Wednesday, 11 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.03.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 11 March 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात कवच या रेल्वे संरक्षण प्रणालीचं काम वेगाने सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. आठ हजार ५७० किलोमीटरमध्ये ऑप्टिकल फायबर केबल्स- ओएफसी बसवण्यात आले आहेत, तसंच ११०० हून अधिक टेलिकॉम टॉवर्स बसवण्यात आले असून, स्थानकांमध्ये ७६७ स्टेशन डेटा सेंटर्सची स्थापना करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, माहिती तंत्रज्ञान विषयावरच्या प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव यांनी, जगभरात सर्वात परवडणारी इंटरनेट सेवा ही भारतामध्ये असल्याचं सांगितलं. इंटरनेटचा वापर वाढवणं, परवडणाऱ्या दरात इंटरनेट सेवा पुरवणं आणि मजबूत डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण करणं या तीन प्रमुख बाबींवर सरकारने गेल्या दशकभरात काम केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या देशात १०३ कोटी लोक इंटरनेट सेवेचा लाभ घेतात, ही संख्या २०१४ मध्ये २५ कोटी होती अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

****

दरम्यान, एलपीजी च्या वाढत्या किमती आणि अन्य मुद्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज बाधित झालं. एलपीजीच्या तुटवड्यावर सदनात चर्चा करण्याची मागणी या सदस्यांनी लाऊन धरली. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

राज्यात गॅसचा किती साठा आहे आणि गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना राबवत आहे याची माहिती द्यावी अशी मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. अमेरिका - इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस टंचाई जाणवत असून, तुटवड्यामुळे मुंबई आणि नागपूर या शहरांमध्ये ३० टक्के हॉटेल्स बंद झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असला तरी राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या.

****

महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रणी राहीलेला असून, कृषी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य दिल्याचं, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष तसंच जागतिक महिला दिनानिमित्ताने विधीमंडळात आयोजित ‘महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरणया विषयावरच्या चर्चासत्रात त्या आज बोलत होत्या. पी एम किसान योजना, महाडीबीटी पोर्टलवर महिलांची मोठ्या प्रमाणात नोंदणी, लखपती दीदी, नमो ड्रोन दीदी, शी मार्ट उपक्रम यासारख्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे महिला केवळ शेतकरी राहिल्या नसून, कृषी उद्योजक, तंत्रज्ञान तज्ज्ञ होत असल्याचं, पवार यांनी नमूद केलं.

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची यवेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात लातूर विभागातल्या वृंदावनी यादव यांना गौरवण्यात आलं.

****

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेला स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यांचा वारसा जपण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आयुष्यभर कटिबद्ध राहिले, असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचा यंदाचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार दत्ता देसाई यांच्या ‘सत्ताबदल: राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद’, या ग्रंथाला, तर नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार नाटककार अतुल पेठे यांना जाहिर झाला आहे. उद्या छत्रपती संभाजीनगर इथं साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. यावेळी या पुरस्कारासंबंधी डॉ. हंसराज जाधव आणि डॉ. गणेश शिंदे हे भाष्य करणार आहेत.

****

महाराष्ट्र राज्य सहकारी पाणन महासंघ, संच राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ३१ मार्च पर्यंत नोंदणी करणं आवश्यक आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या तालुक्यांचा समावेश आहे.

****

नांदेड इथं येत्या १३ ते १८ मार्च या कालावधीत रेणुका महोत्सवानिमित्त मिनी सरसप्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात राज्यातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार वस्तू तसंच खाद्यपदार्थ असतील. याशिवाय दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.

****

देशातल्या पहिल्या ऐतिहासिक डिजिटल जनगणनेच्या प्रक्रियेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक एप्रिलपासून विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेद्वारे सुरुवात होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या या जनगणनेत प्रत्येक कुटुंबाचे स्वरूप, उपलब्ध सुविधा आणि मालमत्ता यांची तपशीलवार माहिती गोळा केली जाणार आहे. या महामोहिमेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ हजार प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...