Wednesday, 11 March 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 March 2026
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मार्च २०२६ सकाळी ७.१० मि.
****
ग्राहकांना घरगुती गॅसचा स्वस्त आणि अखंडित पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारचं प्रतिपादन
एलपीजी सिलेंडरचा अनावश्यक साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा
जल जीवन मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ
लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू
आणि
नाथषष्ठी सोहळ्याची आज सांगता
****
ग्राहकांना घरगुती गॅसचा स्वस्त आणि अखंडित पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं, केंद्र सरकारनं म्हटलं आहे. घरगुती ग्राहकांसाठी इंधनाचा तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही, असा निर्वाळा सरकारने दिला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सामाजिक माध्यमावरून दिलेल्या संदेशात, विविध मार्गांनी इंधनाची आयात सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती दिली.
**
केंद्र सरकारनं नैसर्गिक वायूच्या उत्पादन, पुरवठा, समतोल वितरण आणि उपलब्धतेचे नियमन करण्यासाठी एस्मा अर्थात आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ लागू केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी काही क्षेत्रांना प्राधान्य दिलं आहे. यामध्ये CNG, PNG, एलपीजी उत्पादन यांचा समावेश करण्यात आला आहे.
घरगुती वापराचा गॅस आणि वाहनांसाठीच्या सीएनजीला प्राधान्य देण्याचे आदेश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. देशातल्या तेल शुद्धिकरण कारखान्यांनी एलपीजी गॅसचं उत्पादन वाढवावं असे आदेशही सरकारने दिले आहेत. गॅसची साठवणूक आणि काळाबाजार टाळण्यासाठी घरगुती वापराच्या दोन सिलिंडरमधल्या नोंदणीचा कालावधी २५ दिवस करण्यात आला आहे.
**
गॅस पुरवठ्यामध्ये आलेल्या अडचणींमुळे हॉटेल मालकांनी काल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. एलपीजी पुरवठ्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर मुंबईतली हॉटेल्स आणि भोजनालयांना पुढच्या दोन दिवसात कामकाज बंद करावं लागेल, असं हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने म्हटलं आहे. राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, आदी शहरातही या अडचणी येत असल्याचं या संघटनेकडून सांगण्यात आलं.
**
दरम्यान, एलपीजी सिलेंडरचा अनावश्यक साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. यासंदर्भात काल वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
बाईट – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
****
जल जीवन मिशन योजनेला डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्याला, केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तामिळनाडूतल्या मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभेत काल अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव सादर झाला. काँग्रेसचे खासदार डॉक्टर मोहम्मद जावेद यांनी हा प्रस्ताव मांडला. पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी या चर्चेसाठी दहा तासांचा वेळ दिल्याचं सांगितलं.
काँग्रेसचे मनीष तिवारी, गौरव गोगोई, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, समाजवादी पक्षाचे राजीव रॉय, द्रमुकचे टी आर बालू, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे आदींनी या चर्चेत भाग घेतला.
तेलगूदेसमचे एल एस के देवरायलु, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, भाजपचे निशिकांत दुबे, पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह, अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, या प्रस्तावाचा विरोध केला, लोकसभा अध्यक्ष हे कायम निष्पक्षपणेच कामकाज करत असल्याचं रिजीजू यांनी सांगितलं.
****
देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. १९३७ च्या शरियत कायद्यातल्या मुस्लिम महिलांबाबत भेदभाव करणाऱ्या तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी करणारी एक याचिका सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती आर.महादेवन यांच्या पीठापुढे आली, या याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं समान नागरी कायद्याबाबतचं हे निरीक्षण नोंदवलं. सदर याचिकेतल्या मागणीप्रमाणे शरियत कायद्यातली वारसा हक्काची तरतूद रद्द केल्यास, मुस्लिम वारसाहक्कासंदर्भात कोणताही वैधानिक कायदा अस्तित्वात नसल्यानं, कायदेविषयक पोकळी निर्माण होईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या याचिकेसंदर्भात संसदेनं लक्ष घालण्याची सूचना न्यायालयानं केली आहे.
****
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही फक्त साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजवापर करणाऱ्यांसाठी लागू असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत सत्यजित देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. शेतकरी ग्राहकांनी आवश्यक उपाययोजना करून हा वीजवापर या मर्यादेच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातल्या ७५ टक्के शेतकऱ्यांना वर्षअखेरपर्यंत अखंड वीज पुरवठा होईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
****
विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना त्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं. महिलांना समान संधी, सुरक्षितता आणि सक्षमीकरण देणारा समाज निर्माण करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी १८० दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आली असून, त्यानंतर गरज असल्यास कमाल एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धपगारी रजा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
****
राज्य मंत्रिमंडळानं राज्यात नांदेडसह अकरा अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयं मंजूर केली आहेत. याशिवाय, जमावबंदी आयुक्तांकडे दोन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पदं नव्यानं दिली आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
****
पैठण इथल्या नाथषष्टी सोहळ्यात संत एकनाथ महाराज पुरस्कार काल प्रदान करण्यात आले, विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने काल नाथसमाधीवर महावस्त्र अर्पण करण्यात आलं. या सोहळ्यात काल रात्री नाथ महाराजांची छबिना पालखी काढण्यात आली, आज सायंकाळी काला दिंडीने या सोहळ्याचा समारोप होणार आहे.
****
धाराशिव जिह्यातल्या नळदुर्ग ते सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट या विभागाच्या पुनर्वसन आणि सुधारणेच्या कामाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत उर्वरित १४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आता १०५ कोटी १३ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.
****
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या निर्देशनानुसार नगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासनाने सफाई कर्मचारी म्हणून अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्यावी, असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डांगोर यानी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शासनाच्या विविध आवास योजनेचा तसंच शिष्यवृत्ती, इतर आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक योजनांचा लाभ द्यावा, असंही त्यांनी सूचित केलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा पंचायत समितीच्या सभापती पदी कावलगाव गणातून अपक्ष निवडून आलेल्या उज्ज्वला पिसाळ यांची, तर उपसभापती पदी फुरकळस गणाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काशिनाथ काळबांडे निवडून आले. पूर्णा पंचायत समितीमध्ये भाजपला बहुमत आहे, मात्र काही सदस्यांनी पक्षाध्यक्ष झुगारून, पक्षाच्या उमेदवारांशिवाय इतर उमेदवारांना मतदान केल्याचं समोर आलं आहे.
गंगाखेड पंचायत समितीच्या सभापती म्हणून भाजपचे मनोज मुंडे, तर उपसभापतीपदी सारिका खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
****
वाचन ही केवळ आवड नसून ते व्यक्तिमत्त्व विकासाचं प्रभावी साधन आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पोतदार यांनी केलं आहे. जालना इथं 'ग्रंथोत्सव-२०२५' च्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. या उदघाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
****
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्हा रुग्णालयात १४ मार्चपर्यंत जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त नेत्र विभागात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी यावेळी बोलतांना, ४० वर्षे वय पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने तसंच मधुमेही रुग्णांनी किमान सहा महिन्यांतून एकदा तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन केलं.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...