्हणून कार्य करेल, असंही त्यांनी सांगितलं. 'नमामि गंगे मिशन' सारख्या उपक्रमांचं कौतुक करत पाटील यांनी, नदीचं पाणी स्वच्छ करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. पाणी वाचवण्याची आणि साठवून ठेवण्याची सवय अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी नागरीकांना केलं.

****

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत मतदानाच्या वेळी उपस्थित असलेले राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह इतर नेते, कार्यकर्ते आणि सदस्यांना पोलिसांनी अरेरावी आणि धक्काबुक्की केल्या प्रकरणाची चौकशी करुन योग्य कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर फडणवीस बोलत होते.

विधानपरिषदेतही सदस्य हेमंत देसाई यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधितांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले. या निर्देशांचं तंतोतंत पालन सरकार करेल, असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं. शंभुराज देसाई यांनी या घटनेचं सविस्तर वर्णन केलं आणि राज्यात मंत्रीही सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला. सभागृहाच्या अनेक सदस्यांनी या विषयावरच्या चर्चेत भाग घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला.

****

महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर काल रात्री तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. एका ३३ वर्षाच्या पीडित महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे गरोदर असताना या भोंदू बाबाने तिच्यावर अत्याचार केला तसंच गर्भपात केला असं तक्रारीत म्हटलं आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हुतात्मा दिनानिमित्त थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आलं. प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

****

नाशिक मध्ये उन्हाची दाहकता वाढत चालली असून, त्यामुळे पाण्याचा साठाही जलयाशयातून कमी होऊ लागला आहे. नाशिक मधल्या एकूण २६ प्रकल्पातल्या जलाशयामध्ये सध्या ५४ टक्के इतका साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्के अधिक साठा असला, तरी हळूहळू टँकरची मागणी वाढत आहे. सिन्नर तालुक्यात सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, देवळा, चांदवड आणि इगतपुरी इथंही पाणी टंचाई जाणवत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...